आभाळमाया – ‘शुभ’ स्वागतम्!

>> वैश्विक, [email protected]

अठरा दिवसांच्या यशस्वी अंतराळवासानंतर शुभांशू शुक्ला हा हिंदुस्थानचा अंतराळ स्थानकावर राहणारा, तिथे समूहाने विविध प्रयोग करणारा अंतराळयात्री गेल्या मंगळवारी आपल्या वेळेनुसार दुपारी पृथ्वीवर सुखरूप परतला. हे दृश्य पाहताना समस्त देशवासीयांना अभिमान वाटला. त्यांच्या मातापित्यांच्या डोळ्यांत स्वाभाविकतेने आनंदाश्रू तरळले. जगातही या मोहिमेचे कौतुक झाले.

यावर आमची चर्चा सुरू असताना कुणीतरी म्हणालं, ‘‘ठीक आहे त्यात विशेष काय? असे अनेक अंतराळयात्री आजवर अवकाशात जाऊन, राहून आणि विविध प्रयोग करून तसंच ‘स्पेस वॉक’चा अनुभव घेऊनही आलेले आहेत.’’ अशा उद्गारांना (कमेन्टस्) उत्तर एकच, एखादं मूल पहिल्यांदा सायकल चालवतं किंवा गाणं म्हणतं ते काही ‘जगातलं पहिलं’ नसतं. तरीही त्याच्या जनकांना आणि सुहृदांना कौतुक वाटतंच. ते वाटणं नैसर्गिक आहे. ‘आपला’ माणूस अंतराळात राहून आला याचा आनंद म्हणूनच अधिक. आतापर्यंत इतर सर्व जाऊन आले त्यांच्याबद्दलही आदर आहेच.

शिवाय हिंदुस्थानी पित्याची कन्या सुनीता विल्यम्स अंतराळात काही संशोधन करते तेव्हा आपलेपणा वाटतो तो यामुळेच. शुभांशूच्या अंतराळ प्रवासाविषयी उत्सुकता आणि कुतूहल होतं, त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी तांत्रिक अडचणींमुळे सुनीता विल्यम्स आणि बुच यांना अंतराळ स्थानकावर बराच काळ अडकून पडावं लागल्याची पार्श्वभूमीही होती. त्यामुळे काहीशी हुरहुर वाटणं साहजिक म्हटलं पाहिजे.

त्यातही शुभांशू आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांचं प्रस्थान अनेकदा ‘तारीख पे तारीख’ पडून लांबल्याने त्यांना घेऊन जाणारी, परत आणणारी यंत्रणा पुरेशी सुरक्षित आहे की नाही याबद्दल शंकेची पाल चुकचुकली तर नवल नाही. अर्थात उड्डाण लांबलं तरी अंतराळयानाशी ‘ड्रॅगन’ कॅप्सूलचं यशस्वी डॉपिंग झालं आणि नियोजित कार्य पूर्ण करून हे पथक पृथ्वीवर परतलं.

पेगी व्हिट्सन, शुभांशू शुक्ला, स्लाव्होत्स व्हिनिव्हस्की आणि टायबोर कॅपू असे हे चार अंतराळयात्री 25 जून 2025 रोजी ‘स्पेसएक्स’ कंपनीच्या फाल्कन – 9 ब्लॉक फ्लाइट रॉकेटद्वारा ऑक्सिअम स्पेसच्या सहकार्याने ‘क्रू ड्रॅगन ग्रेस’ यानात बसून अंतराळ स्थानकाच्या दिशेने झेपावले आणि 15 जुलै 2025 रोजी कॅलिफोर्नियातील सॅन डिएगोजवळ पॅसिफिक महासागरात उतरले. ही अंतराळयात्रेची ‘स्पेसएक्स’ची खासगी मोहीम होती. त्यांचा उड्डाणापासूनचा प्रवास, अंतराळ स्थानकावरचा निवास आणि परतीचा प्रवास याचा एकूण काळ 20 दिवस, 2 तास आणि 59 मिनिटांचा होता. प्रत्यक्ष अंतराळ स्थानकावर त्यांनी 18 दिवस आणि 43 मिनिटे वास्तव्य केले. इथे मिनिट टू मिनिट किंवा क्षणाक्षणाचा हिशोब अत्यंत महत्त्वाचा असतो. अंतराळ मोहिमेत ‘झाला जरासा उशीर’ किंवा ‘पाच मिनिटांनी काय होतंय?’ असले ‘डायलॉग’ चालत नसतात. एका क्षणाची गफलत जिवावर बेतू शकते हे ‘कोलंबिया’ यानातील कल्पना चावलासह अनेकांचा काळीज गोठवणारा अंत झाला तेव्हा जगाने अनुभवलेलं आहे.

11 जून ते 25 जून या काळात ‘ड्रॅगन’ आज उडणार, उद्या उडणार असा सावधगिरीचा, परंतु मानसिक तणाव वाढवू शकणारा प्रकार सुरू होता. अर्थात स्वतः अंतराळयात्रींना त्याची कल्पना असतेच. चार जणांना अंतराळयात्रेचं संपूर्ण प्रशिक्षण देऊन जेव्हा एकाचीच निवड केली जाते हे बाकीच्यांना ठाऊक असते. 1984 मध्ये आपला पहिला अंतराळयात्री राकेश शर्मा रशियन मोहिमेतून अंतराळात गेला तेव्हा त्याच्यासह राकेश मल्होत्रालाही तितकंच कठोर प्रशिक्षण दिलं गेलं होतं, परंतु त्याचा क्रमांक नाही लागला आणि ते त्याने खिलाडूपणे स्वीकारलं.

शुभांशूच्या मोहिमेचे कमांडर अमेरिकन पेगी व्हिट्सन हे ‘ऑक्सिअम’मध्येच काम करतात. हिंदुस्थानी शुभांशू आपल्या ‘इस्रो’चा, तर पोलँडचा स्लाव्होत्स व्हिनिव्हस्की युरोपिन स्पेस एजन्सीतर्फे आणि टायबोर कॅपू हंगेरीच्या अंतराळ संस्थेसाठी काम करणारा आहे. सरकारी यंत्रणांद्वारे निवड झालेले हिंदुस्थान, पोलँड आणि हंगेरी या देशांचे हे दुसरे अंतराळयात्री होते. पहिले रशियन मदतीने अंतराळात गेले होते. पेगी व्हिट्सन यांची मात्र ही पाचवी अंतराळयात्रा होती. यामध्ये व्हिट्सन कमांडर, शुभांशू पायलट, तर स्लाव्होत्स आणि टायबोर दोघेही मोहीम तज्ञ (मिशन स्पेशॅलिस्ट) होते.

आपल्या ‘इस्रो’च्या दृष्टीने भावी ‘गगनयान’ मोहिमेसाठी शुभांशूचा यशस्वी अंतराळ प्रवास, निवास आणि अंतराळ स्थानकावरचं कार्य फार महत्त्वाचं ठरणार आहे. या मोहिमेतील शुभांशूच्या अंतराळात जाण्याबरोबरच इथल्या वैज्ञानिकांशी असणाऱ्या त्याच्या सुसंवादाचं (कोऑर्डिनेशनचं) प्रात्यक्षिकच घडलं. पुढे जेव्हा आपली स्वतःची अशी मोहीम जाईल, तेव्हा हा ‘डेटा’ उपयुक्त ठरेल. शुभांशूच्या पथकाने अंतराळात नेमके कोणते प्रयत्न केले त्याविषयी नंतर एका लेखात. तोपर्यंत 1981 मधल्या आशियाई खेळांच्या वेळी पं. शर्मा यांनी लिहिलेल्या गाण्यातील ‘मैत्री मती क्रीडांगण मे’ यात थोडा बदल करून ‘मैत्री मती तारांगण मे’ असं म्हणून शुभांशूचं ‘अथ स्वागतम्, शुभ स्वागतम्’ करू या!