आर.के. वारसा आणि वारस

300

>> अरुणा अन्तरकर

‘आर.के.’ची शान, त्याची लोकप्रियता, त्याच्याभोवतीचं वलय काही आगळंच! कारण तो राज कपूरचा स्टुडिओ होता!! हिंदुस्थानी चित्रपटातल्या अभिनयाच्या त्रिमूर्तीपैकी एक आणि दिग्दर्शनाची उत्तुंग प्रतिभा लाभलेल्या राज कपूर नावाच्या चमत्काराचा हा स्टुडिओ मुंबईच्या लोकजीवनाचा एक हिस्सा बनून गेला. म्हणूनच त्याचं ‘असणं’ आणि लवकरच ते नसणं याचा वेध घेणारा हा लेख!

ताजमहाल नसेल तर आग्रा शहराची कल्पना तरी करता येईल का? ‘आर.के.’ स्टुडिओ नसलेल्या मुंबई शहराची तशीच अवस्था आहे. ही अतिशयोक्ती असली तरी तिला वास्तवाची किनार आहेच. खरं म्हणजे ‘आर.के.’- मोबाईलच्या युगातल्या लघुभाषेनुसार ‘आर. के.’चा असा उल्लेख करायला हरकत नसावी-तर ‘आर.के.’ हा काही मुंबईतला पहिला किंवा एकमेव स्टुडिओ नव्हे. त्याच्या जन्माच्या आधीपासून इथे पुष्कळ स्टुडिओ होते आणि त्यांच्यापैकी काही ‘आर.के.’ पेक्षा सुसज्ज आणि सरस होते.

गेल्या दोन दशकांत गुरुदत्त (‘नटराज’ स्टुडिओ), बिमल रॉय (‘मोहन’), एस. मुखर्जी (‘फिल्मालय’) या हिंदुस्थानी चित्रपटाच्या सुवर्णयुगातल्या सर्वच धुरिणांचे स्टुडिओ व काळाच्या पडद्याआड गेले, पण त्यांच्याबद्दल ‘आर.के.’च्या जाण्यासारखा गहिवर आणि गाजावाजा दिसला नाही. या स्टुडिओंनाही वारस होते आणि त्यांनाही तो वारसा जपणं जमलं नाही. गुरुदत्तच्या निधनानंतर त्याच्या चित्रसंस्थेची सूत्रे हाती घेणाऱया त्याच्या धाकटय़ा भावानं,आत्माराम याने ‘शिकार’ सारखा ‘सुपर हिट’ चित्रपट दिला, पण नंतर जेमतेम दोन चित्रपटांतच (‘आरोप’, ‘उमंग’) ‘गुरुदत्त फिल्मस’चा ग्रंथ आटोपला.

‘नटराज स्टुडिओ’मधे गुरुदत्तला शक्ती सामंत आणि रामानंद सागर यांच्यासारखे त्या काळातले तालेवार निर्माते-दिग्दर्शक भागीदार होते. त्यांचं दुर्दैव तर एवढं मोठं की, ‘आराधना’कार आणि ‘आँखे’ यांच्या निर्मात्यांना आपल्या हयातीतच आपल्या संस्था बंद पडल्याचं दुःख सोसावं लागलं. शक्तीदारांचा सुपुत्र अझीम आणि सागर यांचे छायालेखक व लेखन करणारे दोन चिरंजीव (अनुक्रमे प्रेम व मोती सागर) आपापल्या वडिलांचा वारसा पुढे न्यायला असमर्थ ठरले. एस. मुखर्जींच्या ‘फिल्मालय’कडे जॉय मुखर्जीसारखा ‘चालणारा’ हीरो होता, राम मुखर्जीसारखे दिलीपकुमारला दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक होते (‘लीडर’) तरी त्या संस्थेचा निभाव लागला नाही. मुखर्जी आणि सागर यांच्या वारसांनी बराच काळ नेटानं प्रयत्न केला, पण त्यांच्या स्टुडिओंना टाळं लागणं चुकलं नाही.

एकंदरीतच वारसा आणि वारस हा चंदेरी दुनियेत महाभारतासारखा अवाढव्य व्यापक विषय आहे. काळाचा महिमा म्हणावा की विधिलिखित हे कळत नाही, पण राज कपूरप्रमाणे बहुतेक धुरंधर निर्माते-दिग्दर्शकांचे वारस बऱयापैकी गुणवत्ता असून पुष्कळ काम केल्यानंतरही कमनशिबी ठरलेले दिसतात. त्यात राज कपूरच्या वारसांवर टीका जास्त होते याचं कारण एकच – राज कपूरचं स्टार वलय! राज कपूर, गुरुदत्त, बिमल रॉय, बी. आर. चोप्रा यांनी जे असामान्य कर्तृत्व दाखवलं त्याच्याच वर्तुळात त्यांच्या वारसांना काम करावं लागतं. त्यांना म्हणावं तसं कलात्मक स्वातंत्र्य मिळत नाही. स्वतःची वेगळी वाट चोखळता येत नाही. प्रेक्षकांच्या त्यांच्याकडून फार मोठय़ा अपेक्षा असतात. त्यामुळे वारसांची कोंडी होते. तिथे वारसांचा टिकाव लागत नाही. ते मनापासून प्रयत्न करतात तरीही कोलमडून पडतात. रणधीर कपूरचंच उदाहरण पहा. राज कपूरला शोभेशा कौशल्यानं त्यानं ‘हीना’ साकारला, मात्र या यशानं त्याचा आत्मविश्वास वाढण्याऐवजी खालावला. एका बाजूनं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता, तर दुसऱया बाजूनं ‘हीना’ राजनंच दिग्दर्शित केला, रणधीरनं ‘हीना फक्त पूर्ण केला, अर्धाअधिक चित्रपट राजनंच पूर्ण केला होता अशा अफवा पसरल्या. त्यानंतर आत्मविश्वास खचलेल्या रणधीरनं दिग्दर्शनाचा विचारच सोडून दिला. राजनं जाहीर बोलून दाखवलं नसेल, पण अभिनयासाठी ऋषी आणि दिग्दर्शनासाठी रणधीर यांना राजनं वारस म्हणून मनोमन नेमस्त केलं होतं. ऋषीनं त्याचा विश्वास सार्थ केला, मात्र दिग्दर्शनाबाबत तोही डावा ठरला. हीरो म्हणून सद्दी संपली तेव्हा ऋषीनं ‘आ अब लौट चले’ हा चित्रपट ‘आर.के.’साठी दिग्दर्शित केला, मात्र खुद्द त्याच्यावरच परत जाण्याची वेळ आली!

त्याच्या आधी त्याच्या धाकटय़ा भावानं राजीव कपूरने दिग्दर्शन करून पाहिलं होत. ‘राम तेरी गंगा मैली’ नंतर अभिनयाच्या क्षेत्रात आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात आल्यावर केलेली ती तडजोड होती, पण त्याचा ‘प्रेमग्रंथ’ हा पिताजींच्याच ‘प्रेमरोग’चा निस्तेज ‘रिमेक’ होता. तो प्रेक्षकांनी नाकारला आणि तिथेच राजीव कपूरच्या कारकीर्दीचाच ग्रंथ आटोपला! सारांश, राज कपूरच्या दिग्दर्शनाचा वारसा जपण्यांचे त्याच्या वारसांचे प्रयत्न फसले. राजच्या अभिनयाचा वारसा ऋषीनंतर करिश्मा, करीना व रणवीर या त्याच्या नातवंडांनीही यशस्वीपणे पुढे नेला, पण दिग्दर्शन आणि चित्रपटनिर्मिती यांच्यापुढे ‘दी एंड’ची पाटी लागली!

– आणि तिथेच, तेव्हाच खऱया अर्थी ‘‘आर.के.’चा शेवट झाला. ‘आर.के.’ स्टुडिओ संपला नाही, ‘आर.के. फिल्मस’ही चित्रसंस्था संपली आणि म्हणूनच ‘आर.के.’ स्टुडिओ संपला! ‘आर.के.’कडे हा व्यावसायिक दृष्टिकोन नव्हता. त्याचा मूळपुरुषापासून तो त्याच्या नातवंडांपर्यंत या घराण्यात सगळे अभिनेते होते. त्यांना स्टुडिओच्या धंद्याची गणितं जमण्यासारखी नव्हती. मुळात चेंबूर हे चित्रनिर्मितीसाठी अनुकूल ठिकाण नव्हतं. व्यावसायिकदृष्टय़ा ते आडगावच होतं. राज कपूर तर व दिग्दर्शक म्हणून सक्रिय होतं म्हणून निभावलं. चित्रपट निर्मितीचा केंद्रबिंदू दादर उपनगरातून गोरेगावकडे झुकला, चित्रनगरी आणि ‘वायआरएफ’ यांच्यासारखे विशाल, अद्ययावत स्टुडिओ उभे राहिले तेव्हा ‘आर.के.’ची स्थिती फारच वाईट झाली.

मात्र ही ‘आर.के.’च्या वारसांचा नाकर्तेपणा नव्हता. त्यांनी ‘आर.के.’ ही चित्रसंस्था व स्टुडिओ जपण्याचा खरं म्हणजे जिवापाड प्रयत्न केला. राज कपूरच्या निधनानंतर (अंदाजे) वीस-पंचवीस वर्षांनी त्याचा स्टुडिओ बंद होतोय म्हणजे कपूरपुत्रांनी प्रयत्नात कसूर केला नाही. आता ‘आर.के.’चे तिघेही वारस – रणधीर, ऋषी, राजीव वयानं सत्तरीच्या अलीकडे पलीकडे आहेत. तिघा भावांपैकी रणधीर बायपास सर्जरीतून गेला आहे, तर ऋषी कपूर कॅन्सरवर उपचार घेतो आहे. या स्थितीत त्यांच्याकडून स्टुडिओचा प्रचंड डोलारा सांभाळण्याची अपेक्षा धरता येणार नाही. प्राप्त परिस्थितीत ‘आर.के.’ बंद होण्याखेरीज दुसरा मार्ग नव्हता अन् तो मालमत्ता म्हणून विकला जाण्याखेरीज पर्याय नव्हता. कलाकार शेवटी मणसंच असतात. व्यवहार त्यांनाही बघावा लागतो. वयापुढे आणि काळापुढे कुणाचंही चालत नाही. ‘आर्के’चं प्रयाण कठोर वस्तुस्थिती म्हणून स्वीकारलं पाहिजे.

‘आर.के.’च्या आधी राज कपूरच्या ‘राजबाग’ या पुण्यातल्या प्रचंड मालमत्तेची (आणि सेमी स्टुडिओची) अशीच स्थिती झाली. ‘राजबाग’ विकत घेणाऱयांनी तिथे राज कपूरच्या स्मरणार्थ छानसं कलासंग्रहालय उभारलं आहे. त्या परिसरात बांधलेल्या शाळेला पृथ्वीराज कपूर याचं नाव दिलं आहे. चेंबूरचा ‘आर.के.’ विकत घेणारे गोदरेज अशी सहृदयता दाखवतील अशी अपेक्षा करावी का? तिथे उभ्या राहणाऱया प्रचंड वास्तूत राज कपूरच्या नावे एखादा कोपरा ‘आर्के’च्या नामफलकासह दिसेल का?

….याचं उत्तर काळच देईल. दरम्यान, राज कपूर आणि ‘आर.के.’चे टीव्हीवर सतत दिसणारे चित्रपट हा दिलासा समजायला पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या