दखल – भावनांची सहजसुंदर साकारलेली अभिव्यक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अस्मिता येंदे

लेखिका सुजाता घाटगे यांच्या प्रगल्भ लेखणीतून साकारलेला ‘मी मनमुराद’ हा ललित लेखसंग्रह म्हणजे मुक्तचिंतनाचे भावरंग आहेत. सृजनसंवाद प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या संग्रहात एकूण 32 लेख समाविष्ट असून विविध विषयांवर त्यांनी सुरेख चिंतन केले आहे. हे चिंतन म्हणजे स्वतशी साधलेला मनमोकळा संवाद आहे.

‘मी मनमुराद’ ललित लेखसंग्रहातील ‘बहर’ लेखात ऋतूनुसार बहरणाऱया झाडांबद्दल किती सुरेख विवेचन केले आहे. बहावा, गुलमोहर, सोनचाफा यांचं बहरणं किती वेगवेगळे अर्थ प्रतीत करत असते. माणसानेही असेच बहरायला हवे, या फुलांसारखे. तो क्षण जगता यायला हवा. वेळ आली की, ती झाडे बहरून येतातच. या ‘बहर’ शब्दांतून अभिप्रेत असणारे विविध अर्थ या लेखातून उलगडले आहेत. या लेखात लेखिका सांगतात, या झाडांचं मोहरणं तरी कसं! रणरणत्या उन्हातलं. हळदीकुंकवाच्या करंडय़ासारखं. किती सुंदर उपमा आहे ! वर रणरणतं ऊन आणि भर उन्हात बहरलेला गुलमोहर लेखिकेला हळदीकुंकवासमान भासते.

झाडांची पाने सुकली की, खाली गळून पडतात, त्याची पाचोळा म्हणून गणती होते. त्या पाचोळ्यातून मानवी जीवनाची अवस्था संवेदनशीलतेने व्यक्त झाली आहे. झाड जेव्हा बहरलेलं असतं, छान दिसतं. जेव्हा तो या समूहापासून वेगळा होतो, त्याचीही वेदना असेल ना! लेखिकेला त्यात एकटेपणाची भावना दिसली. ‘सुकलेल्या पानांवरची नक्षी डोळ्यात भरते आणि जितका आपण हात फिरवू तितकी आपली होतात ती पणे… त्या शिरा म्हणजे त्यांचा जीवनप्रवासच ना !’ या ओळी मनाला अधिक भावतात. असा प्रत्यय पानापानांवर अनुभवायला मिळेल. या झाडांप्रमाणे प्रत्येक क्षण आनंदाने जगता यायला पाहिजे. जीवनातील खरे सौंदर्य टिकवता आले पाहिजे. एखाद्या गोष्टीचा शेवट म्हणजे एक नवी सुरुवात असते ही उमेद देणारा हा लेख आहे.

या ललित लेखांमध्ये लेखिकेने काही वर्णने विशद करण्यासाठी कवितेच्या ओळींचा समर्पक वापर केला आहे. प्रसंगी स्वत लिहिलेल्या कवितेचा संदर्भ अगदी सुयोग्यरीत्या केलेला आहे. सोबतच कवी ग्रेस, कवयित्री शांताबाई शेळके, बहिणाबाई बौधरी, गीतकार गुलजार यांच्या रचनेमुळे लेखाला परिपूर्णता लाभली आहे. मूलत: लेखिकेचे असलेले कविमन या लेखांमधून काव्यरूपात झळकत राहते.

‘भाव देखणे सुंदर’ लेखातून मुक्या जिवांच्या डोळ्यातील तरल, निर्मळ भाव टिपताना लेखिका शब्दांविना व्यक्त होणारे भावतरंग, डोळ्यात निर्माण होणाऱया प्रतिमा यांचं भावपूर्ण वर्णन करत आहेत.

जीवनात माणसाने परिपूर्ण होण्याकडे नाही, तर आपला विकास, प्रगती कशी होईल याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मानसिक, भावनिक पातळीवर माणसाने मनात शुद्ध भाव जपला पाहिजे. नाहीतर ‘मनी नाही भाव आणि देवा मला पाव’ असे होईल. परिपूर्णतेचा प्रवास, त्याचा नेमका अर्थ काय आणि आपण कशा प्रकारे कृती करावी, यावर महत्त्वपूर्ण विवेचन करणारा ‘भावपूर्ण ते परिपूर्ण’ हा लेख आहे.

या आणि अशा विविध विषयांनी बहरलेला हा ललित लेखसंग्रह विचार करण्याची एक वेगळी दृष्टी प्रदान करतो. सहजसुंदर आयुष्य सहज घडत नसतं तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कृतीतून घडत असतं.

जीवनाला अर्थपूर्णता प्राप्त करून देण्यासाठी विचारांना कृतीची जोड द्यायला हवी आणि व्यक्तही व्हायला हवे. अगदी मनमुराद, लेखिकेसारखे…!

मी मनमुराद – ललित लेखसंग्रह
लेखिका : सुजाता घाटगे
प्रकाशक : सृजनसंवाद प्रकाशन
मूल्य : 200 रुपये