श्री त्र्यंबकेश्वर : दक्षिणेची काशी मानले जाणारे मंदिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निळकंठ कुलकर्णी

सह्याद्रीशीर्षे विमले वसन्त गोदावरितीरपवित्रदेशे । यदर्शनात पातकं पाशु नाशं प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे ।।

शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगामध्ये त्र्यंबकेश्वरचा समावेश होतो. दक्षिणेची काशी मानले जाणारे हे मंदिर नाशिक पासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. ज्योतिर्लिंग स्तोत्रात ही त्र्यंबकम गौतमी -तटे असे म्हणून त्र्यंबकेश्वराचा उल्लेख केला आहे. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जाते याच पर्वतावर पवित्र गोदावरी नदी उगम पावते.

येथे सिहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाण अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्य स्थानी आहेत. याच तीन आखड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर आहे.

कथा –

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग सर्वात अद्भुत आहे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे याचे तीन मुख आहेत. एक भगवान ब्रह्मा, एक भगवान विष्णू, एक भगवान रुद्राचे रूप मानलं जातं. भव्य व सुंदर त्र्यंबकेश्वर मंदिराची इमारत सिंधू आर्यशैलीचा अद्भुत नमुना आहे. या मंदिराच्या आतमध्ये एक गर्भगृह आहे. त्याच्या आतमध्ये प्रवेश करताच समोर शिवलिंग डोळ्यासमोर दिसते. जर लक्षपूर्वक बघितलं तर त्या लिंगाचे एक इंचाचे तीन लिंग दिसतात या तिन्ही लिंगाणा त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार मानला जातो.

शास्त्रांच्या अनुसार एकदा महर्षी गौतमांच्या तपोवनामध्ये राहणाऱ्या ब्राह्मणाच्या पत्नी कोणत्यातरी गोष्टीवरून गौतम ऋषी त्यांच्या पत्नी अहल्या देवी यांच्यावर नाराज झाल्या आणि त्या पत्नींना आपल्या नवऱ्याना गौतम ऋषींना अपमानित करण्यासाठी प्रेरित केले. त्यासाठी त्या ब्राह्मणांनी भगवान गणेशाची आराधना केली आणि भगवान गणेश त्यांना प्रसन्न झाला. त्यांनी वर मागा असं ब्राह्मणांना सांगितलं  तर त्यांनी सांगितलं की, प्रभू तुम्ही गौतम ऋषींना या आश्रमातून बाहेर काढा. गणेशांना विवश होऊन त्यांच मागणं ऐकावं लागलं. तेव्हा गणेशांनी एका दुर्बळ गायीच्या रूपामध्ये येऊन गौतम ऋषींच्या शेतातील पीक खाऊ लागले तेव्हा गौतम ऋषी तिथे पोहचले आणि तृणांच्या मुठीने त्याला हटवायला लागले. तृणांच्या स्पर्शातून ती गाय जमिनीवर पडली आणि ऋषींच्या समोर मरण पावली .त्यावेळी सर्व ब्राह्मण एकत्रित आले आणि गायीची हत्या केली म्हणून गौतम ऋषींना अपमानित करू लागले. या परिस्थितीला बघून गौतम ऋषींनी त्या ब्राह्मणांना याच प्रायश्चित्त विचारलं. तेव्हा त्या ब्राह्मणांनी गौतम ऋषींना सांगितलं. पाप केल्यामुळे तुम्ही तीन वेळा पृथ्वीची परिक्रमा करा आणि पुन्हा येऊन इथे एक महिन्यापर्यंत व्रत करा. यानंतर ब्रह्मगिरी वर शंभर वेळा फिरायचं, तेव्हाच तुमची शुद्धी होईल. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर गंगा नदीचे जल आणून त्या जलाने स्नान करून एक कोटी पार्थिव शिवलिंग करून भगवान शंकराची आराधना करा, या नंतर गंगेमध्ये जाऊन स्नान करून पुन्हा शंभर घागरीने पार्थिव शिवलिंगांना स्नान घाला. यामुळे पाप नष्ट होईल.

गौतम ऋषींनी कठोर प्रायश्चित्त केलं आणि त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले आणि वर माग अस म्हणाले. तेव्हा गौतम ऋषींनी त्यांना गोहत्या पापातून मुक्त करा, अस सांगितलं. तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं की, तू गौतम सर्वदा निष्पाप आहेस. गो हत्येचे पाप तुझ्यावर छळ करून लावले गेले आहे. हे केलं म्हणून मी आता तुमच्या आश्रमातील ब्राह्मणांना दंड देणार आहे. यावर महर्षि गौतम म्हणाले, त्यांच्यामुळेच तुमचं दर्शन झालं. त्यांच्यावर तुम्ही क्रोधीत होऊ नकात. तेव्हा सर्व ऋषीमुनी आणि देव तसेच गंगा सर्व उपस्थित होऊन सर्वांनी भगवान शंकरांना सदा सर्वदा इथेच वास करण्याची प्रार्थना केली. सर्वांच्या प्रार्थनेने भगवान शंकर तेथेच गौतमीतटावर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये प्रतिष्ठित झाले.

ऐतिहासिक माहिती –

हे स्थान प्राचीन आहे. सुमारे 200 वर्षपूर्वी यास ‘श्रीपुर’ व ब्रह्मगिरी श्रीगड असे म्हटले जाई. सातवाहन काळात ठाकूर जातींपैकी शीद राजघराण्याचा ऐतिहासिक ताम्रपटात हा उल्लेख आढळतो. या ठिकाणी यादवांचे राज्य इ.स 1271 ते इ .स 1308 पर्यंत होते. इ.स 1818 मध्ये ब्रिटिशांचा अंमल या ठिकाणी सुरू झाला. दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली त्यातील हे एक शिवालय आहे.

([email protected])