55 वर्षांच्या आठवणींची ओली… सुकी पानं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अरूण दाते

>> अतुल दाते

अरुण दाते… यशवंत देव आणि मंगेश पाडगांवकर… लेखणी… संगीत आणि स्वर या तिन्ही माध्यमांतून तिघांनी मराठी रसिक मनावर राज्य केले… पाडगांवकरांचे अर्थवाही शब्द देवकाकांच्या सूरसाज लेवून अरुणकाकांच्या आवाजात मखमाली रेशमी होऊन जायचे… भेट तुझी माझी स्मरते… अखेरचे येतील माझ्या… या दोन गीतांना आज 55 वर्षे होत आहेत… त्यानिमित्ताने

‘अखेरचे येतील माझ्या’ आणि ‘भेट तुझी माझी स्मरते’ या मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या गाण्यांना यशवंत देव यांनी स्वरबद्ध केले आणि माझे वडील अरुण दाते यांनी ही दोन्ही गाणी गायली. या गोष्टीला आता 55 वर्षे पूर्ण होत आहेत. ‘शुक्रतारा मंदवारा’ नंतर ‘सखी शेजारीणी आणि हात तुझा हातात…’ या अत्यंत लोकप्रिय गाण्यांनंतर बाबांनी गायलेली ही दोन गाणी. आधीच्या तीन गाण्यांप्रमाणेच आजही मराठी रसिकांच्या ओठावर आहेत.

यशवंत देव
यशवंत देव

ही गाणी आज पुन्हा ऐकत असताना अशी गाणी आता पुन्हा येणार नाहीतच का? असा एक वेगळा प्रश्न मनात डोकावून जातो. या गाण्यांबद्दल मला यशवंत देवांनी सांगितलेला किस्सा मी आज आपल्याला सांगतो. तो किस्सा म्हणजे, सुधीर फडके म्हणजे बाबुजी यांना घेऊन पाडगावकरांची काही गाणी ध्वनिमुद्रित केली होती. ती गाणी म्हणजे ‘कधी बहर कधी शिशिर’, ‘कुठे शोधीसी रामेश्वर’,… या गाण्यांच्या अमाप लोकप्रियतेनंतर देवकाका बाबुजींकडे पुन्हा गाणी घेऊन गेले. पण बाबुजी त्यांच्या चित्रपटांना संगीत देण्याच्या कामात इतके व्यस्त होते की, जरी त्यांना ती गाणी आवडली तरी ती गायला त्यांच्याकडे वेळ नव्हता.

देवसाहेब निराश झाले, पण पाडगावकरांनी त्यांना असे सुचवले की, तुम्ही अरुणशी का नाही बोलत, त्याला विचारा. तो नक्की गायील आणि मग तसेच झाले की, यशवंत देवांनी बाबांना फोन करून असं म्हटलं की, मी सुधीर फडक्यांकडे पाडगावकरांची दोन अप्रतिम नवीन गाणी घेऊन गेलो होतो; पण त्यांना ती गाणी रेकॉर्ड करायला सध्या वेळ नाही. म्हणून मी तुला विचारतोय की, तू ही गाणी गाशील? यावर बाबा म्हणाले, तुमची आणि खळेसाहेबांची गाणी माझ्यासाठी हुकूम असतो. त्यातून ती पाडगावकरसाहेबांची असतील तर मग प्रश्नच मिटला. मी तुमच्याकडे गाणी कधी शिकायला येऊ ते सांगा. ती गाणी बाबांनी शिकली, गायली. ती गाणी बाबांच्या अनेक लोकप्रिय गाण्यांप्रमाणे आजही रसिकांच्या हृदयात घर करून आहेत. ती गाणी म्हणजे ‘अखेरचे येतील माझ्या’ आणि ‘भेट तुझी माझी स्मरते.’ ही गाणी ऐकताना मला असे जाणवते की, मराठी भावसंगीताचा तो ‘सुवर्णकाळ’ होता. बाबांनी ज्या संगीतकारांबरोबर सर्वात जास्त काम केलं ते म्हणजे यशवंत देव आणि श्रीनिवास खळे. तसेच हृदयनाथ मंगेशकर यांच्याही सोबत संगीत दिग्दर्शनात बाबांनी काही अप्रतिम गाणी गाऊन ठेवली आहेत. जरी बाबांनी इतर संगीतकारांबरोबर काम केलं असेल तरी सगळय़ात जास्त गाणी कवी म्हणून त्यांनी मंगेश पाडगावकरांचीच गायली.

mangesh-padgaonkar

पाडगावकर बाबांना वडिलांच्या स्थानी, गुरूच्या स्थानी आणि अंशतः मित्राच्या स्थानीही होते. माझं भाग्य की, मी बाबा आणि पाडगावकर यांचे एकत्रित असे 55 रंगमंचीय कार्यक्रम केले. साधारण 2010 ते 2013 या तीन वर्षांच्या काळात आम्ही हे कार्यक्रम केले. याच कार्यक्रमांनी मला बरंच काही दिलं. मुख्य म्हणजे मला बाबांसोबत पाडगावकरांचा सहवास लाभला. जशी ही दोन गाणी बाबूजी न म्हणता ती बाबांकडे आली तशी बाबांनी न म्हणता दोन गाणी दोन उत्तम गायकांकडे गेली. त्यातलं एक गाणं म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटातलं आहे. याची तालीम बाबांच्या आवाजात झाली होती, पण ते गायलं महेंद्र कपूर यांनी. तसचं दुसरं गाणं म्हणजे पाडगावकरांचंच एक प्रसिद्ध गाणं ज्याची रिहर्सल बाबांच्या आवाजात झाली आणि ते ध्वनिमुद्रित होण्याच्या आधीच बाबांनी अनेक कार्यक्रमांतून म्हणायला सुरुवात केली, पण शेवटी ते हृदयनाथ काकांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालं. ते गाणं म्हणजे ‘लाजून हासणे अन् हासून ते पाहणे’. पण बाबांच्या मनाचा मोठेपणा इतका की, ते गाणं हृदयनाथ काकांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्यानंतर त्यांनी ते कार्यक्रमातून स्वतःच्या आवाजात गाणं बंद केलं. ‘हृदयनाथच्या आवाजात रेकॉर्ड झालंय त्यामुळे आता हे गाणं त्याच’ं, असं आवर्जून सांगत. इतका सच्चेपणा बाबांच्या स्वभावात होता.

तो काळ असा होता की, अनेक संगीतकारांना बाबांच्या आवाजात गाणी ध्वनिमुद्रित करून घ्यायची होती. त्यातले एक म्हणजे संगीतकार वसंत प्रभू. त्यांनी एका गाण्याची चाल बनवली आणि एचएमव्ही कंपनीला सांगितलं की, मी दोन गाण्यांची चाल बनवली आहे, पण मी ते एका अटीवर रेकॉर्ड करीन. ‘शुक्रतारा मंदवारा’ हे गाणं ज्या गायकाने गायलं तो गायक मला हवा. शेवटी तसच झालं. त्यांची दोन गाणी ही कवी वा. रा. कांत यांना लिहिली होती. ती दोन्ही गाणी बाबांच्या आवाजात ध्वनिमुद्रित होऊन लोकप्रिय झाली. ती गाणी म्हणजे, ‘सखी शेजारीणी तू हसत राहा’ आणि ‘सूर जुळले शब्दही जुळले’.
अनेक संगीतकारांना बाबांच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करायची होती. पण बाबांची अट असायची की, कविता जर उत्तम नसेल तर मी कुणाचीच गाणी गाणार नाही आणि तसेच झाले. बाबांच्या 55 वर्षांच्या सांगीतिक कारकीर्दीमध्ये त्यांनी रेडिओ, टेलिव्हिजन आणि रेकॉर्डिंग मिळून फक्त 115 ते 120 गाणी गायली. म्हणूनच त्यांच्या गाण्यांचा सांगीतिक दर्जा उत्तम राहिला.

पाडगावकर आणि यशवंत देव यांच्या ध्वनिमुद्रित झालेल्या गाण्यांमध्ये सगळय़ात जास्त गाणी ही बाबांच्या वाटय़ाला आली. तसंच श्रीनिवास खळे यांची सगळय़ात जास्त ‘मेल साँग’ही बाबांनीच गायली आहेत. बाबा नेहमी असं म्हणत की, एखाद्या गाण्याची कविता जर उत्तम असेल तरच ते गाणं चिरंतन काळ टिकतं. त्यांच्या गाण्यांच्या लोकप्रियतेचं सर्व श्रेय त्यांच्या कवींना आणि संगीतकारांना देत. ते नेहमी असं म्हणतं की, माझ्या गाण्यातल्या लोकप्रियतेमधला सर्वात मोठा वाटा कवींचा आणि संगीतकारांचा आहे. माझं श्रेय एवढंच की, मी सगळी गाणी ही रसिकांपर्यंत न बिघडवता पोहोचवतो. बाबांच्या गाण्यांची यादी बघितली तर कितीतरी गाण्यांना 40, 45, 50 आणि 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही त्याची गोडी अजून कायम आहे.शुक्रतारा हे 1962 साली रेडिओसाठी ध्वनिमुद्रीत झालेलं गाणं. पुढे ते एचएमव्ही कंपनीने रेकॉर्ड केलं. त्यानंतर 1963 मध्ये आलेली दोन गाणी म्हणजे ‘सखी शेजारीणी’ आणि ‘सूर जुळले शब्दही जुळले’ आणि त्यानंतर ध्वनिमुद्रित झालेली गाणी म्हणजे ‘अखेरचे येतील माझ्या’ आणि ‘भेट तुझी माझी स्मरते’ ही साधारण 1965 च्या सुमारास रेकॉर्ड झाली.

बहुतांश कवी हे चालींवर कधी लिहित नव्हते. त्यातलं एक मोठं नाव म्हणजे मंगेश पाडगावकर. कारण कुसुमाग्रज, शंकर वैद्य, विं. दा. करंदीकर, वसंत बापट किंवा पाडगावकर यांच्या गाण्यात कुठल्या संगीतकाराची अमुक शब्द बदला सांगण्याची हिंमत झाली नसावी आणि हे खरंय कारण यांच्या लेखणीतून सरस्वतीच डोकावत असे हे सगळे कवी होते.मी मंगेश पाडगावकरांना एकदा विचारलं की, तुम्ही कधी एका चालीवर गाणं किंवा कविता लिहिलीय का? यावर ते म्हणाले की, मी कुठल्याही निर्मात्यासमोर, कुठल्याही म्युझिक कंपनीसमोर किंवा कुठल्याही संगीतकारासमोर शब्दांचं लोटांगण घालायला कधीच तयार नव्हतो. त्यामुळे पाडगावकरांनी साधारण 160 च्या काळात 6 ते 7 वर्षे फक्त गाणी लिहिली. त्यांनी कवितेचा दुसरा कुठलाही फॉर्म त्या काळात हाताळला नाही. मी त्यांच्या गाण्यांचं पुस्तकं एकदा वाचत असताना त्यांना विचारलं की, तुम्ही जेवढय़ा प्रमाणात गाणी लिहिलीत त्या प्रमाणात तुम्ही कविता किंवा मुक्तछंद कविता फार कमी हाताळल्यात. त्यावर ते जोराने हसले आणि मला म्हणाले की, अरे गाणं प्रसिद्ध झालं तर त्याचे पुढे जाऊन खूप पैसे मिळतात. कविता प्रसिद्ध झाली तर ती फक्त कार्यक्रमांतून किंवा मैफिलीतून वाचली जाते. आणि पुढे ते म्हणाले, ‘सॉँग रायटिंग इज अ व्हेरी डिफिकल्ट फॉर्म आर्ट’. एखादी चांगली कविता त्यामानाने सोपं आहे, पण एखादं उत्तम गाणं तुमच्या लेखणीतून उतरणं फार कठीण असतं. हा आमचा संवाद तिथे थांबला आणि पटकन मला पाडगावकरांची ‘सलाम’ ही कविता आठवली. जसं पाडगावकर म्हणतात की, गाण्यांनी त्यांना पैसा दिला, प्रसिद्धी दिली पण ‘सलाम’ने त्यांना प्रतिष्ठा आणि अनेक पुरस्कार दिले. मी माझ्या घरातल्या सांगीतिक, सांस्कृतिक वातावरणामुळे आणि अरुण दातेंचा मुलगा असल्यामुळे अनेक मातब्बर कवींना आयुष्यामध्ये भेटलो. त्यातल्या अनेक कवींच्या कविता त्यांच्या समोर बसून ऐकल्या. जसं मी आधी या लेखामध्ये म्हटलं की, जवळजवळ 55 पूर्ण होतायत, अशी ही भावगीतं आहेत. पण ही भावगीतं ऐकणारा रसिक आजसुद्धा वय वर्षे 20 ते वय वर्षे 85 असा आढळतो. म्हणून अशा रसिकांसाठी काहीतरी उत्तम आणि उदात्त असं करावं, असं माझ्यासारख्या निर्मात्याला नेहमी वाटतं. माझ्या कुठल्याही कार्यक्रमाचं कुठलंही गाणं जर कविता चांगली नसेल, तर आम्ही त्याचं सादरीकरण करतच नाही. मला असं वाटतं की, मुख्यतः पाडगावकरांनी आणि बाबांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी आहे मी ती फक्त पूर्ण करतो.

– [email protected]