मंथन : आभासी चलनांची आभासी दुनिया!

>>अतुल कहाते

नेटफ्लिक्सवर सध्या ‘स्क्विड गेम’ या अत्यंत गाजत असलेल्या मालिकेच्या नावाचा वापर करून त्याच नावाचं एक आभासी चलन उपलब्ध करून देण्यात आलं. कुठलाही विचार न करता लोकांनी या चलनामध्ये धडाधड गुंतवणूक केली. ऑनलाइन गेम्स खेळण्यासाठीची रक्कम या चलनाद्वारे भरता येईल आणि शिवाय त्यातून मिळणारं बक्षीस याच चलनामध्ये मिळेल असं सांगण्यात आलं. अखेर योग्य वेळ आणि संधी साधून या चलनाच्या निर्मात्यांनी गाशा गुंडाळला आणि या चलनाचे व्यवहार ठप्प झाले. जगभरातल्या हजारो लोकांचे हात होरपळले.

‘एखादी गोष्ट खरी असूच शकत नाही इतकी भन्नाट वाटत असेल तर ती बहुधा खरी नसतेच’ असं एक प्रसिद्ध विधान आहे. अलीकडे ‘क्रिप्टो करन्सी’ अर्थात आभासी चलन या बाबतीमध्ये सुरू असलेल्या उलाढाली बघून हटकून या विधानाची आठवण होते. नेटफ्लिक्सवर सध्या ‘स्क्विड गेम’ या अत्यंत गाजत असलेल्या मालिकेच्या नावाचा वापर करून त्याच नावाचं एक आभासी चलन उपलब्ध करून देण्यात आलं. कुठलाही विचार न करता लोकांनी या चलनामध्ये धडाधड गुंतवणूक केली. ऑनलाइन गेम्स खेळण्यासाठीची रक्कम या चलनाद्वारे भरता येईल आणि शिवाय त्यातून मिळणारं बक्षीस याच चलनामध्ये मिळेल असं सांगण्यात आलं. नंतर या चलनाचा वापर इतर आभासी किंवा खरी चलनं घेण्यासाठी करता येईल असंही या चलनाच्या निर्मात्यांचं म्हणणं होतं. लोकांनी हावेपोटी या चलनाची जोरदार खरेदी केली.

एका अमेरिकी डॉलरचा शंभरावा भाग म्हणजे एक सेंट. 26 ऑक्टोबरच्या सुमाराला ‘स्क्विड गेम’ चलनाची किंमत एक सेंट एवढी होती. म्हणजे साधारण 75 पैसे. त्यानंतर एक आठवडा झाला तेव्हा ‘स्क्विड गेम’ चलनाची किंमत किती असावी? 2,856 डॉलर्स, म्हणजे 2.11 लाख रुपये! अगदी धातूचं सोनं करणारं कल्पित परीस कुणाकडे असेल तरी तो माणूस इतक्या झटपट इतका श्रीमंत होऊ शकणार नाही. याला वेडेपणा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? अशा प्रकारे या चलनाविषयी भाकड कल्पित कथा पसरवून या चलनाची किंमत फुगवत नेण्याचं कसब त्याच्या निर्मात्यांना जमलं. आपण खरेदी केलेल्या चलनाची किंमत अशा प्रकारे वर जात राहिल्याचं बघून गुंतवणूकदार खूश होत गेले. त्यांनी आणखी जोमानं याची खरेदी सुरू केली. अखेर योग्य वेळ आणि संधी साधून या चलनाच्या निर्मात्यांनी गाशा गुंडाळला आणि या चलनाचे व्यवहार ठप्प झाले. जगभरातल्या हजारो लोकांचे हात होरपळले. 33.80 लाख डॉलर्स एवढा यामधला फसवणुकीचा आकडा होता. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. याची सुरुवात बिटकॉईन या चलनापासून झालेली असल्यामुळे त्याविषयी थोडक्यात बोललं पाहिजे. बिटकॉईनच्या संदर्भात ‘क्रिप्टो करन्सी’ हा शब्द वारंवार वापरला जातो. फक्त संगणकीय यंत्रणा वापरून केले जाणारे चलनाचे व्यवहार म्हणजे ‘क्रिप्टो करन्सी’ असं आपण ढोबळमानानं म्हणू शकतो. हे चलन आणि त्यामधले सगळे व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी ‘च’ची भाषा अर्थात ‘क्रिप्टोग्राफी’चा वापर होत असल्यामुळे ‘क्रिप्टो’ (सुरक्षा) आणि ‘करन्सी’ (चलन) या दोन शब्दांमधून ‘क्रिप्टो करन्सी’ हा शब्द तयार झाला आहे. म्हणजेच बिटकॉईनची निर्मिती आभासीच असते. बिटकॉइन्सचं अस्तित्व फक्त संगणकांमध्येच असतं. या आधुनिक संगणकीय चलनामध्ये मात्र यातलं काहीच नसतं. म्हणूनच हे आभासी चलन असतं.

साहजिकच आपण एक बिटकॉईन विकत घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला संगणकीय यंत्रणाच वापरावी लागेल. हे आभासी चलन म्हणजे संगणकीय यंत्रणांमधलं ‘वॉलेट’ असतं. जसा आपण आपला इ-मेल आयडी तयार करून आपलं इंटरनेटवरचं आभासी अस्तित्व निर्माण करतो तसंच आपलं वॉलेट ही आपली आभासी चलनाच्या दुनियेतली ओळख असते. आपले आभासी पैसे याच वॉलेटमध्ये असतात. असं प्रत्येकाचं स्वतंत्र वॉलेट असतं आणि आपण दुसऱ्याला आभासी पैसे पाठवले तर त्या माणसाच्या वॉलेटच्या शिल्लक रकमेत भर पडते.

बिटकॉईनवर जर कुठल्या सरकारचं नियंत्रण नसेल तर त्याचं कामकाज चालतं तरी कसं? यासाठी बिटकॉईनच्या निर्मात्यांनी त्याचं कामकाज बिटकॉईनचा वापर करणाऱ्या लोकांनीच करावं यासाठीची व्यवस्था केलेली आहे. ही व्यवस्था बिटकॉईनसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये असते. त्यानुसार कुठले व्यवहार योग्य समजावेत, कुठले व्यवहार घोटाळ्यांसारखे समजावेत, नव्या बिटकॉइन्स किती दरानं तयार व्हाव्यात या सगळ्यांसाठीचे नियम असतात. साहजिकच कुठल्याही बाह्य नियंत्रणाविनाच बिटकॉईनचं काम व्यवस्थितपणे सुरू राहू शकतं. किंबहुना सरकारी व्यवस्था, चलन आणि मध्यवर्ती बॅंका यांच्यावरचा विश्वास हे सगळं उडून गेल्यामुळेच बिटकॉईनची निर्मिती झाली. साहजिकच कुठल्याही सरकारची किंवा मध्यवर्ती बॅंकेची ढवळाढवळ बिटकॉईनचं सॉफ्टवेअर चालवून घेत नाही.

नेमका याच संकल्पनेचा गैरवापर इतर अनेक जणांनी सुरू केला. ‘स्क्विड गेम चलन’ या चलनाच्या बाबतीतही तेच घडलं. लोकांना सगळीच आभासी चलनं अधिकृत वाटतात. या सगळ्या चलनांच्या किमती वर जात राहतील असा एक मोठा भ्रम पसरलेला आहे. साहजिकच फारशी चौकशी न करता आणि कसलाही विचार न करता लोक लोभापोटी अशा चलनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करताना दिसतात. हे सगळं चित्र असं धूसर आणि धोकादायक असताना सर्वसामान्य माणसाने आभासी चलनांच्या वाटय़ाला जाऊ नये असं म्हणावंसं वाटतं. याचा अर्थ या संकल्पनेमध्ये अजिबातच दम नाही असं मुळीच नाही. उलट भविष्यात कदाचित आभासी चलनांना आपल्या नियमित चलनांइतकं महत्त्वाचं स्थान मिळू शकेल असं या क्षेत्रामधले जाणकार ईश्वर प्रसाद त्यांच्या ताज्या पुस्तकात म्हणतात. ठिकठिकाणच्या मध्यवर्ती बॅंकाही आपापली राष्ट्रीय आभासी चलनं आणण्याच्या तयारीत आहेत. हे सगळं बघता आभासी चलनांचं युग लवकरच अवतरेल असं म्हणता येईल. तरीही त्याला जोपर्यंत अधिकृत दर्जा प्राप्त होत नाही आणि त्यांच्या विषयीच्या कायद्यांची स्पष्टता येत नाही तोपर्यंत त्यापासून लांब राहणंच श्रेयस्कर राहील. तरीही त्यात पडायचंच असेल तर त्याकडे विलक्षण जास्त धोका आणि नशीब चांगलं असेल तर विलक्षण चांगला परतावा म्हणून बघावं, हेच खरं!

आपल्या सरकारनं तसंच रिझर्व्ह बॅंकेनं यासंबंधीची नियमावली अत्यंत तातडीनं आखण्याची गरज आहे. तसंच लोकांचं प्रबोधन करणं आणि यामधल्या धोक्यांची त्यांना जाणीव करून देणं या गोष्टीसुद्धा अतिशय मोठय़ा प्रमाणावर झाल्या पाहिजेत. अर्थात यामुळे सगळ्या समस्या दूर होतील असं अजिबातच नाही. याचं कारण म्हणजे ही आभासी चलनं फक्त इंटरनेटच्या माध्यमातून चालवली जात असल्यामुळे तसंच त्यांच्या निर्मात्यांविषयी किंवा कामकाजाविषयी कसलीच माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे नेमकं कुणाला पकडणार आणि कुणावर पाळत ठेवणार हा अनुत्तरितच प्रश्न आहे. यावर जागतिक पातळीवर किमान महत्त्वाच्या देशांनी एकत्र येऊन उपाययोजना केल्या पाहिजेत.

(लेखक माहिती तंत्रज्ञानाचे तज्ञ आहेत)

 [email protected]