
>> आशुतोष बापट, [email protected]
परीक्षा संपल्या, उन्हाळी सुट्टय़ा लागल्या की भटक्यांचे पाय हिमालयाकडे वळतात. ऐन मे महिन्यात स्वेटर-कानटोपी घालायचा आनंद हा तिथेच घेता येतो. ट्रेकिंग नाहीतर थंड हवेत भटकायला उन्हाळ्यात हिमालय हे उत्तम ठिकाण असते. पण असंच काही नाही. इये महाराष्ट्र देशीसुद्धा ऐन उन्हाळ्यात, वसंत ऋतूमध्ये आवर्जून भटकंती करण्यासारखे खूप काही आहे. असं म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील याची खात्री आहे. पण योग्य ठिकाणं आणि योग्य अशी तयारी करून गेलं तर महाराष्ट्रातसुद्धा उन्हाळ्यातली भटकंती मोठी आनंददायी होते. अर्थात काही पथ्ये आणि ठिकाणांची योग्य निवड करणे हे मात्र गरजेचे आहे.
ऐन वैशाख वणवा पेटलेला असताना आणि बऱयाच भागात पाण्याचे दुर्भिक्ष असताना कुठे आणि कसे जाणार? पण यावेळी सुद्धा सखा सह्याद्रीच आपल्या सोबतीला आहे. घाटमाथ्यावरची आंबा, गगनबावडा, आंबोली, कोकणात दापोली, देवरुख ही ठिकाणं आजही उन्हाळ्यात जाण्याजोगी आहेत. विशेषत संध्याकाळनंतर शीतल वारे वाहू लागले की परिसर सगळा आल्हाददायक होतो. पन्हाळासुद्धा एक चांगला पर्याय होऊ शकतो. विदर्भात जरी उन्हाचा कहर असला तरीसुद्धा गाविलगड, चिखलदरा ही ठिकाणं हा उत्तम पर्याय आहे. कोल्हापूर जिह्यातला गडहिंग्लज, चंदगड हे तालुके आणि इथे असलेली ठिकाणं मुद्दाम उन्हाळ्यात जावी अशी आहेत. या परिसरात अजूनही खूप झाडी टिकून असल्यामुळे पर्यटकांनासुद्धा पारगड, आंबोली या ठिकाणी मनसोक्त फिरता येते. गडहिंग्लज ही मोठी व्यापारी पेठ असल्यामुळे राहण्याच्या उत्तम सोयी इथे आहेत.
उन्हाळी भटकंतीचे खूप फायदेसुद्धा आहेत. मुळात वसंत ऋतू असल्यामुळे आंबा, फणस, काजू, करवंद, जांभूळ ही फळं याच वेळी मिळतात. अनेक वृक्षांची पाने गळत असल्यामुळे त्यावर बसणारे पक्षी पाहणे ही पक्षीनिरीक्षकांसाठी मोठी पर्वणी असते. वृक्ष जरी निष्पर्ण झाले तरीसुद्धा पळस, पांगारा, सावर, बहावा या झाडांना येणारी फुलं ही ऐन उन्हाळ्यात केवळ अप्रतिम दिसतात. विविध रंगांची उधळण या वेळी रानोमाळ झालेली पाहता येते. भटक्यांसाठी मुद्दाम उन्हाळ्यात रात्री करण्यासारखे ट्रेक्स म्हणजे पर्वणी असते. माहितीच्या मार्गावर रात्रभर ट्रेकिंग करणे, चढत जाणाऱया रात्रीबरोबर हळूहळू गार होत जाणारे वातावरण हे खास याच काळात अनुभवले पाहिजे. आकाशदर्शनासाठी उन्हाळ्यातील रात्री हा अगदी योग्य कालावधी असतो. वद्य पक्षातली रात्र कुठल्या तरी उंच किल्ल्यावर किंवा गावापासून लांब असलेल्या ठिकाणी ग्रह-ताऱयांच्या निरीक्षणात घालवणे हे फक्त उन्हाळ्यातच शक्य होऊ शकते.
अर्थात या सगळ्यासोबत काही पथ्ये मात्र निश्चित पाळायला हवीत. डोक्याला टोपी जी कान आणि मान झाकेल अशीच आणि डोळ्याला गॉगल आणि अंगात सुती कपडे हे तर कोणीही करेलच. परंतु त्याच सोबत उन्हाळ्यात मुख्यत्वे शरीरातील पाणी कमी होत असल्यामुळे सतत पाणी जवळ ठेवणे हे अनिवार्य असते. दिवसा कमीतकमी 2 लिटर आणि तरी पोटात गेलेच पाहिजे. पाण्यासोबतच इलेक्ट्रॉलची पावडर पाण्यात विरघळवून ते पाणी सोबत ठेवावे. पूर्वी कोकणात कुणाकडेही गेले तरी गूळ-पाणी अगदी न चुकता समोर यायचे. उन्हाळ्यात फिरताना आपल्यासोबत सुद्धा गूळ ठेवणे सहज शक्य असते. गुळाबरोबरच दाण्याचे लाडू, गुडदाणी, चिक्की, खजूर या गोष्टीसुद्धा आपल्यासोबत असणे आवश्यक आहे. मोठय़ा प्रमाणावर जाहिरात होणारी शीतपेये मात्र चुकूनसुद्धा पिऊ नयेत.
चैत्र वैशाख या महिन्यात अनेक गावांत जत्रा-यात्रा मोठय़ा प्रमाणावर होत असतात. त्यामुळे अनेकांचे मुद्दाम गावाकडे जाणे होतेच. जत्रेत मिळणारे खाद्यपदार्थ आता आपल्याला खायची सवय नसते. त्यामुळे लहानपणी आम्ही अमुक तमुक पदार्थ खूप खायचो, त्यामुळे त्यावर आता परत ताव मारणे हे अंगाशी येऊ शकते. उन्हाळ्यात दिवस मोठा असल्यामुळे भटकंती करताना शक्यतो सकाळी 10 पर्यंत किंवा संध्याकाळी 4 नंतर प्रवास करावा. वातानुकूलित वाहनातून एकदम बाहेर येणे टाळावे. त्यापेक्षा 5 मिनिटे आधी गाडीच्या काचा उघडून बाहेरच्या वातावरणाशी समरस होणे अत्यंत महत्त्वाचे असते.
ऐन उन्हाळ्यातसुद्धा महाराष्ट्रात केलेली भटकंती निश्चितच रमणीय असते. त्यात अनेक फायदे आहेत. मात्र ती करताना पथ्ये मात्र जरूर पाळावीत. एकदा ते गणित जमले की ऐन वसंतात निसर्गाची विविध रूपे आपल्या भटकंतीमध्ये पाहता येतील. आपली भटकंती समृद्ध होईल!


























































