
>>विनायक
नुकताच चैत्र महिन्याचा पहिला दिवस आपण गुढीपाडवा किंवा मराठी नववर्षारंभ म्हणून साजरा केला. आपल्या देशात सगळीकडे चांद्रमासावर आधारित पंचांग किंवा हिंदुस्थानी पारंपरिक कॅलेंडर वापरात असलं तरी प्रांतनिहाय नववर्ष दिन निरनिराळे आहेत. एकच उदाहरण द्यायचं तर गुजराती नववर्ष दिवाळीतल्या पाडव्याला म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरू होतं. आपल्यासारखाच चैत्र शुद्ध प्रतिपदेचा नववर्ष दिवस गोव्यात साजरा केला जातो. याच दिवशी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही नववर्षाची सुरुवात होते. मात्र त्याला ‘उगादी’ असं म्हटलं जातं. सिंधी समाज हाच दिवस ‘चेती चांद’ (चैत्र प्रतिपदा) म्हणून साजरा करतो.
आपल्याकडच्या ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’ निसर्गात विविध रंगांनी पाहायला मिळतात. त्यापैकी चैत्र महिन्याच्या आरंभी सुरू होणारा वसंत ऋतू हा चैत्र-वैशाख या दोन महिन्यांचा असतो. बाकीचे दर दोन महिन्यांचे ऋतू म्हणजे ज्येष्ठ-आषाढ ग्रीष्म, श्रावण-भाद्रपद वर्षा, आश्विन-कार्तिक शरद, मार्गशीर्ष-पौष हेमंत आणि माघ-फाल्गुन शिशिर ऋतू. प्रसिद्ध लेखिका दुर्गाबाई भागवत यांचं या ऋतूंवरचं ‘ऋतुचक्र’ हे गद्य-काव्यासारखं पुस्तक जरुर वाचा. त्यात सहाही ऋतूंचे नैसर्गिक विभ्रम त्यांनी लेखन सौंदर्याने अधिक सुंदर केले आहेत.
चैत्राची चाहूल म्हणजे ‘झिम्मा खेळणारा कोकणचा राजा’ ऊर्फ आंब्यांचा बहर येण्याचा काळ. काही ठिकाणी फळांचा राजा हापूस आता विक्रीला तयारही झाला असेल. आंबा म्हटलं की, आंब्याचं भरदार पर्णपिसाऱ्याचं झाड आणि त्यामध्ये दडलेले कोकीळ पक्षीसुद्धा.
ग. दि. माडगुळकर यांच्या प्रसिद्ध ‘गीतरामायणा’तल्या पहिल्याच गीतात लव-कुशांचं वर्णन ‘ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंतवैभव गाते कोकिल’ असं केलेलं आहे. शुभकार्यासाठी आंब्याचे टाळे (पानांचा झुबका) दारी लावणं, तोरणात आंब्याच्या पानांचा समावेश करणं हे सर्व त्या वृक्षराजाचं वार्षिक काwतुक.
या लेखात आम्रतरुवरच्या कोकीळ पक्ष्यांविषयी आपण वैज्ञानिक आणि रंजकही माहिती घेणार आहोत. पक्षीशास्त्र्ााच्या भाषेत कोकीळ हा ‘क्युक्युलिडी’ प्रकारातला पक्षी. रंगाने, आकारमानाने अगदी कावळ्यासारख्या. एका संस्कृत सुभाषितात म्हटलंय,
‘काकः कृष्णः पिकः कृष्णः – को भेदो काकपिकयोः
वसंतसमये प्राप्ते, काकः काकः पिकः पिकः’
याचा अर्थ असा की, कोकीळ आणि कावळा दोघे एकाच रंगाचे मग त्यांच्यात भेद तो काय? आणि त्याचं पुढच्या ओळीतलं उत्तर वसंत ऋतूमध्ये (कोकीळ कुजन सुरू झालं की) हा फरक आपोआप समजतो. यामध्ये ‘पिक’ म्हणजे कोकीळ हे लक्षात ठेवायचं.
कोकीळ पक्षी पृथ्वीवर उष्ण कटिबंधात (ट्रॉपिकल) आढळतात. त्यात आपला देश येतो. त्यातही आपल्या पश्चिम घाटातील घनदाट वनसंपदेची व्याप्ती प्रचंड असल्याने कोकीळ पक्ष्यांच्या अनेक वसाहती सर्वत्र आढळतात. आमच्या मुंबईतल्या घरातही पहाटे कोकीळ कुजन सतत ऐकू येऊ लागलंय. गमतीचा भाग म्हणजे कोकिळाचा सुस्वर कानी पडतो तो ‘नर’ कोकीळ ‘गात’ असतो. त्याच्या स्वराला शास्त्र्ााrय संगीताच्या भाषेत ‘पंचम’ स्वर म्हणतात. मादी कोकिळा गात नाही. त्यामुळे कोणीही गायक-गायिका स्वरकोकीळच असतात.
जगभरच्या कोकीळ पक्ष्यांचे रंग आणि चोची काहीशा वेगळ्या असतात. सर्व जगातल्या सांस्कृतिक महाकाव्यांमध्ये कोकिळांची वर्णनं आढळतात. 17 ते 80 सेंटिमीटरपर्यंत वाढणाऱ्या काही कोकिळांची चोच पोवळ्याच्या रंगासारखी नारिंगीसुद्धा असते. लांब शेपटीचे आणि काळ्या चोचीचे कोकीळ स्थलांतरित पक्ष्यांपैकी असतात. आशियाई कोकीळ तर पाचूच्या रंगाचे आणि सुंदर पिसारा फुलवणारे ‘एमराल्ड ककू’ असतात. पर्जन्यवनात कोकीळ पक्ष्यांचं वास्तव्य मोठय़ा प्रमाणात आढळतं. कोकीळ, कोकिळेच्या मीलनासाठी जी साद घालतो तेच कोकीळ कुजन. अशी अत्यंत सुस्वर साद इतर कोणताच पक्षी घालत नाही. त्याचे दोन हेतू असतात. कोकिळेला आकर्षित करणे आणि इतर नर कोकिळांना आपल्या ‘क्षेत्रा’ची (टेरिटरी) जाणीव करून देणे. सुमारे 56 प्रजातींच्या कोकिळा इतर पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालतात! त्यातही कावळीची आणि कोकिळेची अंडी सारखी असल्याने काक दाम्पत्याशी खोटं भांडण काढून नर कोकीळ त्या दोघांना त्यांच्या घरट्यापासून दूर नेतो आणि शरीरातच चोवीस तास उबवलेली (इन्क्युबेशन) अंडी कोकिळा पटकन कावळीने घातलेल्या अंडय़ांमध्येच घालते. बिचाऱ्या कावळीला हे समजत नाही. इतर पक्ष्यांच्या अंडी उबवण्याच्या वेळेपेक्षा कोकिळेची अंडी लवकर उबवली जाऊन (ती सुद्धा कावळीकडून!) नवजात कोकिळांचा जन्म होतो. त्यांचं संगोपन वॉब्लर पिंवा कावळ्यांची मादी करते!
अळ्या, कीटक खाऊन जगणारा हे स्वराधीस पक्षी विलक्षण युक्तिबाज (पिंवा चतुर म्हणा) आणि एककल्ली वृत्तीचे असतात. इतर पक्ष्यांसारखे ते थव्याने, समूहाने दिसत नाहीत. 1819 मध्ये पक्षीतज्ञ विल्यम लीच यांनी कोकीळ पक्ष्यांचा अभ्यास करून विस्तृत लेखन केलं. आपल्याकडे डॉ. सलीम अल्ली आणि मारुती चितमपल्ली यांनी अनेक पक्ष्यांचे ‘स्वभाव’ नोंदले आहेत. ते वाचताना अनेक पक्ष्यांची माहिती ‘ज्ञान-विज्ञान’ शिकवते आणि मनोरंजकही वाटते.




























































