
>> अभय मिरजकर
शिलालेख म्हणजेच पाषाणात किंवा इतर कठोर पदार्थांमध्ये कोरलेले लेखन. शिलालेखांना इतिहासात विशेष महत्त्व आहे. शिलालेखांच्या माध्यमातून आपण ऐतिहासिक संस्कृतींचा अभ्यास करू शकतो. चाकूर तालुक्यातील मौजे उजळंब येथे नागेश्वर (नागोबा) मंदिरासमोर एक कन्नड शिलालेख आढळून आला आहे. तो मंदिरासमोर उभा करून ठेवलेला आहे. त्याचे वाचन प्रथमच उपलब्ध झाले आहे व त्यातून नवीन इतिहास उजेडात आला आहे. या शिलालेखाचे वाचन देवरकोंडा रेड्डी यांनी केले आहे, तर स्थानिक संशोधन कृष्णा गुडदे यांनी केले आहे. चालुक्यकालीन 916 वर्षे जुना हा शिलालेख आहे.
या 23 ओळींच्या हळे कन्नड शिलालेखात वरील बाजूस सूर्य, चंद्र व शिवपिंड कोरली आहे. त्याखाली 23 ओळींचा कन्नड शिलालेख करण्यात आलेला आहे व सर्वात खाली गाय-वासरू व तलवार कोरण्यात आलेली आहे. शिलालेखात चालुक्य राजा त्रिभुवनमल्ल देव अर्थात विक्रमादित्य सहावा याचा राजप्रशस्तीसह उल्लेख आलेला आहे. हा राजा सत्तेवर असताना या राजाच्या 34 व्या राज्य वर्षी विरोधी संवत्सर असताना वैशाख मासातील अमावस्या रविवार दिवशी सूर्यग्रहण असताना या शिलालेखामध्ये दान दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यावेळी विक्रमादित्य सहावा हा जयंतीपूर अर्थात बनवासी येथून राज्य करत असल्याचे सांगितले आहे. या राजाचा मांडलिक राजा उजळंब येथून राज्य करत होता. उजळंब येथील मांडलिक राजा पराक्रमी, लढाऊ, सिंध कुळातील, राजाचा रक्षक, नागेश्वर देवाचा भक्त असल्याचे यातून समजते. तसेच आज जरी तत्कालीन जुने मंदिर उभे नसले तरी आहे या संशोधनातून त्या मंदिराचा, गावचा इतिहास जवळपास 916 वर्षे मागे जातो. त्यातून तत्कालीन राजवट, राजा, मांडलिक, देवता, दान पद्धती, दानाचे रक्षण व्हावे म्हणून वापरली जाणारी शापवचने इत्यादी ऐतिहासिक माहिती या उजळंब शिलालेखातून उपलब्ध झाली आहे, असे कृष्णा गुडदे यांनी सांगितले.




























































