प्रौढ गतिमंद – उपचार आणि संगोपन

246

>> अवधूत सहस्रबुद्धे

गतिमंद व्यक्तीचा प्रौढावस्थेत बदल होताना त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक बदल घडतात. या पायरीवर त्यांचे संगोपन आव्हानात्मक ठरते. या बदलांना स्वीकारत त्यांच्या प्रगतीत सातत्य राखणे हे पालकांसाठी निश्चितच सहजसोपे नसते.

बाल्यावस्था आणि पौगंडावस्था (18 वर्षांखालील) दरम्यान गतिमंद मुले ही प्रामुख्याने आपल्या पालकांबरोबर राहतात आणि विशेष शाळा, कार्यशाळा यांच्यामध्ये जातात. मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे या विशेष शाळांमध्ये त्यांच्या स्नायूंची आवश्यक हालचाल, एकाग्रता आणि हात, नजर यांचा समन्वय इत्यादी प्राथमिक गोष्टींवर विशेष भर दिला जातो. त्यांच्या संवेदना आणि ज्ञानेंद्रिये सक्रिय राहावीत तसेच त्यांच्या शारीरिक हालचालींचे संतुलन व्हावे हा मुख्य उद्देश असतो.

ज्यावेळी गतिमंद व्यक्ती प्रौढावस्थेत प्रवेश करतात तेव्हा त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक बदल घडून येऊ लागतो आणि अशावेळी त्यांचे संगोपन आणि पुढील आयुष्याची वाटचाल वेगळ्या प्रकारे हाताळावी लागते. 18 वर्षांनंतर प्रौढ गतिमंद मुलांसाठी दिवसभर चालविल्या जाणाऱया शाळा फारशा अस्तित्वात नाहीत. काही ठिकाणी प्रौढ गतिमंदांसाठी कार्यशाळा आहेत, परंतु त्या त्यांना फक्त काही तास व्यस्त ठेवू शकतात आणि मग दिवसाचा बहुतांश वेळ ही मुले घरात असतात. प्रौढ गतिमंद मुलांचा घरी होणारा सांभाळ यात पालकांना अनेक अडचणी येतात त्यांची संक्षिप्त यादी खालीलप्रमाणे…

– प्रौढ गतिमंद हे शरीराने सतत वाढत असल्यामुळे त्यांचे संयमन करणे पालकांना दिवसेंदिवस कठीण होते आणि बऱयाचदा ते आपल्या आईवडिलांना शारीरिकदृष्टय़ा अवजड होतात.

– प्रौढावस्थेमध्ये येणाऱया लैंगिक भावना आणि संप्रेरक बदल यामुळे या व्यक्ती विचित्र वागू लागतात आणि त्याचे परिणाम म्हणूनच ती जास्त आक्रमक आणि विक्षिप्त बनतात.

– समाजात असणाऱया अनास्थेमुळे आणि स्वीकार नसल्यामुळे ज्या वयात त्यांना संगतीची गरज असते तेव्हा ते अधिकाधिक एकटे पडतात आणि दुर्लक्षित राहतात.

– कित्येकदा यांची भावंडेसुद्धा सामाजिक दबावाखाली येऊन त्यांच्याबरोबर मोकळेपणाने वावरू शकत नाहीत.

– कुठल्याही कौटुंबिक, सार्वजनिक कार्यक्रमाला त्यांना घेऊन जाणे हा पालकांच्या दृष्टीने एक अवघड प्रसंग होतो आणि त्यामुळेच ते सतत घरात डांबले जातात आणि पालकांचे सामाजिक आयुष्यसुद्धा खालावते.

– सतत एकटेपणा आणि निर्बंध यामुळे मग ही मुले चिडचिडी बनतात आणि विध्वंसकपणाला सुरुवात होते.

– एकाधिक व्यंग असेल तरसंगोपन अजूनच बिकट होते.

वरील सर्व आव्हानांना तोंड देताना वारंवार असे वाटू लागते की, आपण हे संगोपन कशाप्रकारे आणि किती दिवस करू शकू? आपल्या विशेष पाल्याची काळजी घेण्यासाठी अथक प्रयत्न करताना त्यांना त्यांच्या सग्यासोयऱयांकडून अथवा समाजाकडून फारसे पाठबळ मिळत नाही आणि त्यांची एकाकी धडपड फारच यातनामय असते. बाहेरून कुठलाही पाठिंबा किंवा मदत उपलब्ध नसल्याने बरेच पालक खचून जातात.

जेव्हा गतिमंद मूल 18 वर्षांचे होते तेव्हा त्याचे पालक साधारण 45-50 वर्षे (कमीतकमी) वयाचे होतात. जोपर्यंत पालक शरीराने आणि आर्थिकपणे सक्षम आहेत तोपर्यंत ते ही जबाबदारी पेलू शकतात. पण वाढते वय, घटणारे उत्पन्न आणि वाढणाऱया गरजा यांचा ताळमेळ घालणे कठीण असते.

आयुष्याचा मध्य ओलांडताना त्यांना मग एका वेगळ्याच वास्तवाची जाणीव होते – माझ्यानंतर काय?

घरी सांभाळ करण्यात येणाऱया अनेक अडचणी आणि आव्हाने यांना एक उपाय असा समोर येतो की, प्रौढ गतिमंदांसाठी एखादे निवासी संकुल असेल तर त्यात त्यांची समर्पित आणि योजनाबद्ध काळजी घेतली जाऊ शकते. अशा संकुलात त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी विविध क्रिया, खेळ, उपक्रम उपलब्ध केले जाऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा त्यांच्याचसारख्या इतर व्यक्तींबरोबर एक सहजीवी संबंध प्रस्थापित करता येऊ शकतो. त्यांच्या वैद्यकीय गरजा, मानसिक चढउतार, मोकळेपणा आणि खुलेपणाने वावर यासारख्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेता येते.

म्हणूनच प्रौढ गतिमंद व्यक्तींसाठी निवासी संकुल हा उपाय सगळ्यात प्रभावी आणि यशस्वी ठरलेला दिसतो. खरे तर अशा विशेष मुलांची या ठिकाणी घरच्यापेक्षा चांगली काळजी घेतली जाऊ शकते आणि योग्य संगोपन होऊ शकते.

पुढील लेखात आपण महाराष्ट्रात असणाऱया काही यशस्वी सामाजिक निवासी संकुल योजनांची माहिती घेऊ.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या