चिंतनशील रंगकर्मी रंगभूमीचा वेध घेताना नटवर्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आदिनाथ हरवंदे

डॉ. श्रीराम लागूंचं चिरंतन स्मरण होत राहील. त्यांच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडणाऱया ‘लमाण’ या ग्रंथाचं या वेळी स्मरण होणं अपरिहार्य आहे.

लमाण हा ग्रंथ म्हणजे मराठी रंगभूमीला आणि पर्यायाने मराठी वाङ्मयाला मिळालेली अमूल्य देणगी आहे. अभिनयातील सखोलता आणि भूमिकेची पक्की जाण अशा गुणांमुळे मराठी रंगभूमीवर तसेच हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीवर स्वतःचा ठसा उमटवणारा हा प्रज्ञावान नट होता. त्यांची अनेक नाटकं पाहण्याचा योग मला मिळाला. त्यांच्या नाटकांमुळे रंगभूमीविषयी पुष्कळ काही शिकायला मिळालं. थिएटर युनिट, इप्टा, रंगायन, आविष्कार आणि छबिलदासची प्रायोगिक रंगभूमी त्यांची नाटकं पाहताना आम्ही विद्यार्थी होत असू. छबिलदासमध्ये डॉ. लागूंनी केलेलं ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ हे नाटक अद्यापि मनात घर करून आहे.

डॉ. लागूंचा रंगभूमीचा सखोल अभ्यास होता. अशा ज्ञानी रंगकर्मीने आपल्या नाटय़प्रवासाविषयी ग्रंथ लिहावा हा फार मोठा योग आहे. नाटय़पेमी वाचकाला तर नाटय़विषयक अभ्यास करण्याची ही एक संधी लाभली.

‘लमाण’ म्हणजे ‘इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे’ असं ज्येष्ठ नाटककार वि.वा. शिरवाडकर यांचं वाक्य पुस्तकाच्या प्रारंभी आहे. ही अत्यंत विनम्र भूमिका डॉक्टर लागूंनी घेतली आहे. नाटककाराला अभिप्रेमी असलेला मतितार्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा हे वाहकाचं काम रंगकमींने करायचं असं डॉक्टरांना सुचवायचं आहे. वाचताना हे सोपं वाटतं. इकडचा माल तिकडे फेकताही येतो; परंतु सुजाण वाहक दुसरीकडे ठेवताना त्या मालाची आकर्षक मांडणी करतो. कल्पकता वापरतो. बुद्धिकौशल्य वापरतो हे लक्षात घेतलं तर डॉक्टरांनी ते वाक्य उद्धृत करून गहन अर्थ सांगितला आहे.

डॉ. लागूंनी पाश्चात्य रंगभूमीविषयी लिहिताना कॅनडाचा उल्लेख केला आहे. कॅनडात लंडन नावाचं एक गाव आहे. त्या गावातील शेक्सपिअर नावाच्या नाटय़गृहात अथेल्लो नाटकाचा प्रयोग लागूंनी पाहिला होता. ते नाटक पाहण्यासाठी ते नाटय़गृहावर तब्बल दोन तास आधी पोहोचले. नाटय़गृहाचा कित्येक एकराचा हिरवागार परिसर होता. जवळून नदी वाहत होती. मन प्रसन्न होणारं असं ते दृश्य होतं. नाटय़गृह अशा निसर्गरम्य वातावरणात असतं ही कल्पना आपल्या पचनी पडण्यास अवघड. वेळ आहे तर रंगमंच आतून पाहावा अशी डॉक्टारांना तीक्र इच्छा झाली. त्यांनी तिथल्या कार्यकर्त्या मुलीला तशी विनंती केली. तिने हसतमुखाने डॉक्टरांना रंगमंचावर नेलं.

माँट्रियलच्या एका वर्षाच्या वास्तव्यात डॉक्टरांनी अवघी पाच नाटकं पाहिली. पण त्यांना त्यामुळे पाश्चात्य रंगभूमीचा साधारण अंदाज आला. मराठी रंगभूमी सर्वार्थाने थिटी वाटायला लागली. इंग्रजी नाटक वाचून मराठी नाटकांचं लिखाण किती कच्चं आहे हे डॉक्टरांना जाणवलं होतंच. ती उणीव भाषांतर करून भरून काढता येईल, पण सादरीकरणाचं काय? पाश्चात्यांच्या सादरीकरणाच्या आपण जवळपास पोहोचू शकू का अशी शंका डॉक्टरांना सतावू लागली. त्याशिवाय वक्तशीरपणा, शिस्त, सौजन्य, कार्याविषयीची तळमळ, अपार कष्ट करण्याची तयारी, आंतरिक सचोटी, श्रमप्रतिष्ठsची जाणीव, संघभावना, गुणांची कदर, मत्सराला वाव नाही, अभ्यासू आणि व्यासंगी वृत्ती अशा प्रकारचे संस्कृतीजन्य गुण आपल्या समाजात कधी आणि कसे येणार असे प्रश्न डॉक्टरांना पडले. पाश्चात्य समाजात हे गुण हाडीमासी भिनलेले दिसतात ते आपल्या समाजाच्या अंगवळणी पडल्याशिवाय त्याचं प्रतिबिंब रंगभूमीवरील सादरीकरणात उमटणार नाही, असा त्याकाळी डॉक्टरांचा दृढ समज झाला.

त्यानंतर नोव्हेंबर 1998मध्ये ते एक महिन्यासाठी अमेरिकेला गेले होते. त्या कालावधीत त्यांचा मुक्काम न्यूयॉर्क येथे होता. तिथं ब्रॉडवेवरची नाटकं पाहण्याचा योग आला. ब्रॉडवेवर दोन व्यावसायिक नाटकं तुफान गर्दीत चालू होती. एक ‘फँटसी ऑफ द ऑपेरा’ आणि दुसरं ‘डॉ. जकील ऍण्ड मि. हाईड.’ त्या वेळी तिथं भव्यदिव्य नाटय़ प्रयोगांची संकल्पना भलतीच बदलली होती असं त्यांना आढळलं. त्या तुलनेने 1959मध्ये डॉक्टारांनी ‘माय फेअर लेडी’सारखे सर्वांगसुंदर नाटय़ प्रयोग पाहिले होते. 1998मध्ये तांत्रिकतेच्या आहारी गेलेले प्रयोग पाहून डॉक्टर निराश झाले. या वेळी तांत्रिक झगमगाट आणि वैभव हे दोन घटक नाटकावर पूर्णपणे स्वार झाले होते.

मराठी रंगभूमीच्या सद्यस्थितीविषयी लागू म्हणतात, पाश्चात्य रंगभूमीला आज लाभलेली संपन्नता आणि समृद्धी कधीकाळी आपल्या रंगभूमीला प्राप्त झाली होती. शासनालाही रंगभूमीचं सांस्कृतिक महत्त्व कळलं. रंगकर्मींची चणचण भासता कामा नये या ध्येयाने प्रत्येक कार्यकर्त्याने रंगधर्मी होण्याचा ध्यास घेतला पाहिजे. नाटकाने पेक्षकांना अधिक सुसंस्कृत केलं पाहिजे तसंच प्रेक्षकांनी सुसंस्कृत होण्यासाठी उत्सुक झालं पाहिजे. संपूर्ण समाजपरिवर्तनाचं हे काम आहे.

डॉ. लागूंच्या प्रदीर्घ नाटय़ प्रवासाचा प्रारंभ पी.डी.ए.पासून झाला. अत्रे यांचं ‘उद्याचा संसार’ हे त्यांचं पहिलं नाटक. प्रायोगिक रंगभूमीचं त्यांचं योगदान फार मोठं आहे. पी.डी.ए., रंगायन, थिटएटर युनिट, रूपवेध, आविष्कार, रंगयात्री, थिएटर ऍकॅडमी, स्टॅलिस्लावस्की थिएटर या संस्थांच्या प्रायोगिक नाटकांमध्ये त्यांनी कामं केली. वेगवेगळे प्रयोग करणे आणि चाकोरीबाहेरील नाटकं करण्यात ते मग्न असत. व्यावसायिक रंगभूवरील त्यांची नटसम्राट, हिमालयाची सावली, पप्पा सांगा कुणाचे, कस्तुरीमृग, मित्र, काचेचा चंद्र, कन्यादान इत्यादी नाटकं गाजली. या सर्व नाटकांशी संबंधित लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार यांच्याविषयी डॉक्टरांनी आपुलकीनं आणि भरभरून लिहिलं आहे. विशेषतः त्यांच्या थोरपणाविषयी.

डॉ. लागूंची कामं स्वीकारण्याची एक विशिष्ट पद्धत होती. दी गोवा हिंदू असोसिएशन ही संस्था सुवर्ण महोत्सवानिमित्त तात्यासाहेब शिरवाडरांचं नवीन नाटक बसवत होती. त्यांनी डॉक्टरांना संहिता वाचायला दिली. तात्यासाहेबांचं नाटक म्हणून लागूंना उत्सुकता होती. नाटक वाचताना ते गुंग होऊन गेले. नाटकाचं नाव होतं, ‘नटसम्राट’. चार-पाच पानांनंतर ते स्वतः गणपतराव बेलवलकर झाले. काही वर्षांपूर्वी ‘वेडय़ाचं घर’ हे नाटक प्रथम ऐकताना ते दादासाहेब झाले होते. तसंच विजय तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’च्या वेळी ते नाटक जगले होते. ‘नटसम्राट’च्या वाचनाचा पहिला अंक संपेपर्यंत ते झपाटून गेले. त्यांनी नाटक बाजूला ठेवून डोळे मिटले आणि स्तब्ध झाले.

थोडय़ा वेळाने त्यांनी सत्यदेव दुबेंना फोन लावला. फोनवर ते भडाभडा बोलत सुटले… ‘‘मी काहीतरी सुंदर आणि अद्भूत वाचलं. ते नाटक मला करायला मिळतंय. असलं काही पूर्वी मराठीत वाचल्याचं स्मरत नाही.’’

अशा तऱहेने डॉक्टरांनी पुष्कळ नाटकांविषयी अभ्यासपूर्ण आणि विस्तारानं लिहिलं आहे. त्याच्या ओघवत्या शैलीमुळे वाचक त्यात रंगून जातो. ‘लमाण’मध्ये डॉक्टरांचं काव्यप्रेम, वाचनाचं वेड, मिश्किलपणा हे गुणसुद्धा लक्षात येताच. ‘मी कोणी साहित्यिक नाही,’ असं सुरुवातीला म्हणणारे डॉक्टर अत्यंत शैलीदार आणि प्रतिभाशाली लिहितात. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात आलेल्या अनेक नाटय़कर्मींची व्यक्तिमत्त्वं सजीव झाली आहेत.

स्वतःच्या कारकिर्दीचं सिंहावलोकन करताना ते म्हणतात, ‘‘वैयक्तिकरीत्या माझं सबंध आयुष्य रंगभूमीनं उजळून टाकलं. पण मी रंगभूमीला काय दिलं?’’ कालिदासांनी म्हटल्याप्रमाणे नाटक एक यज्ञ आहे. त्या नाटय़कलेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं कार्य आपल्या हातून घडलं आहे का, असा त्यांना प्रश्न पडतो. असे ते अस्वस्थ होते, पण त्यांनी केलेल्या भरीव कामाचं महत्त्व नक्कीच आहे. त्यांच्या नम्र स्वभावात शेखी मिरवणं बसत नव्हतं. ते म्हणतात, ‘‘नाटककाराचा माल प्रेक्षकांकडे नेऊन टाकणाऱया एका लमाणाचं आयुष्य धुळीकणाइतकं नगण्य आणि क्षुद्र आहे.’’

प्रारंभी घडलेली भूमिका ते ग्रंथाच्या शेवटापर्यंत विसरत नाहीत.

[email protected]