
>> अस्मिता यंदे
साधं लिहावं, सोपं लिहावं, वाचल्याने भाषेचा उत्कर्ष होईल असे विचार व्यक्त करणारे कवी अर्चिस जोशी यांचा ‘मनोरेखित’ हा काव्यसंग्रह खऱया अर्थाने कविता म्हणजे नेमके काय याची प्रचीती देणारा आहे. मनपटलावर उमटलेल्या भावनांना किती सहजपणे शब्दांनी सजवले आहे. भाषेतील अलंकारांनी सजलेली कविता मनाला भावते, आनंद देते, हो ना! ‘भाषेच्या सौंदर्यावर सजणारा स्वर्गीय साज म्हणजे कविता’ अशी कवितेची सुंदर व्याख्या करणाऱया कवीच्या कविताही तितक्याच मनोवेधक आहेत.
शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘मनोरेखित’ या काव्यसंग्रहात 26 कवितांचा समावेश आहे आणि या कविता जीवनाचे विविध रंग दर्शवतात. कधी हळुवार, कधी मनोव्यथा मांडणारी, संवेदनशील, समाजाचे रूप, वास्तव, एक माणूस म्हणून वाटणारी भावना अशा पद्धतीने या संग्रहातील कविता प्रवास करत पुढे जातात आणि वाचकांनासुद्धा त्यात सामावून घेतात.
या काव्यसंग्रहातील ‘वारी’ कवितेच्या ओळी पहा…
पायी चालतो मी
वाट पंढरीची
ओढ लागली मज
तुझ्या दर्शनाची
या रचनेतून कवीने विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वारकऱयांचे चित्र रंगवले आहे. सध्याचं युग धावपळीचं आहे. जिथे पाहावे तिथे सतत स्पर्धा सुरू आहे. आयुष्य मशीन झालेय. अशांना कवी ‘जरा थांब’ असे सांगत आहेत.
समाधानात मिळतील
आयुष्याचे क्षण
फक्त जरा थांब…
नोकरी, जबाबदारी यामुळे आयुष्य जगणं हरवून गेले आहे. पुन्हा नव्याने सुरुवात करायची असेल तर थोडा विसावा ही हवा हा महत्त्वाचा संदेश या कवितेमधून मिळतो. ‘कॉर्पोरेट मी’ ही कविता परस्परांमधील हरवलेल्या संवादावर भाष्य करते आणि व्यक्त होण्याचे आवाहनसुद्धा करते.
आपल्या मनात एखादी कल्पना आली, विचार आला तर तो व्यक्त करण्यासाठी आपल्याला शब्दांची गरज भासते. भाषा हे संवाद साधण्याचे माध्यम आहे आणि हे शब्दच आपले विचार, संवेदना व्यक्त करतात.
हे शब्द कधी आनंद देतात तर कधी अश्रूसुद्धा देतात. कोणता शब्द कधी, कुठे, कसा वापरावा याचे भान असणेही तितकेच गरजेचे असते.
अरे शब्दा! माणसात नि तुझ्यात
फरक तो काय?
वेळेवर नाही भेटलास तर
झुरण्याला पर्याय काय?
अशा शब्दांत शब्दांचे महत्त्व कवितेतून विशद केले आहे. ‘व.पु.’ या कवितेतून व.पु. यांच्या लेखनाची एक ओझरती सफर घडवली आहे. आजच्या पिढीलासुद्धा व. पु. यांच्या लेखनाने आकृष्ट केले आहे. जीवनाचे खरे मर्म आणि वास्तव त्यांनी आपल्या लेखनातून मांडले.
आकर्षण ते प्रेमाचा प्रवास ‘प्रेम’ कवितेत कवीने रेखाटला आहे. नात्यांमधील प्रेमाचा गोडवा यात अधोरेखित झाला आहे. जेव्हा मुलींचा जन्म होतो तेव्हा बाबाचाही नव्याने जन्म होतो. आईला जेवढा आनंद होतो तितकाच बापालाही होतो. मुलीच्या जन्मापासून ते तिच्या सासरी जाईपर्यंत बाबाच्या मनाची काय अवस्था असते, ती अवस्था ‘उमलते फूल’ या कवितेत नेमकेपणाने कवीने मांडली आहे. आयुष्यात काहीच कायमस्वरूपी, शाश्वत नाही. माणूस जगतो तो आठवणींवर. त्या आठवणींचा आधार असतो नाही का? ‘आधार’ या कवितेतून कवी सांगतो आहे. एकटेपणात तुझी आठवणच जगण्याचा आधार आहे…
सहवास नसो वा स्पर्श नसो
बस असा तुझा आधार असो
एकलेपणी मनाच्या माझ्या
नाम तुझे पुनः पुन्हा स्मरो…
प्रगल्भ आणि आशयघन कवितांचा हा संग्रह खरेच वाचनीय आहे. अलगदपणे या कविता आपल्या प्रवाही रचनेने वाचकांना भुरळ पाडतात. पुस्तकात कवितेला साजेशी रेखाचित्रे दिलेली आहेत. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक कवितेच्या आधी कवींने थोडक्या शब्दांत कवितेचे गाभा दिला आहे. त्यामुळे कवितेचा आशय समजण्यास मदत होईल आणि वाचकाला आपल्या आवडीनुसार कविता वाचता येईल. या पुस्तकाचे शीर्षक जसे लक्ष वेधून घेते तसेच मुखपृष्ठही लक्ष वेधून घेते. काव्यसंग्रहाला समर्पक असे मुखपृष्ठ समीर पवार यांनी रेखाटले आहे. एकूणच ही सुंदर निर्मिती वाचकांनी अनुभवायला हवी.
मनोरेखित
कवी – अर्चिस जोशी
प्रकाशक – शारदा प्रकाशन
मूल्य – रुपये 100/-
























































