
>>नीलेश कुलकर्णी
आयुष्यातील सर्वात मोठी राजकीय लढाई लढत असलेल्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बंगालचे ऐतिहासिक रण जिंकणार काय? हा सर्वात महत्त्वाचा सवाल सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. 2011 मध्ये डाव्या पक्षांची 34 वर्षांची निर्विवाद सत्ता उलथून टाकून ममता दीदींनी राजकीय क्रांती केली होती. 2011 मध्ये ‘डाव्यांना हद्दपार करा’, असे म्हणणाऱ्या ममता बॅनर्जी 2026 मध्ये भाजपला बंगालमध्ये ‘नो एंट्री करा’ असे आवाहन करत आहेत.
प.बंगाल विधानसभेची लढाई यावेळी ममतांसाठी वाटते तितकी सोपी नाही. पंधरा वर्षांत साचलेली अँटी इन्कमबन्सी, केवळ दोन टप्प्यांत होत असलेले मतदान, कायदा-सुव्यवस्था, बेरोजगारी, विकास या मुद्दय़ांसोबतच ‘एसआयआर’चा सर्वात मोठा मुद्दा त्यांच्यापुढे आव्हान म्हणून उभा ठाकलेला आहे. त्यात ‘एसआयआर’च्या अंतिम सूचीतून तब्बल 63 लाख 66 हजार मतदारांची नावे वगळली गेली आहेत. तसेच किमान 60 लाखांच्या आसपास मतदार चौकशीच्या फेऱ्यात आहेत. वगळली गेलेली बहुतांश मते मुस्लिमांची व बांगलादेशी घुसखोरांची आहेत, असा भाजपचा दावा आहे.
तृणमूल काँगेसचा बंगालच्या शहरी भागांवर चांगला प्रभाव आहे. मात्र पीडीएस स्पॅम, टीचर स्पॅम यासह अनेक घोटाळ्यांमुळे ममतांच्या छबीवर फरक पडला आहे. ममता दीदींवर आजवर वैयक्तिक भ्रष्टाचाराचा आरोप लागलेला नसला तरी त्यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप झाले आहेत. त्यामुळे शहरी भागांत यावेळी दीदींबद्दल नाराजी दिसून येते. वक्फचा कायदा बंगालमध्ये लागू होऊ देणार नाही, एसआयआर होऊ देणार नाही, या घोषणा ममतांनी केल्या होत्या. त्या फोल ठरल्याने तृणमूलचा ‘कोअर व्होटर’ मुस्लिम समाज नाराज आहे. भाजपची ‘बी’ टीम म्हणून कोणा एका पक्षाने मुस्लिम व्होट बँकेत विभाजन केले तर ममतांची वाट अधिक कटकटीची होईल. डावे पक्ष व काँग्रेसचे प्रदर्शन कसे राहते, यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत. ममतांच्या विरोधात भाजपने उभे केलेली सगळीच प्यादी सपशेल अपयशी ठरलेली आहेत. बंगालच्या राजकारणातले चाणक्य मुकुल राय यांच्याविना पहिल्यांदाच बंगालची निवडणूक होत आहे. त्यांची उणीव तृणमूल व भाजप या दोन्ही पक्षांना जाणवेल. ममता बॅनर्जींनी बंगालचे रण जिंकले तर त्यांच्या ‘विजयाचा शंखनाद’ केवळ बंगालच्या खाडीपुरता मर्यादित राहणार नाही, तो दिल्लीपर्यंत येऊन पोहोचेल.
हुड्डांनी लाज राखली
राज्यसभा निवडणुकीत हरयाणा व ओडिशामध्ये काँगेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग करून पक्षनेतृत्वापुढच्या अडचणी वाढवल्या आहेत. संसदेत काँग्रेसची विरोधी पक्ष म्हणून चांगली कामगिरी होत आहे. विरोधी पक्षनेते बनल्यापासून राहुल गांधींच्या कामगिरीत विलक्षण प्रगती झालेली आहे. प्रियंका गांधी लोकसभेत सक्रिय सहभाग घेतात. देशभरात नरेंद्र मोदी सरकारविरोधात आक्रोश, संतापाची भावना असताना त्यावर पाणी फेरण्याचे पातक काही काँगेसजनच करतात, हे त्या पक्षाचे दुर्दैव! त्याचा प्रत्यय राज्यसभा निवडणुकीत आला. हरयाणामध्ये दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या भूपिंदरसिंग हुड्डा यांना अक्षरक्षः पोलिंग एजंट म्हणून या निवडणुकीत डोळ्यात तेल घालून काम करावे लागले. हरयाणात काँग्रेसचे 37 आमदार आहेत. इनोलोच्या दोन आमदारांनी निवडणूक प्रकियेत सहभाग घेतला नाही. म्हणून जिंकण्यासाठी 31 मतांची आवश्यकता असताना बौद्ध यांना फक्त 28 मते पडली. पाच आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. एकूण चार मते बाद झाली. या निवडणुकीत काँग्रेस हायकमांडने प्रदेश नेतृत्वाने विरोध केलेला असतानाही सरकारी अधिकारी म्हणून रिटायर झालेल्या व काँग्रेसची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या करमबीर बौद्ध यांना उमेदवारी दिली. ही उमेदवारी जाहीर झाल्यावरच त्याला तीव्र विरोध झाला होता. मात्र राहुल गांधी बौद्ध यांच्या उमेदवारीवर ठाम राहिले. त्यामुळे झाले हे की वयाच्या 78 व्या वर्षी हुड्डा यांना रात्रीचा दिवस करत काँगेस उमेदवाराला निवडून आणावे लागले. त्यात त्यांची व त्यांच्या पक्षाची झालेली दमछाक व फटफजिती सगळ्यांनी पाहिली. बौद्ध यांना मतदान न करणाऱ्यांमध्ये काँग्रेस नेत्या कुमारी सेलजा यांचे समर्थक आमदार असल्याचे समजते. त्यावरून पुन्हा हुड्डा व सेलजा यांच्यात जुंपेल, यात वादच नाही. मात्र काँगेसने असले वाद वाढविण्याऐवजी वेळीच मिटवायचे काम केले पाहिजे. हुड्डांनी हरयाणात काँग्रेसचे अब्रूरक्षण केले हे खरेच.
राज्यसभेतला ‘लव्ह ट्रँगल’
सत्ताधारी व विरोधकांमधील वादावादीने नेहमीच राज्यसभेचे कामकाज गाजते. राज्यसभेत आणि एकूणच संसदीय राजकारणात हास्यविनोद, कोपरखळ्या, टोले, टोमणे याची ही नजाकत होती ती 2014 नंतर हळूहळू लुप्त झाली. मात्र बुधवारी राज्यसभेने संसदीय राजकारणातील खेळीमेळीच्या वातावरणाची अुनभूती अनुभवली. सभागृहातील 59 सदस्यांना निरोप देण्यात आला. त्यात देशाचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, शरद पवार, दिग्विजयसिंग, रामदास आठवले यांचा समावेश होता. यापैकी पवार-आठवले यांची फेरनिवड झाली. त्यामुळे राज्यसभेत खुमासदार भाषणे रंगली. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंच्याच गृहराज्यातून देवेगौडा येतात. कर्नाटकचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधानपद भूषविण्याचा पराक्रम देवेगौडांनी केला. खरगेही कर्नाटकातले महत्त्वाचे नेते. दोन्ही नेत्यांच्या विचारधारा त्या अर्थाने सेक्युलर. मात्र देवेगौडांना आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या नातवांच्या पराक्रमामुळे भाजपशी सूत जुळवून घ्यावे लागले. तो धागा पकडत खरगेंनी ‘प्रेमालाप आमच्यासोबत केला, लग्नाचा मुहूर्तही काढला, मात्र वरमाला भाजपच्या गळ्यात घातली,’ अशी टिप्पणी करताच सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. शीघ्रकवी रामदास आठवलेंनी आता परत राज्यसभा मिळाल्याने पंतप्रधानांवरील कवितांची संख्या कमी करावी, असा सल्लाही खरगेंनी आठवलेंना दिला. आठवलेंनी त्याला कवितेतूनच उत्तर दिले. पंतप्रधानांनी यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांचे तोंडभरून काwतुक केले हे विशेष. देवेगौडा, खरगे, शरद पवार व दिग्विजयसिंग यांच्या संसदीय राजकारणातल्या बांधीलकीचे पुढच्या पिढीने अनुकरण करावे, असे सांगितले. भाषणांत पंतप्रधान म्हणाले ते खरेच आहे. राजकारणात पूर्णविराम हा कधीच नसतो.




























































