
>> आशुतोष बापट
डॉ. देगलूरकर सरांबरोबर 2014 मध्ये पहिल्यांदा चिपळूणला गेल्यावर प्रकाश देशपांडेंची ओळख झाली. खरे तर त्या वेळची ओळख अगदी औपचारिक अशा स्वरूपात झाली. कारण त्या कार्यक्रमाची सगळी धुरा देशपांडेंच्या खांद्यावर होती आणि तो कार्यक्रम दिमाखदार कसा होईल याकडे त्यांचे बारीक लक्ष होते. बारीकसारीक गोष्टीसुद्धा राहून जाऊ नयेत, हा त्यांचा कटाक्ष होता. हे त्या घाईगर्दीतसुद्धा प्रकर्षाने जाणवले. दुसऱया दिवशी पुण्याला निघायच्या आधी देशपांडे काका काही कोकणी खाऊ घेऊन आले होते. ‘‘ही आमची कोकणची गोड भेट’’ म्हणून तो खाऊ आम्हाला प्रत्येकाला त्यांनी आवर्जून दिला. या माणसाची ओळख व्हायला हवी असे मनात पक्के ठरवले गेले. पुढे स्नेहल प्रकाशनमध्ये देशपांडे आले असताना त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला आणि ही व्यक्ती किती क्षेत्रांत मुक्तपणे वावरते आहे, याची प्रचीती आली. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे खरे तर हे ‘अध्वर्यू’ म्हणायला हवेत. 100 वर्षे पूर्ण झालेल्या वाचनालयासाठी विविध पुस्तके घेऊन चिपळूणला नेण्यासाठी ते पुण्यात आले होते. त्यानंतर वारंवार देशपांडे काकांच्या भेटी होत गेल्या आणि या व्यक्तीचे विविध पैलू समोर येऊ लागले. एके दिवशी अकस्मात देशपांडे काकांचा फोन आला आणि ‘‘आम्ही लोटिस्मा चिपळूणतर्फे वस्तुसंग्रहालयाचे काम सुरू करत आहोत व त्यासाठी तुमची मदत हवी आहे,’’ अशी आनंदाची आग्रही मागणी त्यांनी केली. इतक्या सुंदर कार्यात आपला समावेश होतो आहे याची जाणीव असल्यामुळे अधिकच आनंद झाला. लवकरच चिपळूणला जाण्याचा योग आला आणि वस्तुसंग्रहालयाच्या निर्मितीचे काम प्रत्यक्ष पाहता आले. कुठल्या भिंतीवर कुठले चित्र लावायचे आहे इथपासून ते, कुठली मूर्ती कुठे ठेवायची आहे याचा संपूर्ण आराखडा काकांच्या डोक्यात होता. तिथे काम करणाऱया कारागिरांपासून ते या संग्रहालयाच्या बांधणीचे काम करणाऱया आर्किटेक्टपर्यंत सर्वांशी काका त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलत होते. या वयात इतका उत्साह आणि एक मोठे काम आपल्या हातून उभे राहत आहे तर त्यात कुठलीही कमतरता राहता कामा नये याची दक्षता देशपांडे काका घेत होते. त्यांचा उत्साह आणि कामाचा आवाका पाहून खरोखरच आश्चर्य वाटले.
चिपळूणला पूर काही नवीन नाही. दरवर्षी पावसाळ्यात एकदा तरी वशिष्ठाr नदीचे पाणी गावात शिरते. पण दोन वर्षांपूर्वीचा पूर प्रचंड होता. त्या पुराच्या पाण्याने वस्तुसंग्रहालयाचा तळमजला पूर्णपणे बुडवला. एक दिवस पाणी तसेच होते. पाणी ओसरल्यावर देशपांडे सर्वप्रथम वस्तुसंग्रहालयात गेले आणि चिखल-गाळाने भरलेली पुस्तके, वस्तू, मूर्ती बाहेर काढल्या. अनेक कागद वाया गेले होते. स्वतःच्या घराचे न बघता त्यांनी या संग्रहालयाच्या साफसफाईचे काम हाती घेतले. या वयात हे झपाटलेपण आपल्याला अचंबित करून टाकते.
मराठी साहित्य संमेलन असो किंवा कोकण पर्यटन महोत्सव असो, प्रकाश देशपांडे हे त्यातले मुख्य पात्र. गावातल्या तरुण मंडळींना घेऊन हे कार्यक्रम त्यांनी लीलया पूर्ण केले आहेत. कुठलीही अपेक्षा न ठेवता वयाची सत्तरी झाल्यावर सगळ्या पदांवरून स्वतः बाजूला झाले आणि तरुण मंडळींना तिथे संधी दिली. अर्थात कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शनासाठी ते कायम उपलब्ध असतातच. हे सगळे सुरू असताना त्यांचे लेखनसुद्धा सुरू असते. कोकणातली नररत्ने हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. कोकणातून पुढे जाऊन मोठी झालेली माणसे त्यांनी शोधली. त्यांचे चरित्र लोकांसमोर यावे म्हणून लिखाण सुरू केले. त्या लोकांची मोठी चित्रे काढून घेतली आणि ती वस्तुसंग्रहालयात मांडली आहेत. त्याखाली त्याची संक्षिप्त माहिती दिली आहे. कोकणची संस्कृती, तिथली माणसे जगासमोर यावी यासाठी अविरत प्रयत्न करत असलेल्या प्रकाश देशपांडे यांना यंदाचा मानाचा ‘स्नेहांजली पुरस्कार’ जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचा यथोचित गौरव करण्याची स्नेहल प्रकाशनची ही परंपरा. या परंपरेमध्ये चिपळूणचे प्रकाश देशपांडे अगदी चपखल बसतात.