हल्ले श्रीलंकेत, धोका जगाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर

ईस्टर संडेच्या रविवारी श्रीलंकेत झालेला आत्मघाती हल्ला पूर्वनियोजित होता आणि हे स्फोट घडवण्यासाठी जाणीवपूर्वक ईस्टर संडेचा दिवस निवडण्यात आला. तसेच यासाठीची ठिकाणेही पूर्वनियोजित होती. या संपूर्ण प्रकाराला धार्मिक दहशतवादाचा प्रकार म्हणता येईल. हा दहशतवाद धार्मिक मूलतत्त्ववादाने प्रभावित असतो. विविध धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे हाच या हल्ल्यांमागचा उद्देश असतो. दहशतवादी संघटनांची हिंमत वाढण्याचे कारण काही देशांकडून दहशतवादी संघटनांना समर्थन मिळत आहे. पण दहशतवादाबाबत जगभरात एकजूट होत नसल्यामुळे या संघटनांचे फावते आहे. आज दक्षिण आशियातील कोणताही देश धर्मांधतेपासून सुरक्षित राहिलेला नाही. ही धोक्याची घंटा आहे.

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील तीन चर्च आणि तीन पंचतारांकित हॉटेल्समध्ये झालेल्या एकूण आठ साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण जग हादरून गेले. ख्रिश्चन धर्मीयांचा अत्यंत पवित्र सण असणाऱया ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या या भीषण स्फोटांमध्ये सुमारे 359 जणांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. श्रीलंकेमध्ये अशा प्रकारचा भीषण हल्ला पहिल्यांदाच झाला आहे. मागील काळात श्रीलंकेमध्ये 30 वर्षे यादवी युद्ध सुरू होते. हे युद्ध लिट्टे (लिबरेशन ऑफ टायगर तमिळ इलम) आणि सिंहली यांच्यादरम्यान होते. त्यावेळी लिट्टेsकडून 1996 च्या दरम्यान असे बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते, मात्र त्यातील मृतांचा आकडा 80 ते 90 इतका होता. रविवारच्या भयंकर स्फोटातील जीवितहानी मात्र त्याहून खूप मोठी आहे. 2019 या नव्या वर्षातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.

श्रीलंकेतील हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि हे स्फोट घडवण्यासाठी जाणीवपूर्वक ईस्टर संडेचा दिवस निवडण्यात आला. तसेच यासाठीची स्थळेही पूर्वनियोजित होती. या संपूर्ण प्रकाराला धार्मिक दहशतवादाचा प्रकार म्हणता येईल. काही आठवडय़ांपूर्वी शांतताप्रेमी देश म्हणून जगभरात सुप्रसिद्ध असणाऱया न्यूझीलंडमध्ये मशिदींवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचे थेट लाइव्ह चित्रण समाजमाध्यमांवर प्रसारित केले होते. कोलंबोमधील हल्ल्ल्यांचा विचार करता यासंदर्भात हिंदुस्थानच्या गुप्तहेर यंत्रणांनी 11 एप्रिलला याबाबत श्रीलंकेला सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये श्रीलंकेतील विविध चर्चवर आणि हिंदुस्थानी दूतावासावर हल्ला होण्याची शक्यता असल्याचे कळवले होते. एवढेच नाही तर एका संघटनेचे नावही घेतले होते. ही संघटना अत्यंत कट्टर मूलतत्त्ववादी मुस्लिम धार्मिक संघटना असून ‘नॅशनल तौहिद जमात’ असे तिचे नाव आहे. ही संघटना श्रीलंकेमधील धार्मिक मूलतत्त्ववादी कट्टर धर्मांध संघटना आहे. श्रीलंकेच्या पूर्वेकडील भागात या संघटनेने मोठे जाळे विणलेले आहे. या संघटनेने 100 हून अधिक श्रीलंकन तरुणांना इसिस संघटनेला जाऊन मिळण्यास प्रवृत्त केले होते. श्रीलंकेत हा एक विक्रम मानला जातो. 2017-18 मध्ये श्रीलंकेमध्ये बौद्ध आणि मुसलमान यांच्यात ज्या जातीय दंगली झाल्या त्यात या संघटनेची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. या संघटनेकडून घातपाती कारवाया घडवल्या जाऊ शकतात, असा इशारा हिंदुस्थानने दिला होता, पण श्रीलंकेने त्याकडे दुर्लक्ष केले. 13 -14 एप्रिल रोजी श्रीलंकेचा राष्ट्रीय दिवस असतो आणि त्यानंतर गुड फ्रायडे, ईस्टर संडे या सणांची लगबग असतो. त्या सर्व तयारीमध्ये असल्यामुळे कदाचित या इशाऱयाकडे श्रीलंकेचे दुर्लक्ष झाले, पण हिंदुस्थानचा इशारा खरा ठरला.

श्रीलंकेतील साखळी स्फोटांमधून आपल्याला काही प्रवाह स्पष्ट होतात. पहिला प्रवाह म्हणजे इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने आपले केंद्र पश्चिम आशियाकडून दक्षिण आशियाकडे सरकवले आहे. ही संघटना आता इराक आणि सीरियातून हद्दपार झाली आहे. परिणामी, इसिसला आता नवे योद्धे हवे आहेत. त्यांना नवी भरती करायची आहे. त्यासाठी ते दक्षिण आशियामधील गरीब देशांना लक्ष्य करताहेत. अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका या देशांमधील गरीब मुसलमानांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताहेत. मालदीव आणि श्रीलंकेमध्ये हा प्रकार अधिक आहे. श्रीलंकेत मूलतत्त्ववादाचे जे लोण पसरले आहे त्याचे श्रेय सर्वस्वी पाकिस्तानला जाते. राजेपक्षे यांच्या काळात श्रीलंकेत चीनचा प्रभाव वाढला होता. त्याच काळात श्रीलंकेने पाकिस्तानबरोबर एक करार केला होता. त्यानुसार पारपत्राशिवाय पाकिस्तानी नागरिकांना श्रीलंकेत येण्याची अनुमती देण्यात आली. याचा पाकिस्तानने दुरुपयोग केला. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने आता सावध राहणे गरजेचे आहे. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय तपास समितीने गेल्या आठवडय़ात देशभरात चार ठिकाणी छापे घातले होते. वर्धा, हैदराबाद, केरळ आदी ठिकाणी टाकलेल्या या छाप्यांमधून इसिस संघटनेशी संबंधित काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. त्यातील माहितीनुसार हिंदुस्थानातही अशा स्वरूपाने बॉम्बहल्ला करण्याची तयारी होती असे समोर आले आहे. त्याच आधारावर हिंदुस्थानने श्रीलंकेला सूचक इशारा दिला. सध्या हिंदुस्थानात निवडणुकीचा काळ आहे. सर्वच सुरक्षा यंत्रणा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी व्यग्र असल्यामुळे आपण सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे.

यासंदर्भात अलीकडेच घडलेली एक घडामोड येथे लक्षात घ्यायला हवी. फ्रान्स या देशाने संयुक्त राष्ट्र परिषदेत एक ठराव मांडला आहे. त्यानुसार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱया देशांवर आर्थिक निर्बंध लादले जावेत अशी तरतूद करण्याची गरज प्रतिपादित करण्यात आली आहे. या ठरावाला सर्व देशांनी समर्थन दिले पाहिजे तरच या देशांच्या नाडय़ा आवळल्या जातील. जागतिक महासत्तांसह विविध देशांनी दहशतवादाच्या मुद्दय़ावर राजकारण करणे थांबवले पाहिजे. आज दहशतवादाच्या 200 हून अधिक व्याख्या आहेत. प्रत्येक देश आपल्या दृष्टिकोनातून दहशतवादाकडे पाहत आहे. जागतिक पातळीवर याबाबत एकवाक्यता नसल्याने दहशतवाद्यांचे फावते आहे.

कोलंबोमधील हल्ल्याची खूप मोठी किंमत श्रीलंकेला चुकवावी लागणार आहे. तिथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, पण आता येणाऱया काळात या देशाला कदाचित मोठय़ा राजकीय पेचप्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. आज श्रीलंकेत चीन, पाकिस्तानसह अनेक देश पाय पसरण्याचा प्रयत्न करताहेत. विशेष म्हणजे श्रीलंकेची अर्थव्यवस्था आर्थिक डबघाईला आलेली आहे. या देशावर जीडीपीच्या 80 टक्के कर्ज आहे. या कर्जातून बाहेर पडण्यासाठी युरोपिय देशांकडून मदत घेतली जात आहे. अमेरिका श्रीलंकेला आर्थिक मदत करत आहे. हा हल्ला परतवण्यात श्रीलंका अपयशी ठरल्याने त्यांना मिळणाऱया मदतीवर परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे मानवाधिकार उल्लंघनाबाबत श्रीलंका प्रकाशझोतात आला आहे. या मुद्दय़ावरून श्रीलंकेवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढू शकतो हे विसरता येणार आहे.

दहशतवादाचे ‘लाँचपॅड’
श्रीलंका, मालदीव हे इस्लामी दहशतवादाचे ‘लाँचपॅड’ असू शकतात. दहशतवादी ज्या देशांमध्ये अस्थिरता आहे त्याच देशांची निवड करतात. अशा देशात जाळे पसरवून तिथे केंद्र करून इतर ठिकाणी हल्ले करण्याचा दहशतवादी संघटनांचा इरादा आहे. श्रीलंकेचे हिंदी महासागरातील स्थान पाहता तिथे जिहादींनी आपला कब्जा केला तर ते दक्षिण-पूर्व आशियामध्येही हल्ले करू शकतात, दक्षिण आशियात हल्ले करू शकतात. त्यामुळे श्रीलंकेसह अनेक देशांनी येणाऱया काळात अत्यंत सतर्क आणि सजग राहण्याची गरज आहे. या दहशतवादी हल्ल्यातून पुन्हा एकदा धार्मिक दहशतवादाचा उग्र चेहरा समोर आला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता अशा हल्ल्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वसहमतीने आणि एकजुटीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
(लेखक परराष्ट्रधोरण विश्लेषक आहेत.)