भटकंती – अजिंठा डोंगराच्या कुशीतील गौताळा

>> आशुतोष बापट

सातमाळा-अजिंठा डोंगराच्या कुशीत वसलेले हे गौताळा अभयारण्य आणि इथला परिसर हा आपला अनमोल ठेवा आहे. इथले वातावर गढूळ न करता आपण या वनसंपदेचा मनमुराद आस्वाद घ्यावा.

भटकंतीचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक वेळी महाबळेश्वर, माथेरान, कोकण अशाच ठिकाणी जायला हवे असे नाही. महाराष्ट्रात सर्वदूर अशी बरीच ठिकाणे आपली वाट बघत आहेत. खान्देशच्या उंबरठय़ावर असलेला गौताळा अभयारण्य परिसर हे त्यातलेच एक. संभाजीनगरपासून वेरूळ-कन्नडमार्गे 110 कि.मी. तर चाळीसगावपासून जेमतेम 20 कि.मी.वर असणारा हा सगळा प्रदेश. सातमाळा अजिंठा डोंगर रांगांच्यामध्ये वसलेले हे अभयारण्य खूपच रमणीय आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेले आहे. श्रद्धाळू, पर्यटक, ट्रेकर्स, पक्षी निरीक्षक आणि पुरातत्व अभ्यासक या सगळ्या लोकांच्या जिव्हाळ्याची ठिकाणे येथे उपलब्ध आहेत.

कन्नडच्या पुढे गेल्यावर एक रस्ता पितळखोरा लेणीकडे जातो. या लेणीच्या समोरून जाणारा कच्चा रस्ता सरळ डोंगराच्या खाली धवलतीर्थापाशी असलेल्या पाटणादेवी मंदिरापाशी उतरतो. जवळजवळ एक ते दीड तासांची ही डोंगरातली मस्त भटकंती आहे. इथे दुसऱया बाजूने पण जाता येते. पितळखोऱयाकडे न जाता सरळ जाऊन औट्रम घाट उतरून पाटणे गावामार्गे आपण पाटणादेवीला जाऊ शकतो. या सगळ्या प्रदेशाला गौताळा-औट्रम घाट अभयारण्य असे नाव आहे.

हा परिसर फिरायचा तर किमान दोन दिवसांचा मुक्काम तरी करायला हवा. पाटणादेवी हे ठिकाण थोर गणिती भास्कराचार्य यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या चंडिका मंदिरात देवीची भव्य मूर्ती असून मंदिराच्या बाहेर दोन मोठय़ा दीपमाळा आहेत. मंदिरात एक 24 श्लोकांचा देवनागरी लिपीतील शिलालेख असून तो भास्कराचार्यांचा नातू चंगदेव याने इ.स. 1206 मध्ये कोरलेला आहे. त्यात तो भास्कराचार्यांची वंशावळ तसेच त्यांचे कार्य, त्याचसोबत यादव आणि निकुंभ राजघराण्याबद्दल माहिती देतो. याशिवाय सन 1206 ला प्रभवनाम संवत्सर असताना श्रावण पौर्णिमेला चंद्रग्रहण होते त्या वेळी श्री सोन्हदेवाने आपल्या गुरूने स्थापिलेल्या मठाला दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. मठाला मंदिर दान दिलेली आहेच, शिवाय पाटणे बाजारात जो व्यापार होई त्यावर काही कर बसवून तो मठाला दिल्याचा उल्लेखही येथे केलेला आहे. मंदिराच्या पाठीमागे उंचच उंच डोंगर उभे दिसतात. इथून एक रस्ता केदारकुंड या ठिकाणी जातो. अंदाजे 2 कि.मी.ची जंगलातली पायपीट केली की तो रस्ता तिन्ही बाजूंनी असलेल्या डोंगरांनी बंद झालेला आहे. समोरच्या डोंगरावरून धबधबा कोसळतो आणि त्याच्या पाण्यामुळे खाली मोठे कुंड तयार झाले आहे.

पाटणे गावातून देवीच्या मंदिराकडे जाताना वाटेत उजवीकडे रस्त्याचा फाटा एका महादेव मंदिराकडे जातो. इ.स. 12 व्या शतकात बांधलेले हे मंदिर कण्हेरगडाच्या मांडीवर वसलेले आहे. 10 फूट उंचीच्या जोत्यावर असलेले हे मंदिर शिल्पसमृद्ध आहे. या मंदिराचे स्तंभ आणि बाह्यभागावर असलेली शिल्पकला केवळ सुंदर. या मंदिरातही एक 24 ओळींचा शिलालेख असून त्यात निकुंभ वंशातील राजांची वंशावळ दिलेली आहे. निकुंभ राजा इंद्रदेव याने हे मंदिर बांधायला सुरुवात केली आणि त्याचा पुत्र गोवन तिसरा याने 1153 साली हे मंदिर पूर्ण केले असा स्पष्ट उल्लेख आहे.

मंदिराच्या शेजारून एक पायवाट कण्हेरगडाच्या डोंगराकडे जाते. पुढे ही पायवाट डोंगरावर चढते. चाळीसगाव इथल्या सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने जागोजागी फलक लावलेले आहेत. तसेच डोंगराचा चढावाचा भाग पायऱया खोदून सोपा केलेला आहे. येथे डोंगराच्या पोटात दोन लेणी खोदलेली आहेत. पहिले आहे ते नागार्जुन लेणे. हे जैन लेणे असून आत तीर्थंकरांची सुंदर मूर्ती, त्याच्या बाजूला सेवक तसेच पुढे एका बाजूला सर्वानुभूती यक्ष तर दुसऱया बाजूला अंबिका यक्षी यांच्या सुंदर मूर्ती दिसतात. इथून आजूबाजूचा परिसर फार सुंदर दिसतो. या लेणीच्या काहीसे पुढे गेल्यावर सीतेची न्हाणी नावाचे अजून एक लेणे दिसते, मात्र या लेणीत काहीही नाही. हीच पायवाट पुढे कण्हेरगड या किल्ल्यावर जाते. किल्ल्यावर तटबंदी आणि पाण्याचे एक टाके आहे. इथूनच समोर असलेला पितळखोरा लेणीचा डोंगर आणि त्याच्या माथ्यावर केलेले बांधकाम दिसते.

या सगळ्या परिसरात असंख्य पक्षी आढळतात. मोर, सातभाई, कोतवाल, तांबट, हळद्या, खंडय़ा, धनेश, वेडा राघू, वटवटय़ा, बुलबुल अशा अनेक पक्ष्यांचा कलकलाट सतत कानावर पडत असतो. ऐन थंडीत या ठिकाणी जाऊन एक वेगळेच विश्व अनुभवावे असे आहे. आपला आवाज बंद ठेवला तर जंगलाचा आवाज ऐकण्याची पर्वणी येथे अनुभवता येते. इथल्या अभयारण्यात बिबटे, तरस, डुकरे, लांडगे, ससा, माकड असे विविध पक्षी वसतीला आहेत. सातमाळा-अजिंठा डोंगराच्या कुशीत वसलेले हे गौताळा अभयारण्य आणि इथला परिसर हा आपला अनमोल ठेवा आहे. इथले वातावर गढूळ न करता आपण या वनसंपदेचा मनमुराद आस्वाद घ्यावा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या