शोध सत्याचा – बोध श्रेष्ठ संस्कृतीचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रसेन टिळेकर

ऐन दुपारची वेळ. ऊन अगदी रखरखत होतं! रविवार असल्याने मी घरातच होतो. दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडले. दारात सत्तर-पंच्याहत्तरीतील वृद्ध गृहस्थ उभे होते. मी त्यांना लगबगीने आता घेऊन बसायला सांगितले आणि पाणी आणून दिले. ते त्यांनी अक्षरशः घटाघटा पिऊन टाकले. थोडय़ा वेळाने स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी मला विचारले की,
‘लेखक टिळेकर आपणच का?’
‘हो, मीच! काय काम काढलंत?’
‘तुमची एक एकांकिका लोकप्रभा साप्ताहिकात छापून आली होती, काही आठवतंय का?’
‘हो, एकांकिका स्पर्धा होती, त्यात ‘बिदागी’ नावाची छापून आली होती. तिचं काय?’
‘ती लंडनमध्ये मराठी मंडळात हौशी तरुणांनी बसवायला घेतली आहे. त्या एकांकिकेबरोबर दुसरेही विविध कार्यक्रम म्हणजे नृत्य, गाणी इत्यादी हे कार्यक्रम हॉलमध्ये होणार असल्याने लाऊडस्पीकर लावावा लागणार होता, त्यासाठी अर्थातच जवळच्या पोलीस स्टेशनच्या परवानगीची गरज असल्याने कार्यकर्ते संमती मागण्यासाठी तिथे गेले. पण तिथे भलतीच अडचण निर्माण झाली?’
‘कोणती हो!’ मी न समजून विचारले.
‘अहो, तिथल्या पोलीस इन्स्पेक्टरने एकवार कार्यक्रम पत्रिकेवरून नजर फिरवली आणि ते म्हणाले, बाकीच्या कार्यक्रमाचे ठीक आहे, पण तुम्ही One act play सादर करणार आहात, मग तो लिहिणाऱयाची परवानगी कुठंय? ती तेवढी मला दाखवा, मग मी संमती देऊन टाकतो.’
‘मग हो?’
‘मग काय, कार्यकर्त्याच्या तोंडचे पाणीच पळाले; कारण एकांकिका जवळ जवळ बसत आली आहे, दुसरी एकांकिका बसवणे केवळ अशक्य आहे.’
सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. कुठलीही संवाद असलेली कलाकृती, मग ती एकांकिका असो वा तीन अंकी नाटक जर रंगमंचावर सादर करायची असेल तर लेखकाची परवानगी आवश्यक असते. त्याशिवाय ती कलाकृती जाहीरपणे सादर करता येत नाही. परंतु जेव्हा ही एकांकिका लोकप्रभेत प्रसिद्ध झाली होती तेव्हा अनवधानाने लेखकाचा म्हणजे माझा पत्ता, पह्न वगैरे त्या एकांकिकेच्या खाली छापला गेला नव्हता. त्यामुळे ती एकांकिका माझी संमती न घेताच अनेक ठिकाणी झाल्याचे मला समजलेही होते, पण त्या बाबतीत मी फारसे काही करू शकत नव्हतो. पण मग मला प्रश्न पडला की, जसे इतर ठिकाणी मला न विचारता म्हणजे माझी परवानगी न घेता एकांकिका केली गेली, तशी तिथे परदेशात त्यांनी का केली नाही? तशी ती त्यांना करणे तर अगदीच सोपे होते, कारण मला प्रयोग झाल्याचे कळणे शक्यच नव्हते. म्हणून मग मी त्यांना म्हणालो,
‘दादा एवढय़ा उन्हातान्हात यायचे कष्ट कशाला घेतलेत? करून टाकायची एकांकिका बिनधास्तपणे. माझ्या संमती शिवाय.’
तसं ते मंदसे हसले आणि म्हणाले,
‘लेखक साहेब, ते एवढे सोपे असते तर मग काय बघायला पाहिजे?
आता मात्र मी चकित झालो आणि थोडय़ा आश्चर्यानेच त्यांना विचारले,
‘का? कुठं घोडं अडलं?
‘अहो तुम्हला त्या इन्स्पेक्टरचा अडेलतट्टूपणा सांगितलं ना तुम्हाला, त्याने अडवलं घोडं! कार्यकर्त्यांनी त्याची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला की, या स्क्रिप्टचा लेखक इंडियात राहातो. त्या स्क्रिप्टच्या खाली त्या लेखकाचा पत्ता दिलेला नाही. मग आम्ही परवानगी कुठून आणणार? त्या इन्स्पेक्टरने शांतपणे सुनावलं, ‘It is none of my business.’ शेवटी, माझा पुतण्या त्या एकांकिकेत काम करतोय त्याने मला फोन करून लेखकाची म्हणजे तुमची संमती आणायला सांगितली.’
‘अहो, पण मग माझा पत्ता तुम्हाला दिला कोणी?’
‘ते जरा कठीणच गेलं. नशिबानं एका वर्तमान कचेरीत तुम्ही अत्रे कट्टय़ाचे संयोजक म्हणून माहीत होते. त्यांनी पत्ता दिला खरा, पण तोही पूर्ण नव्हता. शेवटी शोधत शोधत आलो.’
एवढं सगळं ऐकल्यावर त्या गोऱया पोलिसाच्या खाष्टपणाचा नाही म्हटलं तरी मला जरा रागच आला. मी त्या पाहुण्यांना म्हणालो,
‘हे म्हणजे फारच झालं नाही? जरा तरी माणुसकी दाखवली पाहिजे की नाही त्या पोलिसाने? मला काही हे पटलं नाही, तुम्हाला तरी पटतंय का सांगा.’
तसे ते मला म्हणाले,
‘का पटू नये? शेवटी ते इन्स्पेक्टर कार्यकर्त्यांना काय म्हणाले ते तुम्हाला सांगतो, मग तुम्हाला पटेल. किंबहुना लेखक असल्याचा अभिमानही वाटेल, तर मग आता गोरा साहेब काय म्हणाला ते सांगतो, जरी तो काहीशा बेफिकीरपणे ‘It is none of my business’ असे म्हणाला असला तरी निक्षूनपणे त्याने बजावलं की, ‘AUTHOR MUST BE HONOURED.’ आता बोला.’
मी काय बोलणार? अंगावरून मोरपीस फिरल्यासारखे झाले. त्यांनी मला मानधन म्हणून अकरा डॉलरचा चेक दिला. मी त्यांना संमतीपत्र दिलं. सरबत घेऊन ते निघून गेले. ते निघून गेले खरे, पण त्यांनी मला त्या गोऱया साहेबाचे वाक्य ऐकवलं ते सतत माझ्या कानात गुंजत राहिलं, ते म्हणजे ‘लेखकाचा मान हा राखला गेलाच पाहिजे.’ आणि आग्रह कोण धरतोय तर एक पोलीस अधिकारी आणि तेही परक्या देशातला का होईना, एक पोलीस अधिकाऱयात दिसून आलेला नैतिक संस्कार त्या देशातल्या संस्कृतीचा आपल्याला विचार करायला लावील यात काय शंका आहे? या जगात 300 च्या आसपास देश आहेत, जो तो आपल्या देशाची संस्कृती इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, अशी श्रद्धा किंवा अंधश्रद्धा बाळगून असतो. अगदी रानटी देशही आपले संस्कार अन् संस्कृती श्रेष्ठ समजतो, परंतु श्रेष्ठतेचे मापदंड जर आपण लावले (उदा. प्रामाणिकपणा, शिस्त, समता, बंधुत्व, बुद्धीप्रामाण्यता इ. इ.) तर फारच थोडय़ा देशांच्या संस्कृती त्या कसोटीवर उतरतील. म्हणूनच नेमून दिलेल्या नियमांचे पालन कठोरपणे करणारा तो लंडन शहरातील पोलीस अधिकारी मला उच्च संस्कृतीतला वाटला. लेखकासारख्या विद्येच्या उपासकाचा सन्मान झालाच पाहिजे, असा आग्रह धरणारा तो पोलीस अधिकारी श्रेष्ठ, त्याचा तो ब्रिटन देशही ग्रेट आणि त्या देशाची संस्कृतीही महान यात वादच नाही. उगाच नाही ब्रिटिश लोक गर्वाने म्हणत, ‘एक वेळ आम्ही आमचे साम्राज्य देऊ, पण शेक्सपिअर देणार नाही!’

[email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडीत आहेत)