
>> डॉ. विद्या देवधर
सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थितीचे चित्रण करणाऱया कथालेखनातील ठळक नाव म्हणजे हैदराबाद येथील ज्येष्ठ लेखिका जिलानी बानो. नुकतेच त्यांचे निधन झाले. कथालेखिका म्हणून कथा क्षेत्रातील त्यांचा प्रवास अधिक नेमकेपणाकडे जाणारा आणि लक्षणीय आहे.
सुंदर वस्तूंनी सजवलेलं, उच्च अभिरुचीचे पण तरीही साधे असे ते जिलानी बानूंचे नामपल्ली येथील घर. अतिशय प्रेमळ आणि मोहक चेहरा, मृदू स्वर आणि आर्जवी भाषा. पहिल्या भेटीतच जवळ घेऊन त्यांनी मला आपलंसं केलं. निघताना त्यांचं ते प्रेमाने डोक्यावर थोपटणं आणि हाती घेतलेल्या हातांचा मऊ मुलायम स्पर्श! किती वेळा मी जिलानी बानूंच्या या हळुवार प्रेमाचा अनुभव घेतला आहे. आता त्या आपल्यात नाहीत या विचारांनी मन व्याकुळ झालं आहे.
1991मध्ये मराठी साहित्य परिषदेने अनुवादित कादंबऱयांचे चर्चासत्र घेतले तेव्हा मी जिलानी बानोंना पहिल्यांदा भेटले आणि मग मात्र कोरोना येईपर्यंत मी आणि माझी मैत्रीण विद्या मक्तल नियमितपणे जिलानी बानोंना भेटायला जात होतो.
नामपल्लीहून त्या बंजारा हिल्सला मोठय़ा बंगल्यामध्ये राहायला गेल्या, पण प्रेम आणि स्वभावातील साधेपणा अगदी तोच होता पहिल्या भेटीसारखा. स्वागताला आणि निरोप देताना अन्वर साहेबही हजर असायचे. 1992 मध्ये झालेलं सखी मंडळाचे संमेलन! या मेळाव्याला जिलानी बानू आल्या, आपल्या लेखन प्रवासाबद्दल भरभरून बोलल्या.
हैदराबादबाहेरून आलेल्या महाराष्ट्रातील सर्वांना जिंकून गेल्या. त्याच सुमारास म्हणजे 35 वर्षे झाली, मी जिलानी बानो यांची ‘मिळून साऱयाजणी’साठी मुलाखत घ्यायला गेले होते. मी या क्षेत्रातील नवी नवखी, त्यांच्याहून खूप लहान, पण बाईंनी इतक्या सहजपणे उत्तरे देत मला आपलंस केले आणि वयाचे किंवा परकेपणाचे दडपण गळून पडले.
अगदी तरुण वयापासून जिलानी बानो कथा लिहू लागल्या. त्यांचा पहिला संग्रह ‘रोशनी के मिनार’ (1958) लाहोरहून प्रकाशित झाला. कोणतीही साहित्यिक विचारधारा किंवा स्त्राrमुक्ती चळवळीशी संबंधित नसल्या तरी सामाजिक संस्थांच्या कार्याबद्दल मात्र त्यांना आपुलकी होती. मुसलमान समाज, विवाह संस्था, त्यातील समस्या याबरोबरच मागासलेल्या बहिष्कृत समाजाच्या मानसिकतेचा वेध त्या घेत गेल्या. ‘दूर के आवाज’ मध्ये त्यांनी सतत कानावर आदळणाऱया आवाजांचे अर्थ शोधले आहेत, तर ‘स्कूटर वाला’मध्ये या आवाजांचे आयुष्यावरील परिणाम दाखवले आहेत. संगीत या विषयाभोवती तर त्यांच्या अनेक कथा गुंफल्या आहेत. ‘राग दरबारी’मध्ये संगीताचे जीवनातील स्थान त्यांनी दाखवले आहे, तर ‘अॅश ट्रे मे सुलगता हुआ सिगरेट’ ही स्त्राrच्या लैंगिक शोषणावरील कथा अस्वस्थ करणारी आहे. धनवंतांची मग्रुरी, दंगली यांसारख्या समकालीन विषयांवर मोजक्या शब्दात परिणाम साधणाऱया व्यंगात्मक कथा त्यांनी लिहिल्या आहेत. म्हणूनच कथा क्षेत्रातील त्यांचा प्रवास अधिक नेमकेपणाकडे जाणारा आणि लक्षणीय आहे. मल्याळम कथांच्या अनुवादाचा ‘मल्याळम् अफसाने’ हा त्यांचा संग्रह आहे. सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील जुलूम किंवा हतबलता, शहरी जीवनातील ताणतणाव, स्त्रियांच्या, वृद्धांच्या आणि गरीबांच्या वेदना, मानवी नातेसंबंधातील भावबंध असे अनेक विषय जिलानी बानो यांच्या कथांमधून मांडलेले दिसतात. वर्णनाचा अनावश्यक फाफट पसारा न मांडता विषयातील आशय छोटय़ा छोटय़ा संवादातून
नेमकेपणाने अभिव्यक्त करणाऱया या कथा वाचकांच्या मनाला भिडतात आणि अंतर्मुखही करतात.जिलानी बानोंच्या कथा दहा कथासंग्रहांतून संपादित केलेल्या आहेत. अनेक देशी आणि विदेशी भाषांतून त्यांच्या कथा अनुवादित झाल्या आहेत. ‘ऐवाने गझल’, ‘नगमे का सफर’ ‘बारिश ये संग’ या कादंबऱयांचा मल्याळी, गुजरातीबरोबर मराठीत आणि रशियन भाषेतही अनुवाद झाला आहे. ‘बारिश ये संग’ आणि ‘पत्थर का जिगर’ यांचे अनुवाद हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष द.पं. जोशी यांनी केले आहेत. जिलानी बानो यांच्या सर्व लेखनात त्यांच्यातील न्यायप्रियता तर दिसून येतेच, पण स्थानिक मातीशी नाळ साधणारी आत्मीयता ही जाणवते.
जिलानी बानो यांना 2001 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. महाराष्ट्र, बिहार, बंगाल, आंध्र आणि हरयाणा राज्य उर्दू अकादमीचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले असून सोवियत लाण्ड नेहरू पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. याशिवायही अनेक पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यकृतींना गौरवले आहे. भारतातील सर्व भाषांतील साहित्य मराठीमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या हैदराबादमधील मराठी साहित्य परिषदेच्या कामाचे त्यांना विशेष कौतुक होते. उर्दूचे जाणकार द.पं. जोशी यांच्याशी तर त्यांचे मैत्रीचे संबंध होतेच, परंतु जोशी सरांच्या निधनानंतरही 2011 मधील बहुभाषिक चर्चासत्राला आवर्जून जिलानी बानो उपस्थित होत्या. विद्या मक्तल अनुवादित त्यांच्या कथांचा मराठी संग्रह 2015मध्ये जेव्हा साहित्य परिषदेने प्रकाशित केला तेव्हा तब्येत साथ देत नसूनही केवळ या कामाचे कौतुक म्हणून त्या स्वत प्रकाशनासाठी उपस्थित राहिल्या. तेव्हा जिलानी बानो म्हणाल्या होत्या की, “माझ्या साहित्याच्या संदर्भात मला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यापुरस्कारांचा मला निश्चितच अभिमान आहे, पण सर्वात मोठा व महत्त्वाचा पुरस्कार मला हा वाटतो, की जेव्हा माझे साहित्य इतर विविध भाषांमधून अनुवादित होऊन सर्व वाचकांसमोर येते. माझे लेखन उर्दूशिवाय हिंदी, मल्याळम, तेलगु, बंगाली आणि मराठी भाषेत अनुवादित झाले. हैदराबादमधील समाजाशी माझी नाळ जुळलेली आहे. हे विविध भाषिकांचे शहर आहे. त्यामुळे इतर भाषिक साहित्यिकांची व वाचकांची विचारांचे आदान-प्रदान होण्यास मदत होते, म्हणूनच माझ्या दृष्टीने अनुवादाचे विशेष महत्त्व आहे.’’ अशा या सदैव आमच्या पाठीशी राहणाऱया मराठी साहित्य परिषदेच्या हितचिंतक आमच्या जिलानी बानो यांना विनम्र अभिवादन!
(लेखिका मराठी साहित्य परिषद, हैदराबादच्या अध्यक्ष आहेत.)


























































