ध्यास वैविध्येतचा

41

>> आसावरी जोशी

रोहिणी हट्टंगडी. सदाबहार अभिनेत्री. सतत नवतेच्या… विविधतेच्या शोधात… यातूनच त्या मराठी चित्रपटात नवा प्रयोग करीत आहेत. प्रथमच एक अभिनेत्री पुरुष व्यक्तिरेखा साकारते आहे. एका आजोबांच्या व्यक्तिरेखेतून रोहिणीताई आपल्यासमोर येत आहेत… यानिमित्ताने त्यांच्याशी गप्पा…

खूप वेगवेगळय़ा भूमिका हे त्यांचे वैशिष्टय़… लख्ख गोरा वर्ण, गालाला पडणारी खळी, एक छान सुबक व्यक्तिमत्त्व, लौकिकार्थाने सुंदर नाही, तरी डोळय़ातील बुद्धिमत्तेची चमक, अत्यंत स्पष्ट शुद्ध उच्चार… उजव्या ओठाच्या कोपऱयातून हसत लडिवाळ बोलणे.. आपल्याला एक छानशी खळी पडते याची रास्त जाणीव.. आणि ती योग्यवेळी सहज दाखवण्याची हातोटी…

रोहिणी हट्टंगडींविषयी बोलतेय मी. कस्तुरबाच्या भूमिकेत मी पहिल्यांदा रोहिणीताईंना पाहिले. खूप कमी संवाद. अत्यंत विचारपूर्वक केलेली संवादफेक. जे काही सांगायचे ते डोळय़ातून. कसदार अभिनयाचे संस्कार रोहिणीताईंच्या देहबोलीतून सहजच जाणवतात. वयाच्या 27व्या वर्षी ‘कस्तुरबा’ केली मी… रोहिणीताई सांगत होत्या. त्यातून त्याच त्याच प्रकारच्या व्यक्तिरेखा करण्यासाठी समोर येऊ लागल्या. त्यामुळे कारकीर्दीच्या सुरुवातीलाच माझा ‘आदर्श आई’ म्हणून उलट प्रवास सुरू झाला आणि तेव्हा नेमका आईचा स्लॉट रिकामा झाला होता. यातून खूप लवकर मी हिंदीत आणि चित्रपटांत व्यस्त झाले आणि माझे मराठी नाटक मागे पडू लागले.

खरे पाहता अत्यंत ठाशीव असे रंगभूमीचे संस्कार रोहिणीताईना घरातून बाळकडूसारखे मिळालेले. कारण आईवडिलांपासून सारे कुटुंबच नाटकप्रेमी. या साऱया कुटुंबाने मिळून ‘गावगुंड’ हे मराठी नाटक केले होते, पण मराठी नाटकांपासून त्या थोडय़ा लांब गेल्या तरी रंगभूमीपासून रोहिणीताई कधीच दूर गेल्या नाहीत. गुजराती, हिंदी रंगभूमीतून त्या सतत नाटक करीत राहिल्या. एनएसडी माझा पाया आहे आणि नाटक माझी पहिली आवड. खूप मनापासून रोहिणीताई सांगतात. गुजरातच्या रस्त्यावरून जाताना एकदा एक जाहिरातीचा फलक त्यांनी पाहिला. कोकाकोलाची ती जाहिरात गुजराती भाषेतून केली होती. ही जाहिरात रोहिणीताईंनी ‘डोडाडोला’ अशी वाचली. येथे त्यांची गुजरातीशी पहिली अक्षरओळख झाली.

खऱया कलावंताला भाषेचे बंधन कधीच नसते हे त्यांनी आपल्या विविधरंगी आणि विविध भाषिक भूमिकांमधून सतत सिद्ध केले. पहिला चित्रपट कन्नड. तो त्यांनी भाषेचे एक आव्हान म्हणून स्वीकारला. मला आव्हाने स्वीकारायला आवडतात… रोहिणीताई म्हणाल्या. या आवडीतूनच त्यांनी एका नव्या भूमिकेत प्रवेश केला आहे. आजपर्यंत चित्रपटसृष्टीत अनेक पुरुषांनी स्त्रीभूमिका केल्या आहेत. आज मात्र थोडे उलट होते आहे. रोहिणी हट्टंगडी एका आजोबांच्या भूमिकेतून आपल्यासमोर येत आहेत.

माझ्या ध्यानीमनीही नव्हते अशी भूमिका माझ्या वाटय़ाला येईल. रोहिणीताई सांगत होत्या. पण दिग्दर्शकाकडून या व्यक्तिरेखेची विचारणा झाली हे आजोबा स्वतःच्याच विश्वात वावरणारे एक व्यक्तिमत्त्व आहे. पुलंच्या हरितात्या या व्यक्तिरेखेची मला येथे आठवण होते. या चित्रपटात मी दोन वेगवेगळय़ा काळात वावरले आहे. महाराणी आणि आजोबा. रोहिणीताई सांगत होत्या. पुरुष व्यक्तिरेखेत मी खूप मोकळेपणाने वावरले. स्त्राrच्या लकबी येऊ नयेत याची काळजी घेतली. हसण्याची पद्धत बदलली. माझी गालावरची खळी हसताना दिसू नये म्हणूनही मी सतर्क होते. त्या हसत हसत सांगतात. बोलता बोलता हळूच त्यांनी टिप्पणी केली. एरव्ही आम्हाला जाडेपणा लपवायला लागतो; पण आजोबा साकारताना मला तसा काहीच प्रश्न आला नाही.. मेकअपला आम्हाला तीन तास लागायचे आणि काढायला दोन तास. मेकअप केल्यानंतर मला काही खाता यायचे नाही. मग तहान भूक एकदम चित्रीकरणानंतरच.

रोहिणीताईंनी वैविध्याच्या ओढीतूनच चालबाजसारखा तद्दन व्यावसायिक चित्रपट स्वीकारला. यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, मी विनोदी भूमिकाही केल्या आहेत. प्रेक्षकांना हसवणे हे नेहमीच एक आव्हानात्मक काम असते. यातून मी चालबाज, मालिका करमचंद आणि नासिरुद्दीनबरोबर ‘जलवा’ हा चित्रपटही केला.

आजच्या मालिकांचेही तसेच आहे. यातील वेगवेगळय़ा व्यक्तिरेखा रोहिणीताई एक बदल, आजच्या काळासोबत राहण्याच्या ओढीतूनच स्वीकारतात. मला माझ्या सगळय़ा व्यक्तिरेखा खूप आवडतात. इतर मालिकाही त्या आवडीने पाहतात. मराठी रंगभूमीपासून मी कधीच लांब जाऊ शकत नाही. नाटय़वलयमुळे आम्ही तिच्याशी जोडलेलोच आहोत. आजच्या मराठी रंगभूमीचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे. ‘देवबाभळी’सारखे प्रयोग खरंच सुखावणारे आहेत; त्याचबरोबर प्रायोगिक रंगभूमीवरही विविध प्रयोग होत असताना अजूनही प्रायोगिकता आपल्या कलेसाठी जागाच शोधते आहे. तिला पृथ्वीसारखे हक्काचे व्यासपीठ कधी मिळेल, हा प्रश्नही त्या विचारतात. छबिलदास चळवळीतून अनेक प्रकारची नाटके केली. तसा हब आमच्या प्रायोगिक चळवळीला मिळाला पाहिजे. तालमीबाहेरच्या गप्पांमधूनच नवा विचार सुचतो.

आज रोहिणीताई मालिका, चित्रपट दोन्ही माध्यमे मस्त एन्जॉय करताहेत. मी हाडाची अभिनेत्री आहे त्यामुळे दिग्दर्शन सध्या तरी नकोच.. आपली स्वयंपाकाची आवडही त्यांनी जोपासली आहे.. सेटवर त्यांच्या हातची भरली कारली, कारल्याची आंबटगोड भाजी सगळ्यांनाच आवडते. असिमसाठी अळूची भाजी करायला आवडते, स्वतःसाठी रम केक करायला, खायला आणि खिलवायलाही आवडतो.
एका दिलखुलास अभिनेत्रीशी गप्पा मारल्याचा प्रत्यय मला वारंवार येत होता. आपल्या आवडणाऱया गोष्टीचा मनापासून ध्यास.. त्याचा तितकाच सखोल अभ्यास.. काळासोबत सहज
राहण्याची वृत्ती.. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगण्यावर भरभरून प्रेम करण्याचा आनंदी स्वभाव यातूनच त्यांचा प्रत्येक अभिनय फुलत असावा.. जिवंत होत असावा.

आपली प्रतिक्रिया द्या