
>> डॉ. प्रेरणा तांबे
ब्रेक्झिटचा निर्णय घेतल्यापासून इंग्लंडची अर्थव्यवस्था ढासळायला लागल्याचं संपूर्ण जगाच्या लक्षात आलं आहे. ब्रेक्झिटबाबत अत्यंत संभ्रमाचं वातावरण संपूर्ण इंग्लंडमध्ये पाहायला मिळत असून गेली अडीच वर्ष हा प्रश्न आहे त्या स्थितीत कायम आहे. या मुद्द्याचं पुढे काय होणार याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाहीये. मात्र ब्रेक्झिट झाल्यास त्याचा हिंदुस्थानला फायदा होण्याची निश्चित शक्यता आहे.
ब्रेक्झिटचा संपूर्ण जगावर परिणाम होणार आहे आणि हिंदुस्थानही त्यापासून वेगळा राहू शकत नाही. जागतिक आर्थिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या हिंदुस्थानावरही याचे परिणाम होणार आहे. ब्रेक्झिटच्या आतापर्यंतच्या निर्णयांमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकावर परिणाम झाल्याचे आपल्याला बघायला मिळाले आहे. हिंदुस्थानाचा ओढा परकीय गुंतवणूक आपल्या देशात यावी या दृष्टीने सातत्याने राहिला आहे. अर्थातच यामुळे जागतिक पातळीवर राजकीय आणि आर्थिक परिणामांचे पडसाद हिंदुस्थानाच्या अर्थव्यवस्थेवरही झालेले पाहायला मिळतात. हिंदुस्थानातील अनेक कंपन्यांनी इंग्लंडमध्ये कार्यक्षेत्र निर्माण केले आहे. इंग्लंडचा वापर या कंपन्या युरोपियन महासंघाचे प्रवेशद्वार म्हणून करत असतात. ब्रेक्झिटमुळे या कंपन्यांना त्यांचे उद्योग युरोपियन महासंघातील देशांमध्ये हलवावे लागणार आहेत.
ब्रेक्झिटमुळे हिंदुस्थानला फायदा होण्याचीही दाट शक्यता आहे. ब्रेक्झिट झाल्यास नवे उद्योग धोरण तयार होऊन ते अंमलात यायला थोडा वेळ लागेल. नासकॉमने अंदाज वर्तवला आहे की, ब्रेक्झिटमुळे हिंदुस्थानीय आयटी सेक्टरला थोड्या काळात 108 अब्ज डॉलर्सचा तोटा सहन करावा लागू शकतो. त्यामुळे आयटी उद्योगाने आत्तापासूनच हा तोटा न व्हावा यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. आयटी क्षेत्राव्यतिरिक्त वाहनबांधणी, वस्त्रोद्योग, औषध निर्मिती क्षेत्रालाही ब्रेक्झिटचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थानातील विद्यार्थ्यांसाठी इंग्लंड हे सातत्याने विद्येचे माहेरघर म्हणून पाहिले गेले आहे. ब्रेक्झिटच्या चर्चेनंतर हिंदुस्थानातून इंग्लंडमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे इंग्लंडने अधिकाधिक विद्याथी आपल्या देशात यावेत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अभ्यासक्रम संपल्यानंतर काम मिळविण्याचा अवधी 6 महिने वाढवण्यात येणार आहे. पाऊंडचं मूल्य कमी केल्याने विद्यार्थ्यांना फी भरणं देखील सोपं झालं आहे. याशिवाय इंग्लंडला फिरायला येणाऱ्या पर्यटकांनाही याचा फायदा झाला आहे. असं असलं तरी इंग्लंडने त्यांचे व्हीसासाठीचे नियम मात्र अजून कडक केले आहेत.
ब्रेक्झिटमुळे कुशल कामगारांना अच्छे दिन येणार आहेत. ब्रेक्झिटच्या घोषणेमुळे युरोपियन देशातून इंग्लंडमध्ये कामासाठी येणाऱ्यांची संख्या घटली आहे. ही संख्या गेल्या 10 वर्षातील नीचांकी संख्या आहे. यामुळे इंग्लंडमध्ये कुशल कामगारांची चणचण भासत असून ही हिंदुस्थानींसाठी आनंदाची बाब आहे. डॉक्टर आणि नर्सची संख्याही कमी असून ही देखील हिंदुस्थानीयांसाठी सुवर्णसंधी आहे. युरोपियन महासंघात कुशल लोकांची संख्या कमी होत चालली आहे. ब्रेक्झिटनंतर नवउद्योजक आणि नवे प्रयोग करणाऱ्यांची वानवा भासणार आहे. हिंदुस्थानामध्ये या दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्यांची प्रचंड संख्या असून त्यांना इंग्लंड आपल्याकडे आकर्षित करू शकतं. इंग्लंडला शिक्षक, शेफ आणि सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्यांचीही येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे.
मंदीत संधी असा काहीसा प्रकार इंग्लंडमध्ये हिंदुस्थानीयांसाठी निर्माण होऊ शकतो. इंग्लंडमधल्या या अस्थिर परिस्थितीचा कुशल हिंदुस्थानीयांना लाभ उचलण्याची ही नामी संधी मानली जात आहे. ब्रेक्झिटमुळे हिंदुस्थानाचे युरोपियन महासंघादरम्यानच्या मुक्त व्यापार करारासंदर्भातील चर्चेलाही पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे. ही चर्चा 2013नंतर थांबवण्यात आली होती. मुक्त व्यापार करार नसतानाही हिंदुस्थान आणि युरोपियन मगासंघामधील व्यापार सातत्याने वाढतो आहे. या दोघांमधील व्यापाराची उलाढाल 8,500 कोटींच्या घरात पोहोचली आहे. युरोपियन महासंघाच्या दृष्टीने हिंदुस्थान हा 9व्या क्रमांकावरचा सगळअयात मोठा व्यावसायिक भागीदार आहे. हिंदुस्थानीय निर्यातीचा विचार करायचा झाला तर इंग्लंडहा 5 व्या क्रमांकावरचा देश आहे. ब्रेक्झिटमुळे इंग्लंड आणि युरोपियन महासंघातील देशांमध्ये हिंदुस्थानींसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहे. हिंदुस्थानाना ही बाब ओळखून वेळेतच याबाबतवाटाघाटी आणि व्यापारी सौदे करणं गरजेचं आहे.
2015 साली झालेल्या निवडणुकांमध्ये डेव्हीड कॅमेरून यांनी युरोपातून येणारा लोकांचा लोंढा अडवणे आणि संपूर्ण युनायटेड किंगडमवर शासनाचे अधिपत्य मिळवणे हाच निवडणुकीतील मुख्य मुद्दा असेल असं जाहीर केलं होतं. जर त्यांनी ब्रेक्झिट जनमताचा मुद्दा हाती घेतला नसता तर त्यांना ही निवडणूक जिंकणं कठीण गेलं असतं. 2016 साली ब्रेक्झिटबाबत इंग्लंडच्या जनतेचं मत जाणून घेण्यासाठी मतदान घेण्यात आलं. 52 टक्के जनतेने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिला होता. उरलेल्या म्हणजे 48 टक्के जनतेने मात्र इंग्लंडने युरोपियन महासंघातच रहावे या बाजूने मतदान केलं होतं. आश्चर्याची बाब ही होती की, इंग्लंडची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडनमधील जनतेने युरोपियन महासंघातच रहावे, असा सूर लावला होता. ब्रेक्झिटबाबत निश्चित माहिती जनतेला मिळत नव्हती. स्पष्ट शब्दात सांगायचं झाल्यास इथल्या लोकप्रतिनिधींनी आणि राजकीय पक्षांनी जनतेची दिशाभूल केली असं म्हणायला हरकत नाही. ब्रेक्झिट समर्थकांनी ब्रेक्झिटमुळे इंग्लंड हा त्याच्या सगळ्या सीमांवर प्रभुत्व निर्माण करेल आणि बाहेरून येणारे लोकांचे लोंढे थांबवू शकेल असं चित्र निर्माण केलं. ब्रेक्झिटमुळे युरोपियन महासंघाला द्यावी लागणारी 350 दशलक्ष युरोची अजस्त्र फीदेखील द्यावी लागणार नाही असंही या नेत्यांनी जनतेला सांगत त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.
युरोपियन महासंघ आणि इंग्लंड यांनी ब्रेक्झिटचा निर्णय 31 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी त्यांच्या पक्षाचे खासदार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची (जेरेमी कॉर्बिन) मनवळवणीचे करण्याचे प्रयत्न करीत आहेत. थेरेसा मे ब्रेक्झिटमुळे निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी ही सगळी धावपळ करतायत. युरोपियन महासंघातून बाहेर पडायच्या प्रस्तावाला जर खासदारांनी पाठिंबा दिला तर युनायडेट किंगडम युरोपियन महासंघातून लवकर बाहेर पडू शकेल. 23 मे 2019 रोजी युरोपियन महासंघाच्या निवडणुका होणार आहेत. जर या निवडणुकीमध्ये इंग्लंडने भाग घेतला नाही तर 1 जून 2019 रोजी इंग्लंडला युरोपियन महासंघातून बाहेर पडावं लागेल. खरं पाहता इंग्लंड हा 29 मार्चला युरोपियन महासंघातून बाहेर पडणार होता. मात्र ही बाब 12 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ही बाब 31 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क आणि महासंघाचे इतर सदस्य आत्तापर्यंत इंग्लंड टोकाचे पाऊल उचलणार नाही अशा आशेवर आहेत.
ब्रेक्झिटबाबत इंग्लंडकडे निर्णय घेण्यासाठी आता 6 महिन्यांचा अवधी आहे. दरम्यानच्या काळात हुजूर पक्षाने जो सध्या सत्तेत आहे, त्याने मजूर पक्षाच्या म्हणजेच विरोधकांच्या मनवळवणीचे प्रयत्न सुरू केले आहेत. जेरेमी कॉर्बीन यांनी काहीतरी तडजोड करावी यासाठी सत्ताधारी पक्ष प्रयत्न करत आहे. जर विरोधक राजी झाले तर इंग्लंडला 23 तारखेच्या मतदानात भाग घेता येईल. नाहीतर त्यांना पर्यायी मार्गांचा विचार करावा लागेल. दोन्ही परिस्थितीमध्ये थेरेसा मे यांचा प्रयत्न असेल की महासंघातून बाहेर पडण्याचा त्यांनी तयार केलेला करार हा कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलता कामा नये. ब्रेक्झिटसाठीच्या नियमावलीमध्ये स्थलांतरणासाठीचा (महासंघापासून पूर्णपणे विभक्त होण्याचा कालावधी) काळ, वाद उदभवल्यास काढायचे तोडगे, आर्थिक तडजोडी,नागरिकांचे हक्क, बॅकस्टॉप करार (सध्या युनायटेड किंगडम आणि आयर्लंड हे युरोपियन युनियनच्या एकत्रित बाजारपेठेचा भाग आहेत आणि आयर्लंडची सीमा इंग्लंडसोबतच्या व्यापारासाठी खुली आहे. या कराराअंतर्गत इंग्लंड त्यांच्या सीमा आयर्लंडसोबत व्यापारासाठी बंद करेल. परिणामी ब्रेक्झिट झाल्यानंतर आयर्लंडची सीमा खुली नसल्यास ब्रिटनच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो) , मत्स्य व्यवसाय आणि भविष्यातील करार-मदार यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे ब्रेक्झिटबाबत विस्ताराने बोलणं हे गरजेचं आहे.
वाद उदभवल्यास काढायचे तोडगे
हे तोडगे काढणं अत्यंत गरजेचं आहे. कारण महासंघातून इंग्लंड बाहेर पडत असता वाद उद्भवण्याची दाट शक्यता आहे. हे तोडगे संयुक्त समितीमध्ये राजकीय सल्ल्यानुसारच काढले जाणं गरजेचं आहे. जर कराराचं उल्लंघन झालं तर लवाद आयोग आर्थिक दंड ठोठावू शकतो. युरोपियन महासंघाच्या अर्थसंकल्पासाठी इंग्लंडला युरोपियन महासंघाला जे शुल्क द्यावं लागतं ते डिसेंबर 2020 पर्यंत देणं बंधनकारक आहे. महासंघापासून विभक्त होताना नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. युरोपियन महासंघाच्या सदस्य देशांचे जवळपास 3 दशलक्ष नागरिक सध्या इंग्लंडमध्ये राहत आहेत. तसेच 1 दशलक्ष इंग्लंडचे नागरिक हे युरोपियन महासंघांमध्ये सहभागी देशांमध्ये राहात आहेत. या नागरिकांचे आरोग्य, निवृत्तीवेतन, सामाजिक सुरक्षेसारखे लाभ अबाधित राहणं गरजेचं आहे. जर ब्रेक्झिटची प्रक्रिया करारानुसार सुरू झाली तर ही प्रक्रिया मार्च 2020 पासून सुरू होईल आणि डिसेंब 2020पर्यंत सुरू राहील. या काळामध्ये इंग्लंड हा महासंघाचा भाग नसेल, त्याला कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही. याव्यतिरिक्त इतर नियम आहे तसे लागू राहतील. मात्र ब्रेक्झिटच्या कट्टर समर्थकांना अशा वेळी महासंघाकडून आलेले आदेश मानण्यामध्ये अपमानास्पद वाटण्याची दाट शक्यता आहे. भविष्यातील व्यापारासंदर्भात सौदे न झाल्यास वादाचा मुद्दा असलेला बॅकस्टॉप करार अस्तित्वात येईल. ब्रेक्झिटनंतरही महासंघांकडून इंग्लंडला पर्यावरण, सामाजिक सुरक्षा, राज्यांना दिली जाणारी मदत आणि कर याबाबतचे नियम इंग्लंडला कायम ठेवावे लागतील. ब्रेक्झिटचा इंग्लंडमधल्या उद्योगांना तोटा होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मासेमारीबाबत बोलायचं झाल्यास ती कोण करणार आणि किती प्रमाणात याबाबतचा निर्णय भविष्यातील वाटाघाटींमध्ये होऊ शकतो. इंग्लंड आणि युरोपियन महासंघामधले ब्रेक्झिटनंतर कसे संबंध असतील याबाबत ब्रेक्झिटनंतरच चर्चा होऊ शकेल.
जर तडजोडीच्या या मुद्दांमधून तोडगा निघाला नाही तर ब्रेक्झिटसाठी इतर पर्याय उपलब्ध आहेत ते खालीलप्रमाणे आहेत.
1. कोणत्याही कराराशिवाय ब्रेक्झिट (नो डिल ब्रेक्झिट) – जर पंतप्रधान थेरेसा मे यांनी युरोपियन महासत्तेशी केलेल्या वाटाघाटी खासदारांनी मान्य केल्या नाहीत तर ब्रेक्झिट करारातील अपेक्षित वाटाघाटी न करताच 23 मे 2019 ला इंग्लंड युरोपियन महासंघातून बाहेर पडू शकेल.
2. विरोधकांसोबत चर्चा- खासदारांना अपेक्षित असलेल्या वाटाघाटी- पंतप्रधान थेरेसा मेंनी केलेल्या वाटाघाटी खासदारांनी वेळोवेळी फेटाळल्या आहेत. परंतु ह्या वाटाघाटी खासदारांनी रद्द केल्या नाहीत. जर विरोधी पक्षनेते जेरेमी कोर्बिन यांनी या वाटाघाटींना मान्यता दिली नाही तर खासदारांना अपेक्षित असलेल्या वाटाघाटी पुन्हा एकदा सुरू होतील.
3. संपूर्ण नवीन ब्रेक्झिट करार – संपूर्ण नवीन ब्रेक्झिट करार ही देखील एक शक्यता नाकारता येत नाही. परंतु ह्या वाटाघाटी करून नवीन करार करण्याची प्रक्रियेला बराच वेळ लागू शकतो. आणि जर युरोपियन महासत्तेने नवीन करार करण्यास नकार दिला तर युनायटेड किंगडमला वेगळा विचार करावा लागेल.
4. पुन्हा जनमताचा कौल – अनेक खासदारांचे मत पुन्हा जनमत घ्यावे असे आहे. परंतु ह्या प्रक्रियेला 22 महिने लागू शकतात. आधीच लांबलेल्या प्रक्रियेला आणखी पुढे ढकलण्यात अर्थ नाही.
5. नवे मतदान – पंतप्रधान थेरेसा मे नवे मतदान घडवून आणू शकतात. त्यांना कायद्याने नवीन मतदान घडवण्याचा अधिकार नाही, परंतु त्या खासदारांनी मतदान घडवून आणावे अशी मागणी करू शकतात.
6. अविश्वास ठराव – विरोधक म्हणजेच मजूर पक्षाचे खासदार सरकार विरोधात अविश्वास ठराव आणू शकतात.
7. ब्रेक्झिट रद्दबातल करणे – ब्रेक्झिट रद्द होणार की काय अशी शंका निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. युरोपियन न्यायालयाने सुचवले होते की ब्रेक्झिट संबंधित आर्टिकल 50 परत घेतल्यास ब्रेक्झिट रद्द करण्यात येऊ शकते.
8. पंतप्रधान थेरेसा मे यांचा राजीनामा- थेरीसा मे यांच्या नेतृत्वावर प्रश्न उभे राहिले आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा असा सूर त्यांच्याच पक्षातील काही खासदारांनी आणि मी केलेल्या वाटाघाटींवर आधारित ब्रेक्झिट खासदारांनी स्वीकारल्यास मी राजीनामा देईन अशी घोषणा थेरेसा मे यांनी केली आहे. जर त्यांच्याविरूद्ध अविश्वासाचा ठराव मान्य झाल्यास किंवा त्यांनी राजीनामा दिल्यास, नवा पक्ष किंवा नवीन पंतप्रधान सत्तेवर येऊ शकतो. परंतु कोणत्याही परिस्थितीतही ब्रेक्झिटचा तिढा सोडवणं महत्त्वाचं आहे.
(लेखिका लंडनस्थित शिक्षिका, अभ्यासक आणि संशोधक आहेत.)


























































