नाद- मराठी – मराठीची गोडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

>> अरुण जोशी

‘माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत’ असं वि. म. कुलकर्णी यांचं गीत, कमलाकर भागवत यांनी संगीत दिलेलं व गायलेलं सुरेल गाणं आपण अनेकदा ऐकलंय. बारा कोटी लोकांची मराठी भाषा, त्यातल्या अनेक बोली यात विलक्षण गोडवा आहे. दर दहा कोसांवर भाषा बदलते असं पूर्वी म्हटलं जायचं. कारण दळणवळणाची साधनं त्या काळी खूपच कमी असल्याने दूरच्या दोन गावांतल्या भाषेतही थोडाफार फरक असायचा. मग दोन प्रांतांतल्या आणि जगातल्या इतर देशांतल्या भाषा वेगवेगळय़ा असल्यास नवल नाही.

बोलीभाषांच्या सौंदर्याबरोबरच प्रत्येक भाषेतल्या गीतरचनासुद्धा वैविध्यपूर्ण असतात आणि त्यांचं संगीतही. स्थानिक गीत-संगीत त्या भागातली संस्कृती-परंपरा यांचा गंध घेऊन उमलतं. जगात सर्वच देशात ठिकठिकाणी हजारो भाषा विकसित झाल्या. त्यातल्या काही फारच कमी समूहापुरत्या असल्याने हळूहळू नष्ट झाल्या, पण खूप मोठय़ा जनसमूहाकडून बोलल्या जाणाऱया भाषांमधली अभिव्यक्ती इतर भाषिकांनाही खुणावते. गेल्या शंभर-सवाशे वर्षांत ज्ञान-विज्ञानाची भाषा ठरलेल्या इंग्लिशचा प्रभाव व्यवहारात अधिक जाणवत असला आणि ती जागतिक जनसमूहाच्या सोयीची गोष्ट असली तरी संस्कृतीची असेलच असं नव्हे. अगदी इंग्लंडचे शेजारी असलेले फ्रान्स आणि जर्मनीसारखे देश आपली मातृभाषा टिकवून सर्व व्यवहारही आपल्याच भाषेत करण्याचा आग्रह धरतात. आपल्याकडेच आपल्या भाषेचं ‘काय होणार?’ असा प्रश्न चिमूटभर चिंतातुरांना पडतो. शेकडो वर्षे रुजलेली, फुललेली आपली भाषा, ग्रंथ आणि आता तर दृश्राव्य (ऑडिओ व्हिज्युअल) माध्यमातून प्रचंड प्रमाणावर नोंदली गेली असल्याने काळजीचं कारण नाही, मात्र सोयीसाठी इंग्लिश किंवा अन्य भाषेतून शिक्षण झालं तरी मातृभाषेची ओढ आणि गोडी पुढच्या पिढीच्या मनात रुजवणं हे आपलं काम आहे. माझा एक तरुण मित्र अमेरिकेतल्या मराठी मुलांसाठी मराठी शाळा यशस्वीपणे चालवण्याच्या उपक्रमात सहभागी आहे आणि सध्याचे मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष तसेच ज्येष्ठ खगोल वैज्ञानिक प्रा. जयंत नारळीकर यांचं शालेय शिक्षण हिंदी, तर उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये इंग्लिशमधून झालं असूनही त्यांनी मराठीतूनच विपुल विज्ञान साहित्य निर्मिती केली ही प्रेरणादायी गोष्ट आहे.

तेव्हा ‘मराठीची अवीट गोडी’ आणि ओढ मराठी मनात तर टिकून राहिलंच, पण संगीताच्या बाबतीत तर शेकडो वर्षांपासून मराठीचा प्रभाव देशातल्या आणि क्वचित विदेशातल्याही अन्य भाषिकांवर पडलेला दिसतो. मराठी काव्य वैशिष्टय़ात पूर्वी अभंग-ओवी आणि आधुनिक काळात नाटय़गीत, भावगीतांपर्यंतचा प्रवास खूप समृद्ध असा आहे. महाराष्ट्रात दिग्गजांनी शास्त्र्ााrय संगीत रुजवल्यावर इतर भाषिक मंडळीही हिंदुस्थानी शास्त्र्ााrय संगीताचे शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्राकडे वळली. गायनाचार्य बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, प्रा. देवधर यांच्या प्रयत्नांतून संगीताचा प्रसार होत असताना मराठीची गोडी अनेक परभाषिकांना झाली. या सांगीतिक योगदानाचा परिणाम पुढे नाटक आणि चित्रपटात दिसू लागल्यावर मराठी गीतं गाण्यासाठी देशभरातल्या अनेक बिगर मराठी गायकांनी आपले स्वर आवडीने दिले. त्यांना मराठी गीत-संगीताने नादावलं. त्याच ‘नाद-मराठी’चा थोडक्यात वेध आपण या स्तंभातून घेऊया.

देशातील गेल्या शंभर वर्षांतल्या बहुतेक प्रसिद्ध आणि प्रभावशाली गायक-गायिकांनी मराठी गाणी आवर्जून गायिली. त्यावर त्यांच्या गायकीचा आणि त्यांच्या मातृभाषेची काहीशी छटाही त्यातून अपरिहार्यपणे झाली, मात्र या सगळय़ातून ती गीतं अधिकच गोड झाली.

तसं पाहिलं तर महाराष्ट्रातून थेट पंजाबपर्यंत जाऊन पंजाबी भाषेत अभंग रचना करणारे संत नामदेव किंवा त्याआधीही देशभर मराठीतून महानुभाव पंथाचा प्रसार करणारे चक्रधर अशी मोठी परंपराच आहे. मराठी राज्य उत्तर हिंदुस्थानात स्थिरावलं तेव्हा काही भागांत प्रशासकीय आदेशही मराठीत निघत असं म्हणतात. तंजावुरच्या ‘सरस्वती महल’ ग्रंथालयाने मराठीचा वारसा तामीळनाडूत जपला आहे आणि मराठी मातृभाषा असलेल्या लता-आशा यांच्यासारख्या गायिकांनी अनेक हिंदुस्थानी भाषिक गीतांना स्वरमंडित केलंय, तसेच इतर भाषिक ज्ञानवंतांनी मराठीचा नाद कंठगत केल्याचं अनेक गीतांमधून कानी पडतं. त्याचाच थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करूया.