
>> अरुण
पावसाळय़ाचा पहिला बहर ओसरला आणि श्रावणाची चाहूल लागली की गवतफुलांची रांगोळी दिसू लागते. त्य्यावर भिरभिरणारी पिवळी किंवा विविधरंगी फुलपाखरं बागडायला लागतात. याच काळात पारदर्शक पंखांची अतिशय वेगाने, म्हणजे आपल्याला तो आवाज जाणवेल एवढय़ा वेगाने फडफड करत सुंदर ‘चतुरसुद्धा’ ‘या वेलींवर फुलांबरोबर’ खेळ करू लागतात. बालपणी असे चतुर पाहणं, त्यांना ‘पकडण्याचा’ अयशस्वी प्रयत्न करणं यात बराच वेळ जायचा. गेल्या कित्येक वर्षांत मुंबईतल्या आमच्या घराच्या आसपास असे ‘चतुर’ दिसलेले नाहीत.
असे हे चतुर हिंदुस्थानात सर्वत्र आढळतात. पावसाळय़ात पाणथळ जागी त्यांची उत्पत्ती होते. त्यांची मोहक पंख फुटण्यापूर्वीची ‘निम्फ’ अवस्था अनेक वर्षांची असू शकते. पंख फुटल्यानंतर मात्र काही आठवडय़ांपासून सहा महिन्यांपर्यंत जगतात. आपल्याकडचा पावसाळा संपला की, नव्या पाणथळ जागेच्या शोधात प्रजननासाठी निघतात. त्यांचं असं स्थलांतर दरवर्षी सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत देशाच्या दक्षिणेचा विशाल हिंदी महासागर ओलांडून आफ्रिकेच्या पूर्व किनाऱयावर जाऊन विसावतात. केवळ 600 मिलीग्राम ते 1 ग्राम वजनाचे हे उडते जीव आपल्या पंखबळावर सुमारे 13 ते 18 किलोमीटरचा प्रवास करतात.
या चतुरांना ‘ऐकायला’सुद्धा येतं. त्यांना त्यासाठी आपल्यासारखे कान नसतात, पण शरीराच्या खालच्या बाजूला ‘टायपानम मेम्ब्रेन’ नावाचा भाग असतो. ‘मेम्ब्रेन’ म्हणजे अतिशय पातळ पडदा. त्यावर ध्वनीकंपनं आदळली की, चतुरांना इतर काहीतरी कोणीतरी आल्याची जाणीव होते. चतुरांच्या हिंदुस्थान ते आफ्रिका प्रवासाच्या काळात चार-पाच पिढय़ा खर्ची पडतात. पावसाळय़ानंतरची स्वच्छ हवा त्यांना भ्रमणासाठी योग्य असते. पावसात नाजूक पंख बराच काळ भिजले तर मात्र उडणं कठीण होईल. काही शक्तिमान चतुर 7 ग्राम वजनाचेही असतात, पण असे ‘पहिलवान’ थोडेच.
ही चतुरमंडळी आपल्याला फारच उपकारक ठरतात. कारण त्यांचं खाद्य असतं डास-मच्छर, माशा, चिलटं वगैरे. काही वेळा ते बाल फुलपाखरांनाही स्वाहा करतात. चतुरांना भक्ष्य करतात ते बेडूक, मासे इत्यादी सजीव. चतुरांच्या ‘निम्फ’ अवस्थेतील अस्तित्वाला त्यांचा धोका असतो. चतुर पकडू नये. त्यांचं सौंदर्य पाहावं आणि तसंही त्यांना पकडणं कठीणच. कारण ते एका मिनिटाला 1200 ते 2400 वेळा पंखांची फडफड करत उडत असतात. आता त्यांचं ‘मायग्रेशन’ आफ्रिका ते इंडोनेशिया असं सुरू झालं आहे!


























































