खाणं आणि बरंच काही – चुरचुरीत नि खमंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आरती देवगावकर

गरमागरम भज्यांची प्लेट समोर आल्यावर एखादा तरी उचलला जातोच. धुवांधार पाऊस पडत असला तर मग काय आपण त्या खमंगपणाला सपशेल शरणागती पत्करतो. शेवटी काय ‘माणूस जिभेचा गुलाम आहे!’ हेच खरं. गरम तेलात भजी, वडा सोडल्यावर जो ‘चुर्रर्र’ आवाज येतो आणि क्षणभरात जो खमंग वास घरभर दरवळतो, त्याने कुठलाही विश्वामित्र – कुठले का काम करत असेना – त्याची समाधी भंग झाल्याशिवाय राहणार नाही. पण तोच क्षण असतों, मोहावर विजय मिळवण्याचा!

बाहेर धुवांधार पाऊस पडतोय… खिडकीपाशी असलेल्या खुर्चीवर मी एका हातात सौमित्रच्या कवितांचे पुस्तक घेतलंय आणि दुसऱया हातात…सहज ओळखलं असणार तुम्ही, वाफाळता कॉफीचा मग… त्यात अजून शेजारी गरमागरम भज्यांची प्लेट असेल, तर मग सोने पे सुहागाच!
पावसाळा म्हटलं की, हे असं सगळं साग्रसंगीत व्हायला हवं असतं मला. किमान एकदा तरी, जास्त वेळा झालं तर होणारा आनंद काही विचारूच नका. मला खात्री आहे, माझ्यासारखीच गत अनेकांची होत असणार. जरा कुठे काळे ढग आकशात दाटी करू लागले की, लगेच यांच्या तोंडाला पुढच्या खाण्याच्या कल्पनेने पाणी सुटते आणि पाय आपोआपच स्वयंपाकघराकडे वळतात.

काही हेल्थ कॉन्शस लोक लगेच कॅलरीज मोजायला लागतात. बापरे एवढं तेल? एवढे तळकट भजी? फॅट्स, कॅलरीज… कसं बरं खातात इतकं तेल… असे उच्चारित अथवा अनुच्चारित प्रश्न त्यांच्या चेहऱयावर स्पष्टपणे वाचता येतात; पण अंगावर रोमांच आणणाऱया या हवेत गरमागरम भजी न खाणे हा फाऊल धरला जातो अस्सल खवय्यांच्या राज्यात. जातीच्या खवय्यांना भजी, वडे याच्यासाठीच तर पावसाळा हवाहवासा वाटतो. खरे तर आपण शहरी माणसे जरा जास्तच बागुलबुवा करतो अशा खाण्याचा. मस्त दणकावून खावे आणि मग दणकून व्यायाम करावा, काहीसुद्धा होत नाही मग; पण ‘तेवढे सोडून बोला’ असे आपण वागतो. वारंवार खूप तेलाचा समावेश आपल्या आहारात करणे वाईटच. मात्र गार हवेत थोडेफार तेल खाणे पचते. एवढेच नाही, तर हरभऱयाच्या डाळीतून उत्तम प्रथिने मिळतात. त्यामुळे घरी सगळ्या प्रकारची काळजी घेऊन स्वच्छता पाळून केलेली भजी-वडे इत्यादी गोष्टी बाधत नाहीत हे खरे.

नेहमीच कांदा, बटाटा अशी भजी करण्याऐवजी निरनिराळ्या प्रकाराने ती बनवता येतात. वेगवेगळ्या प्रांतात तिथे उपलब्ध असलेल्या भाज्यांपासून भजी बनवण्याचा पायंडाच आहे. त्या सिझनला बाजारात मिळत असलेल्या सगळ्या प्रकारच्या भाज्या वापरून छान भजी बनतात. काही वेळा घरातील लहानगे किंवा अगदी मोठेसुद्धा काही भाज्या खायला खळखळ करत असतात. अशा भाज्या त्यांच्या पोटात घालण्याचा हा एक राजमार्गच आहे. हा पदार्थ एवढा खमंग असतो की, त्यापुढे आत घातलेली भाजी आपल्याला आवडत नाही हेदेखील खाणारा विसरून जातो. मग यात कुठलीही पालेभाजी असेल किंवा न आवडत्या फळभाज्या असतील. त्यातून काही प्रमाणात लोह, कॅल्शियम, प्रोटीन्स, फायबर्स इत्यादी गोष्टी पोटात जाणारच असतात.
भजी किंवा वडे कुरकुरीत, चुरचुरीत करण्यासाठी प्रत्येक घरातील आपले असे आडाखे असतात. डाळीच्या पिठात मोहन घालणे, खाण्याच्या सोडय़ाचा वापर करणे, बारीक रवा घालणे, साधे वरण घालणे किंवा तांदळाचे पीठ मिसळणे या काही त्यातील बहुसंख्य लोक अमलात आणत असलेल्या टिप्स. बाकी जे लोक अंडी खातात ते लोक या पिठात एखादे अंडे फेटून घालतात, त्यानेही भजी खूप क्रिस्पी होतात. खेकडा भजी हा एक अतिशय आवडीचा आणि बऱयाच लोकांना घरी चांगला बनवता न येणारा पदार्थ. खरं तर न जमण्यासारखे त्यात काही अवघड रॉकेट सायन्स नाही; पण बाहेर गाडीवर, टपऱयांवर जशी भजी बनतात तशी घरी बनवता येत नाहीत असा खूप लोकांचा अनुभव आहे. त्यासाठी फार काही वेगळे करावे लागत नाही. कांदे उभे आणि पातळ चिरून घ्यायचे, फोडी जेवढय़ा वेगळ्या करता येतील तेवढय़ा करायच्या आणि मग त्या फोडींना लिंबूरस आणि मीठ लावून ठेवायचे. दहा मिनिटांनी त्यात डाळीचे पीठ, तिखट, मीठ, धान्य, ओवा इ. घालायचे आणि दहा मिनिटांत त्यात हवे तर थोडा सोडा मिसळून किंवा नुस्तीच या पिठाची भाजी गरम तेलात सोडायची.

गरम तेलात भजी, वडा सोडल्यावर जो ‘चुर्रर्र’ आवाज येतो आणि क्षणभरात जो खमंग वास घरभर दरवळतो, त्याने कुठलाही विश्वामित्र – कुठले का काम करत असेना – त्याची समाधी भंग झाल्याशिवाय राहणार नाही. काही वेळा आपण रस्त्यावर फिरत असतो, काही कामासाठी बाहेर गेलेलो असतो आणि अचानक आपल्या नाकाला एक खमंग जाणीव होते. त्या वासाच्या अनुरोधाने आपण पुढे पुढे जात राहतो आणि अचानक हाच चुर्रर्र आवाजही आपल्या कानांवर पडतो. तोच क्षण असतो बरं, मोहावर विजय मिळवण्याचा! एक तर तुम्ही तसा विजय प्राप्त करू शकता नाहीतर मग आजूबाजूच्या जगाला, वातावरणाला विसरून त्या खमंगपणाला सपशेल शरण जाऊन रसना तृप्ती करता. काही जण कसेबसे तिथे शांत राहून घरी येतात आणि न राहवून भज्यांचा घाणा काढतातच. शेवटी काय ‘माणूस जिभेचा गुलाम आहे!’ हेच खरं. असेना का, तब्येत सांभाळा. मस्त खा आणि स्वस्थ राहा.
(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)

– [email protected]