श्री दत्तमहाराजांचे अक्षय निवास स्थान ‘गिरनार’

>> निळकंठ कुलकर्णी

।। श्री गुरुदेव दत्त ।।

दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे गिरनार. हे क्षेत्र गुजरात राज्यामधील जुनागढ जिल्ह्यामध्ये आहे. हिमालयापेक्षाही जुना पर्वत समूह व पूर्वी रेवतक पर्वत म्हणून याचा उल्लेख आहे. श्री दत्तपादुका, नाथ संप्रदायाचे उपासना केंद्र, नेमिनाथ भगवान मंदिर, गीर जंगल, कमंडलू कुंड, आंबा मातेचे स्थान आहे .

10 हजार पायऱ्या चढून जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पूनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजेच पूर्व इतिहास व परिसर गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रद्धा आहे. भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे.

शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत ही नावे त्रैमूर्ती (ब्रह्मा, विष्णू, शंकर) यांच्याशी निगडित आहेत. श्रीरामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणात मिळतात. पुराणामध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो. तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो.

वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. असा श्री गिरनार तेजोमय भगवान श्री दत्तप्रभु यांचे हे अक्षय निवासस्थान आहे. पश्चिम हिंदुस्थानातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ 5 कि. मी. अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे 4 योजने म्हणजेच 16 गावापर्यंत आहे. सुमारे 28 चौ. कि. मी. ने व्याप्त आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी, जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या