>>चंद्रकांत नाटेकर
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रवळनाथ मंदिरात कौल लावला जातो आणि देवाचा हुकूम मिळाल्यावर गावपळणीची तारीख मुक्रर केली जाते. गावपळणीची तारीख ठरली की, गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. पिढ्यांनपिढय़ा चालत आलेली ही प्रथा आजही सुखेनैव चालू आहे.
मालवण तालुक्यातील चिंदर हा बारा वाड्यांचा साधारण साडेचार-पाच हजार वस्तीचा गाव. पूर्वेला भगवंतगडच्या खाडीने कवेत घेतलेला, तर पश्चिमेला कुपेरीच्या डोंगराच्या कुशीत विसावलेला निसर्गसुंदर गाव. या गावातील एका प्रथेने साऱया महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. दर तीन वर्षांनी होणारी ‘गावपळण’ हे या गावाचे वैशिष्टय़. गावपळण म्हणजे संपूर्ण गावाने तीन दिवस, तीन रात्री गावाच्या सीमेबाहेर जाऊन राहणे. तेही आपल्या कुटुंबकबिल्यासह. गुरेढोरे, कोंबडी, कुत्री, मांजरी हे पण त्यात आलेच.
तेरई, भगवंतगड, लब्देवाडी, गावडेवाडी ही मंडळी नदीपल्याड मसुरे-बांदिवडे मुक्कामी जाऊन राहतात, तर सडेवाडीतील कुटुंबे वायंगणीच्या आसऱ्याला जातात. गावठणवाडी, चिंदर बाजारची कुटुंबे त्रिंबकच्या हद्दीत वास्तव्य करतात, तर नागोचीवाडी, अपराजवाडी, कोंडवाडी पोयरे-आचऱ्यात आणि कुंभारवाडी, देऊळवाडी, भटवाडी साळकुंभ्याबाहेर आचऱयाच्या सीमेत आपली खोपटी उभी करतात.
पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही प्रथा आजही सुखेनैव चालू आहे. तीन दिवस सीमेबाहेर आपापली खोपटी काढून राहण्याची मजा काही औरच. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रवळनाथ मंदिरात कौल लावला जातो आणि देवाचा हुकूम मिळाल्यावर गावपळणीची तारीख मुक्रर केली जाते. गावपळणीची तारीख ठरली की, गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि मग गावकरी काठी-झाप, कडणे जमा करण्याच्या कामाला लागतात. माळरानावर नेहमीच थंडीचे साम्राज्य असते. दिवसाउजेडी सारे एकत्र जमत असले तरी रात्र मात्र आपल्या खोपटात कुडकुडतच काढावी लागते.
गेल्याच आठवड्यात ही गावपळण पार पडली. यंदा ही गावपळण जवळजवळ 9 वर्षांनी आली. साहजिकच अनेकांना त्याचे अप्रूप होतेच. शनिवारी 1 डिसेंबरच्या दुपारी बारापाच वतनदार आणि ग्रामस्थ प्रथेप्रमाणे रवळनाथच्या देवळात जमले. देवाने उजवा कौल दिल्यावर साऱयांचे चेहरे उजळले. ढोलांचा आवाज साऱ्या आसमंतात घुमला आणि एकच आरोळी फुटली- गाव फुटला. साऱ्यांची लगबग सुरू झाली. मुलेबाळे, जनावरे, म्हातारीकोतारी माणसे घराबाहेर पडली. तीन रात्री आता घराबाहेर काढायच्या होत्या. चारी दिशांनी माणसांचा लोंढा सीमेबाहेर चालला होता.
यंदाची गावपळण थोडी आधुनिक वाटली. पूर्वीपेक्षा आता खूपच बदल झाला. 1985 सालापर्यंत आमच्या गावात वीजच आली नव्हती. त्यामुळे दिवस मावळतीकडे झुकला की खोपट्यात अंधार व्हायचा. मग टेंबे (बाटलीत वात घालून केलेले दिवे), कंदील किंवा एखाद्याच्या घरात पेट्रोमॅक्सची बत्ती लागायची. हीच त्या वेळी उजेडाची साधने होती.
आमच्या काळात कडणांनी (माडाच्या झावळापासून बनवलेले झाप) खोपटी शाकारली जाते. पाणी आणण्यासाठी पोषापाण्यावर जावे लागे. खोपटय़ापासून पायी अर्ध्या तासावर हे स्थळ असून हे ब्राह्मणाचे देवस्थान असल्याने पावित्र्य जपले जाते. सकाळी उठल्यावर महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागे. डोक्यावर हंडा-कळशी घेऊन अनेक खेपा माराव्या लागत. कारण गुरेही बांधलेली असल्याने त्यांना जागेवरच पाणी द्यावे लागे. यंदा खोपटी ताडपत्रीने बंदिस्त केली होती. पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबली. गावकर कुटुंबाने सीमेबाहेर बांधलेल्या घराजवळच्या विहिरीचे पाणी दिल्याने गावकऱ्यांची चांगलीच सोय झाली. माळरानावरून वीज गेली असल्याने खांबावरून वीज घेण्यात आली होती. त्यामुळे सारी खोपटी लखलखून गेली होती. रात्री जेवणे आटोपली की, भजनांना सुरुवात होई. शेकडो गावकरी भजनात येऊन बसू लागले. अंगात स्वेटर घालून आलेले बालगोपाळ भजनात मध्यभागी असत. काही खोपट्यांतून फुगड्या-ओव्यांचे सूर ऐकू यायचे. सारा परिसर मंत्रमुग्ध झाला होता.
दुसऱ्या दिवशी रविवार. त्यामुळे मांसाहार ठरलेलाच. पूर्वी आम्ही रानात शिकारीसाठी जायचो. जंगलात जाळे लावून रान हाकायचो. ससे, रानकोंबडय़ा हमखास आणायचो. आता कोणी जंगलात जात नाही. त्यामुळे दुपारच्या जेवणात सगळ्यांकडेच मासे, कोणाकडे बांगडे, तर कोणाकडे सौंदाळे. काहींच्या खोपट्यांत सुकटाचा वास तर काहींच्या कुळथाच्या पिठीचा खमंग वास भुकेची जाणीव करून देई. संध्याकाळी साऱ्यांनी एकत्र जेवण करण्याचा बेत आखला होता. प्रत्येकाने स्वखुशीनेच आपली कोंबडी दिली. आठ-दहा कोंबड्यांचे बळी गेले. (चारजणांच्या मुखात आपली कोंबडी गेली केवढे हे भाग्य!) मग लांबलचक जेवणावळी बसल्या. वाढपी होत्या अर्थात महिला. त्या दिवशी शे-दीडशे लोकांनी चांगलाच आडवा हात मारला. गावठी कोंबडीच्या सागोतीने सारे तृप्त झाले. यात चाकरमान्यांची संख्याच अधिक होती. जेवणे आटोपल्यावर पुन्हा भजनांचा मांड बसला. मात्र जेवणासाठी जमा झालेला गोतावळा भजनात नव्हता. हेळय़ाचा चौक, साळकुंभ्याचा परिसर सुरेल संगीताने भारावून गेला होता. रात्री आपापल्या खोपटय़ात सारी मंडळी विसावली तेव्हा पहाटेचे 2 वाजून गेले होते.
आज तिसरा दिवस सोमवार. आजची ही शेवटची रात्र. दुपारची जेवणे आटोपल्यावर संध्याकाळी काहींनी मिसळ, तर काही खोपट्यांत खमंग भज्याचा बेत शिजला होता. संध्याकाळी दिवेलागण झाली आणि बाबली, अवी, धनंजय, दिगंबर, प्रदीप आणि पिंट्यांने दशावतार सादर केला. चारी बाजूंच्या खोपट्यांतून दशावतार पाहण्यासाठी महिला, मुलेबाळे जमा झाली होती. संगीतकार होता संदीप आणि त्याला साथ करीत होता गणेश. नाटकातील संवाद अर्थात स्वरचितच. त्यामुळे सारा माळरान ‘हास्यदरबार’ झाला होता. रात्रीचे बारा वाजून गेले तरी जेवणाची कोणालाच आठवण नव्हती. सारेच जण तल्लीन होऊन काल्पनिक दशावताराची मजा लुटत होते. लढाई सुरू होती, पण मरायचे कोणी हे ठरत नसल्याने खेळ संपत नव्हता. अखेर कोणी तरी ओरडला, ‘अरे, राजाक मारा रे लवकर!’ तसा दिगंबराने जबरदस्ती तलवारीने (काठीने) राजाला मारले आणि सारेजण खोपट्याकडे आले. पुन्हा पंगत बसली. आज जेवण नव्हते. कांदा-बटाटा भजी आणि काहीच्या खोपट्यात मिसळपाव. गप्पा मारत मारत आणि यथेच्छ ताव मारत साऱ्यांनी शेवटच्या रात्रीचा आस्वाद घेतला. आज खूपच थंडी होती. सारे गारठून गेले होते. डोक्यावर दव पडला होता. कोणालाच झोप येत नव्हती. अंथरुणावर सारेच तळमळत होते. इतक्यात बबन्याच्या कोंबडय़ाने अवेळीच बांग दिली आणि काही वेळानंतर दिशा फाकू लागल्या. महिलावर्ग जागा झाला. काहींनी शेकोट्या पेटवल्या. गळय़ाभोवती मफलर गुंडाळलेला सुनील सगळय़ांना हाका मारू लागला- ‘उठा रे पोरांनू.’ तसे काहीजण आपापल्या खोपटय़ातून डोळे चोळीतच शेकोटीकडे आले. काहींच्या डोळय़ांवरून अजून निद्रादेवी गेली नव्हती, पण साऱयांच्या गोंगाटामुळे डोळे किलकिले करून बाहेर आले होते. कुपेरीच्या डोंगरातून हळूहळू सूर्यनारायण डोके वर काढत होता.
दुपारी गाव भरणार. मग सारेच जण आपापल्या कामाला लागणार. तीन दिवस, तीन रात्री एकत्र काढल्याचा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यांवरून ओसंडून वाहत होता, पण आज प्रत्येकाच्या मनात अनामिक हुरहूर लागून राहिली होती. दुपारची जेवणे लवकर उरकली. सामानाची बांधाबांध सुरू होती. 2 वाजून गेले होते. साऱ्यांचे लक्ष रवळनाथच्या कौलाकडे लागले होते. इतक्यात ढोलाचा आवाज कुणाच्या तरी कानी पडला आणि ओरडला, ‘गाव भरलो रे.’
प्रत्येकाला आपापल्या घरी जायची उत्सुकता असली तरी गेले तीन दिवस धमाल, मस्ती आणि स्वच्छंदपणे माळरानावर बागडण्याच्या मनमुराद आनंदाला आपण मुकणार याची रुखरुख प्रत्येकाला लागून राहिली. आता पुन्हा तीन वर्षांनंतर आपण गावपळणीतल्या या आनंदाचा पाहुणचार घेणार. भविष्यातल्या गावपळणीकडे आता आमचे लक्ष लागून राहिले आहे. मग येणार ना आमच्या गावपळणीला?




























































