मुद्दा – निवडणुकीच्या बाजारात इमानदारीचा लिलाव

>> अजित कवटकर

जिथून नोट मिळणार, तिथे इमान झुकणार. आजच्या राजकारणातील विचारधारा याच कार्यपद्धतीवर चालते. एकनिष्ठता, समर्पण, प्रामाणिकपणा वगैरेसारखी तत्त्वे आता संपली आहेत. हे इतके ‘नॉर्मल’ झाले आहे की, दर काही वर्षांनी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये पक्षांतर करण्याची प्रथा पडली आहे. नेता गेला की, तो सोबतच्या कार्यकर्त्यांना आपसूकच स्वतःबरोबर फरफटत नेत असतो. जसा नेता आपली सोय बघतो, तसा मग कार्यकर्तादेखील आपली सोय बघून नंतरच त्या नेत्यासोबत राहायचे की नाही हे ठरवत असतो. एकूणच काय, सध्या जे आपण अनुभवत आहोत ते ‘सोयीचे राजकारण’ होय. यात मतदार, जनता यांचा बिलकूल विचार केला जात नाही. म्हणजे स्पष्टच सांगायचे तर त्यांना ‘गृहीत’ धरले जात आहे.

निःस्वार्थी, प्रामाणिक, सच्चा कार्यकर्ता आज एक भ्रम वाटावा एवढी स्थिती भयंकर आहे. राजकारणात पदार्पण करणारा येतोच मुळी स्वार्थासाठी. या वृत्तीला अधोरेखित करणारे प्रकार सर्वत्र निरंतर घडत असतात. त्यामुळेच हे क्षेत्र आणि त्यात सक्रिय असणारे शंकाकुशंकांच्या घेऱयात नेहमी सापडलेले दिसतात. त्यातच या स्वाभाविकतेला अनुसरणारी आपली ओळख तयार होऊ नये यादृष्टीने जागरूक असणारी किंवा झालीच तरी त्याचे वाईट वाटून घेणारी वा पश्चात्ताप करणारी आजची पिढी नाही ही वास्तविकता तेवढीच स्पष्ट आहे. त्यामुळे सध्याच्या काळात चांगला राजकीय कार्यकर्ता वा नेता निपजणे फार अवघड आहे. भ्रष्टाचार केल्याशिवाय राजकारणात मोठं होताच येत नाही हा प्रस्थापित होत असलेला गलिच्छ आदर्श आता अनिवार्य ठरत आहे. राजकारण, समाजकारणाची संपूर्ण ‘इको सिस्टम’च त्यामुळे दूषित होत आहे, ‘जसा नेता तसा चेला’ याला अनुसरूनच पावलावर पाऊल टाकले जात आहे. काळोखात राहून गैरमार्गाने पैसे ओरबाडायचे आणि उजेडात येऊन नीती तत्त्वांची भाषा करायची. अशा नेत्यांच्या दिखाऊ तत्त्वज्ञानाला जनता तर दूरच, पण त्यांचा स्वतःचा कार्यकर्तादेखील भीक घालत नाही, परंतु नेत्याच्या चुकीच्या गोष्टींना आदर्श मानून त्याचे अनुकरण मात्र तो आवडीने करतो. त्यामुळे आजच्या राजकारणाची वाताहत झाली.

पूर्वी राजकारणाचा मार्ग समाजकारणातून जायचा. उदरनिर्वाहासाठी केल्या जाणाऱया प्रामाणिक कष्टातून मिळालेला वेळ समाजकार्यासाठी घालविणे हा हेतू असायचा. समाजकार्य हे निःस्वार्थ, निर्मळ मनाने, आवडीने केले जायचे. सामाजिक उन्नती साधण्याचा यातून प्रयत्न असायचा. त्यातून पैसा कमावून स्वतःचा उद्धार करण्याचा हेतू नसायचा. आजचा बहुतांशी कार्यकर्ता मात्र पद मिळविण्यासाठी धडपडतो. आश्रयाखाली जिथून मिळेल तेथे उन्नीस – बीस करून तो कार्यकर्ताच पक्षाला सर्वाधिक डॅमेज करत असतो. इतका की, मग विरोधकांना काहीच परिश्रम घेण्याची गरज पडत नाही. त्यांनी फक्त हा असला कार्यकर्ता समोरच्यांकडे सदैव टिकून राहावा एवढीच प्रार्थना करावी, पण जर समोरचे याहून अधिक दिवटे असतील तर मग कोणी कुणासाठी आणि कुणाकडे प्रार्थना करावी? निवडणुका आल्या की, बंडखोरीचे बुजगावणे उभे करून नंतर ते हटविण्यासाठी मोठी सेटलमेंट करण्याचे मौसमी धंदे निवडणुकांवेळी तेजीत चालतात. लोकशाहीच्या उत्सवातील हा फायदा उचलण्यासाठी अनेक संधीसाधू गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतात.

राजकीय कार्यकर्त्याची गुणवत्ता एवढी दूषित होऊन रसातळाला जाण्याचे कारण काय? वाईट गुणवत्तेची घराणेशाही हे पहिले कारण. दुसरे हे की, आज राजकारणाकडे पैसे कमावण्याचे करीअर म्हणून बघितले जाते. राजकारणात भ्रष्टाचार नॉर्मल झाला आहे आणि लोकांनीदेखील थोडी कुरकुर करत आता ते स्वीकारल्याचा समज सर्वत्र स्थिरावला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, संघटनांशी संबंधित असल्यास केल्या जाणाऱया पापांना आपसूकच एक सुरक्षा कवच लाभते. कुणीही गॉडफादर नसलेला एखादा सर्वसामान्य माणूस हा राजकीय व्यवस्थेच्या शिखर पदावर पोहोचण्याची उदाहरणं अतिशय दुर्मिळच. सर्वसामान्य राजकीय कार्यकर्त्याला आज एका विशिष्ट स्तरापलीकडे जाण्याची, घुसण्याची वा त्या पलीकडची स्वप्नं बघण्याची मुभा नाही. घराणेशाहीने राजकारणाला इतके ग्रासले आहे की, नेत्याच्याच परिवारातील कुणीतरी त्याची जागा घेण्याचा नियमच पडला आहे. पदं त्यांनाच, निवडणुका तेच लढणार, नेतृत्व करायला त्यांनाच मिळणार. मग कार्यकर्त्याला काय मिळणार? टीशर्ट आणि टोप्या? यातून हताश झालेला कार्यकर्ता अगोदर पक्ष नेत्याच्या नावावर चिरीमिरी कमवायला सुरुवात करतो आणि नंतर हिंमत वाढवत आधी छोटे आणि नंतर मोठे घोटाळे करण्याची मजल मारतो. आता त्याला प्रत्येक व्यवहारात कमिशन दिसते. रस्त्यांवरील, वस्त्यांमधील मोकळ्या जागा दिसू लागतात. कन्स्ट्रक्शन, पुनर्विकासाची आवड निर्माण होते. तो आता स्वतःला त्याच्या लहानशा स्तरावरचा मोठा नेता, समाजसेवक समजू लागतो. पुढे त्याच्या नेत्यापेक्षाही मोठा समजू लागतो. तो नेता माझ्यामुळेच मोठा झाला, असे त्याचे ठाम मत तयार होते. जर असे असेल तर आपण का म्हणून मागे राहायचे? आपला हक्क मिळविण्यासाठी आपली ताकद दाखवणे न्याय्यच आहे, याच विचाराने प्रेरित होऊन मग तो आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशने पक्षांतर, बंडखोरी भूमिकेतून निवडणुकीत उतरतो. याचा अर्थ असा नव्हे की, असे करणारे सर्वच चुकीचे असतात. यातील काहींवर खऱया अर्थाने अन्याय झालेला असतो, पण बहुतेक हे वैयक्तिक स्वार्थाने गांजलेले असतात आणि मग यांच्याच इमानदारीचा निवडणुकीच्या बाजारात लिलाव होत असतो.

[email protected]