सांस्कृतिक पाडवा

2280
  • शिबानी जोशी

शोभायात्रा, रांगोळय़ा, गप्पा, गाणी मैफल रंगवून नव्या वर्षाचे स्वागत करायचे. मरगळ आलेल्या समाजाला जागं करण्याचं काम शालिवाहनांनी केलं तो दिवस आपण पाडवा म्हणून साजरा करतो. शालिवाहन शकाची सुरुवात याच दिवसापासून होते म्हणून हा हिंदू वर्षाचा पहिला दिवस आपण मानतो. याच दरम्यान वसंत ऋतूचं आगमन होत असतं. त्यामुळे वसंताचं स्वागतदेखील आपण पाडव्याच्या रूपात करीत असतो.

21 वर्षांपूर्वी गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीनं प्रथम डोंबिवलीमध्ये अशा तऱहेने पाडव्याला नववर्ष स्वागत करायला सुरू झाली. इथे दोन महिने आधीपासून शोभायात्रेच्या तयारीला सुरुवात होते. यात मराठमोळे ढोलताशे, रांगोळय़ा, लेझीम पथक, शोभा रथ, नऊवारी पारंपरिक वेषभूषा असं सर्व मराठमोळं दर्शन घडवलं जातं. यंदा ‘पर्यावरण वाचवा’ हा विषय घेऊन सायकल रॅलीसुद्धा निघणार आहे.

संस्कारभारती रांगोळी
आपल्या संस्कृतीमध्ये रांगोळीला महत्त्व आहेच, पण आपल्याकडे ज्या 64कला मानल्या गेल्या आहेत त्यातही रांगोळीला एक कला मानलं गेलं आहे. हिंदू हा केवळ धर्म नसून ती राहण्याची पद्धती आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे आपली संस्कृती, कला, धर्म यांची सांगड आपल्या सामाजिक जीवनाशी घातलेली आढळते. पूर्वी घराबाहेर न पडणाऱया स्त्र्ायांना आपली कला व्यक्त करण्याची संधी अशी घरातच मिळत असे. शिवाय ज्या घरासमोर रांगोळी काढलेली दिसते तिथे आपोआप पवित्र वातावरण असल्याचा भास येणाऱया माणसाच्या मनात उत्पन्न होतो आणि घरातील माणसांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात लगेच सकारात्मकता येते. हीच रांगोळीसुद्धा या शोभायात्रांचं वैशिष्टय़ ठरत आहे. ‘संस्कार भारती’ या सामाजिक उपक्रमाने 21 चिन्हांचा वापर करून कमी वेळात धार्मिक खुणांचा वापर होईल, अशी रांगोळी म्हणूनच सुरू केली. आज ती इतकी प्रसिद्ध झाली आहे की, आपल्या संस्कृतीचा भाग बनलेली आहे. पार्ल्याच्या किशोरी परुळेकर या रांगोळीचा प्रसार करतात. त्या यंदाच्या पार्ल्याच्या शोभायात्रेत रांगोळी काढत आहेत. रांगोळीच्या या खुणांमध्येही अर्थ लपला आहे असं त्या सांगतात. बिंदू म्हणजे ठामपणा, सरळ रेषा म्हणजे अखंडपणा, गोपद्म अर्थात पवित्र गाईचं पाऊल या चिन्हांमुळे घरात तेच वातावरण येतं म्हणून आनंदाच्या दिवशी हा आनंद अधिक द्विगुणित व्हावा म्हणून रांगोळी काढली जाते, असं त्या सांगतात.

शोभायात्रा
शोभायात्रांमध्ये रस्तोरस्ती या रांगोळी काढून आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मकता येत आहे. गुढी उभारणे यालाही या दिवशी खूपच महत्त्व असतं. याच दिवशी श्रीरामाने वालीच्या जुलमातून दक्षिणेकडील प्रजेची सोडवणूक केली होती, असंही म्हटलं जातं. त्यामुळे दुष्टांवरील सुष्टांचा विजय, प्रभू रामचंद्रांचा अयोध्या आगमनाचा दिवस म्हणून आनंद व्यक्त करण्यचा दिवस म्हणून गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे विजयपताका. मांगल्य, पावित्र्य यांना वातावरणात सतत प्रसृत करणारी ही गुढी घरासमोर आपण चढवतो. ती आनंदाचं, उत्साहाचं वातावरण निर्माण होण्यासाठीच. या बाह्य वातावरणाबरोबरच आपल्या मनात असलेली वानरवृत्ती, चंपलवृत्ती नाश पावली गेली पाहिजे हेही त्यात अभिप्रेत असतं. मन शांत, स्थिर, सात्त्विक बनण्यासाठीही या गुढीचा उपयोग आपण करू शकतो.
गुढी या शब्दाचा उल्लेख अनेक संतांच्या रचनांमध्येही आला आहे. 1278 च्या आसपास लिळाचरित्रात ‘गुढी’ असा उल्लेख आढळतो.संत नामदेव, संत जनाबाई, चोखामेळा यांच्या अभंगात गुढी हा शब्द आढळतो. म्हणजेच ही गुढी उभारण्याची पद्धत किती जुनी आहे हे लक्षात येते. ‘टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची।’ असा उल्लेख चोखोबांच्या अभंगात आहे. म्हणजेच संतांनीही आपल्याला चांगल्याची गुढी उभारा म्हणजे चांगल्याची सुरुवात करा, असा संदेश दिला आहे. मराठी साहित्यातल्या मेरुमणी बहिणाबाईंनी तर ‘गुढी उभारवी’ अशी कविताच लिहून या पाडव्यासाठी संदेश दिला आहे. त्या म्हणतात,
गुढी पडव्याचा सन
आता उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देणं
सोडा मनातली आढी
गेलं साली गेली अढी
आता पाडवा पाडवा
तुम्ही येरा येरावरी
इव्हेंट होऊ दे किंवा सोहळा होऊ दे. आपला पारंपरिक वारसा त्यानिमित्तानं पुढच्या पिढीकडे पोहोचवता येत असेल तर अशा शोभायात्रांचं स्वागतच व्हायला हवं.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या