
सूर्यनमस्कार हा योग आणि व्यायाम यांच्या मधला प्रकार आहे आणि त्याचमुळे प्रत्यक्ष सूर्यनमस्कार करण्याआधी काही हलकेफुलके व्यायाम करून शरीरामध्ये उष्मा अथवा ऊब निर्माण करावी. आपल्या शरीरामधील सांध्यांना थोडा व्यायाम द्यावा. थोडय़ा उडय़ा माराव्यात, जागच्या जागी थोडे धावावे. त्यामुळे शरीर सूर्यनमस्कारासाठी तयार होते.
सूर्यनमस्कार म्हणजे बारा आसनांचा संच
सूर्यनमस्कार म्हणजे 12 आसनांचा संच. ही आसने एकामागोमाग एक, एका लयीत आणि ठरावीक गतीने करत जायची असतात. यामध्ये काही आसनांची पुनरावृत्ती होत असते, परंतु सगळी आसने मिळून आपल्या शरीराला सगळय़ा प्रकारचा सर्वांगसुंदर व्यायाम मिळून जातो.
ही आसने याप्रमाणे…
नमस्कारासन, ऊर्ध्वहस्तासन, हस्तपादासन, एकपादप्रसरणासन, द्विपादप्रसरणासन, श्वानासन, साष्टांग प्राणिपातासन, सरल भुजंगासन, श्वानासन, भूधरासन, एकपादप्रसरणासन, हस्तपादासन.
नमस्कारासन
प्रत्येक आसन सुरू करण्याआधी सूर्याचे एक विशेषनाम घेऊन सूर्याला वंदना केली जाते. सूर्यनमस्कार हे नेहमी सूर्याच्या कोवळय़ा उन्हात, अर्थात सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यप्रकाशामध्ये उभे राहून करावेत. आपले मुख सूर्याच्या सन्मुख असावे. हलकाफुलका व्यायाम झाल्यानंतर एका जागी दोन्ही पाय जुळवून हात जोडून नमस्कार करून सरळ ताठ उभे रहावे. आपली हनुवटी जमिनीला समांतर असू द्यावी. दोन्ही हात जुळलेले असावेत. हाताचे कोपरे आपल्या शरीराला न चिकटवता ताठ मानेने आणि छाती पुढे काढून उभे रहावे व सूर्याचे नाम घ्यावे. सूर्याला प्रणाम करावा.
ऊर्ध्वहस्तासन
नंतर श्वास घेऊन दोन्ही हात वरच्या दिशेला न्यावेत आणि मागे वाकून थोडा वेळ उभे रहावे. श्वास रोखून धरावा. कमरेचे आणि नितंबांचे स्नायू थोडे घट्ट करून ठेवावेत. आपल्याकडे दहा दिशा मानल्या जातात. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैýत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्व आणि अधर. ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा. या आसनात हात वरच्या बाजूला नेले जातात आणि आपण थोडे मागे वाकून उभे राहतो. यावेळी आपला चेहरा आणि डोळे वरच्या बाजूला असतात. म्हणून या आसनाला ऊर्ध्वहस्तासन असे नाव आहे. या आसनामुळे छातीचे स्नायू ताणले जातात, पाठीला, कमरेला थोडा व्यायाम मिळतो आणि कमरेचे जे स्नायू आहेत, ते मजबूत होतात. फुप्फुसांची क्षमता वाढते.
हस्तपादासन
नंतर श्वास सोडत उच्छ्वास करत खाली वाकावे. पाय गुडघ्यांमध्ये सरळ असू द्यावेत. हात जमिनीला आणि आपलं कपाळ गुडघ्यांच्या थोडं खाली आपल्या पायांना लावायचा प्रयत्न करावा. पाय सरळ ठेवल्याने पायांच्या नसा ताणल्या जातात आणि या नसा ताणल्या गेल्याने पोट साफ व्हायला मदत मिळते, बद्धकोष्ठता असल्यास दूर होते. आपले पायांचे स्नायू, आपल्या नितंबांचे स्नायू चांगल्या प्रकारे ताणले जातात. खांद्यांना आणि पाठीलाही चांगल्या प्रकारचा ताण मिळतो, शरीरामध्ये लवचिकता येते. या आसनाने पोट कमी होते. ही दोन आसने एकामागोमाग केली जातात आणि बॅकवर्ड बँडिंग आणि
फॉरवर्ड बिल्डिंग असा दोन्ही व्यायाम शरीराला मिळतो.
– सीए अभिजित कुळकर्णी
योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
www.bymyoga.in
























































