सत्याचा शोध- अत्रे कट्टा

>> चंद्रसेन टिळेकर

जो जे वांछील, तो ते बोलो!

लंडन शहरातील हाईड पार्कमध्ये असलेल्या स्पीकर्स कॉर्नरप्रमाणे सर्वसामान्य व्यासंगी श्रोत्यांसाठी एक मुक्त व्यासपीठ निर्माण करावे असे मनात होते. असा हा बिनखर्चाचावाक्यज्ञम्हणजेच मुक्त व्यासपीठ अत्रे कट्टा या नावाने प्रसिद्ध झाले. या अत्रे कट्टय़ाने मुंबईत कट्टा संस्कृती रुजवली यात काही शंका नाही.

या सदरात गेल्या वेळी ‘शास्त्रज्ञांचीही घागर रिकामी’ या लेखात गणरायाचे दुग्धप्राशन यासंदर्भात ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी कशी संदिग्ध भूमिका घेतली होती आणि तेव्हा आम्ही पती-पत्नीने त्यांना त्याबाबत जाब विचारायला सुरुवात करताच काही श्रोत्यांनी आमची बाजू कशी उचलून धरली होती ते विशद केले होते. या सर्वसामान्य व्यासंगी श्रोत्यांसाठी आपण एक मुक्त व्यासपीठ निर्माण करावे असा निश्चय केल्याचेही नमूद केले होते.

कल्पना अशी होती की, आठवडय़ाच्या आठवडय़ाला त्या त्या परिसरातील जाणकार मंडळी एखाद्या मोकळ्या जागेत जमतील आणि समाजात नुकत्याच घडलेल्या बऱयावाईट घटनांची वाच्यता करतील, परामर्ष घेतील, पण माझ्या पत्नीने शंका उपस्थित केली की, “अहो, हे दर आठवडय़ाला कसं शक्य आहे? सभा म्हटली की स्टेज आलं, लाऊडस्पीकर आला, खुर्च्या आल्या…खर्चाचं काय?” तिचं बरोबर होतं. कारण ती स्थानीय लोकाधिकार समितीची उपाध्यक्षा म्हणून कार्यरत होती. या उपामासाठी लंडन शहरातील हाईड पार्कमध्ये असलेला स्पीकर्स कॉर्नर माझ्या डोक्यात घोंगावत होता. त्या स्पीकर्स कॉर्नरमध्ये (वक्त्यांचा कट्टा) कोणीही ब्रिटिश नागरिक जाऊन त्याच्या मनात खदखदत असलेल्या कोणत्याही विषयावर बिनधास्तपणे बोलू शकतो. गंमत म्हणजे श्रोत्यांची वाट न पाहता जो आपले भाषण सुरू करतो आणि मग श्रोते जिथे जागा मिळेल तिथे फतकल मारून ऐकायला बसतात. तिथे ना खुर्च्या, ना स्टेज, ना लाऊडस्पाकर. हा बिनखर्चाचा ‘वाक्यज्ञ’ तिथे गेली चारशे वर्षे चालू आहे. तिथे केवळ सर्वसामान्य माणसेच बोलतात असे नाही, तर कार्ल मार्क्ससारख्या नामवंतानेही हजेरी लावल्याचे सांगितले जाते. इतकेच काय, इथे मुक्तपणे बोलण्याची मुभा असल्याने सातारच्या संस्थानाचे वकील रंगो बापूजी इ.स. 1840 मध्ये लंडनला गेले असता ब्रिटिशांनी केलेल्या दत्तक कायद्याच्या विरोधात ते बोलले होते. माजी संरक्षण मंत्री व्ही.के. मेनन, डॉ. राधाकृष्णन यांनीही हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याबद्दल तिथे कैफियत मांडली होती. त्या कट्टय़ावर नागरिकांनी बिनधास्त बोलावे आणि लोकशाहीला आवश्यक असलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्भयपणे जपावे म्हणून तेथे केलेल्या भाष्याबद्दल, विधानांबद्दल कसलीही कारवाई होणार नाही असा मुळी ब्रिटिश पार्लमेंटने ठरावच केला. त्याप्रसंगी  ‘ँRघ्ऊघ्एप् झ्ARथ्घ्Aश्ऱिंऊ घ्ए ऊप्ं श्ध्ऊप्Rिं ध्इ अश्ध्ण्RAण्भ्’ अशी उद्घोषणाही केली गेली.

आपल्या देशातली लोकशाही तर जगातली सगळ्यात मोठी लोकशाही मानली जाते. त्या पार्श्वभूमीवर अशा मुक्त व्यासपीठाचे महत्त्व कोणालाही पटावे. आम्ही अंधेरीत राहत असलो तरी विलेपार्ले इथे सांस्कृतिक कार्पाम सदैव जोमाने होत असल्याने तेथील स्वा. सावरकर उद्यानात असे मुक्त व्यासपीठ उभारण्याचे नक्की केले. काही वर्तमानपत्रांत तसे निवेदन प्रसिद्धीस दिले, पण तेथे फारसे कोणी मनावर घेतले नाही. काहींच्या मते सभेला अध्यक्ष नाही, विषय नाही, प्रमुख वक्ता नाही, मग याला काहीच अर्थ नाही. माझे धाबे दणाणले होतेच. कारण मी कुठल्याही संस्थेत नव्हतो. माझ्याकडे कार्यकर्त्यांची फौजही नव्हती. तेव्हा प्रचार करावा तरी कसा आणि प्रचार झाला नाही तर लोकांना आपल्यासाठी असे काही मुक्त व्यासपीठ सुरू होत आहे हे कळावे तरी कसे? मग एक मोठे धारिष्टय़ केले. एका मध्यरात्री आम्ही उभयतांनी आमची गाडी काढली आणि पार्ल्यात खांबाखांबांवर जे विविध राजकीय पक्षांचे शुभेच्छा इत्यादी लिहिलेले बोर्डस् दिसत होते ते सगळे पुसून तिथे मजकूर लिहिला… ‘कोणी कोणत्याही विषयावर बोला. दर शनिवारी सायं.5-30 वा. स्थळ : स्वा.सावरकर उद्यान.’

या कट्टय़ाला नाव द्यायचे आम्ही आधीच ठरवले होते आणि ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी आपल्या तुफान वत्तृत्वाने महाराष्ट्राला मुंबई मिळवून दिली त्यांचे म्हणजे आचार्य अत्रे यांचे नाव! पहिल्या आ. अत्रे कट्टय़ाची तारीख फळ्यांवर जाहीर केली होती…9 मार्च 1996. नेमकी त्या दिवशी हिंदुस्थान-पाकिस्तान ािढकेट मॅच होती. त्यामुळे आम्ही पती-पत्नी भीतभीतच सावरकर उद्यानात गेलो. आमची कल्पना होती की, श्रोत्यांअभावी आम्हाला हात हलवत परतावे लागेल. परंतु आम्ही पाहिले तर अर्धे उद्यान माणसांनी फुलून गेले होते. कदाचित ही गर्दी दुसरी कुठली तरी असेल असे वाटले, पण तेवढय़ात मला प्रसिद्ध विनोदी लेखक राजा राजवाडे दिसले. त्यांनी मला पाहताच लोकांना बसून घ्यायला सांगितले आणि मला म्हणाले, “टिळेकर सुरू करा तुमचा कट्टा!” मी तिथल्या एका मोठय़ा वृक्षाच्या पारावर चढून लंडनमधील हाईड पार्कची माहिती व महती सांगितली. नंतर म्हटले, आता तुम्ही एकेक करून पुढे या आणि तुम्हाला आवडेल त्या विषयावर बोला. पण कुणीच पुढे येईना. शेवटी मी राजा राजवाडे यांना म्हटले, “तुम्हीच पाच मिनिटं बोला!” त्यांनी विनोदी लेखक विनोद कसे टिपतो हे खुसखुशीत शब्दांत सांगितले. मग नीलिमाने सुधीरभाऊ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीय लोकाधिकार समिती मराठी माणसासाठी नेमके कोणते कार्य करते ते खुलासेवार सांगितले.

तेवढय़ात प्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर आल्या. त्यांना बोलण्यासाठी विनंती करताच त्या म्हणाल्या, “मी नुकतीच लंडनला गेले असता तेथील स्पीकर्स कॉर्नर पाहून आले आहे, परंतु माझ्या देशात आणि तोही पार्ल्यासारख्या सांस्कृतिक नगरीत असा उपाम सुरू होईल याची कल्पना नव्हती. मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुमच्याशी नक्की बोलायला येत जाईन.” संध्याकाळचे सात वाजत आले होते तरी समोरच्या श्रोत्यांपैकी कोणी बोलायला पुढे येत नव्हते. शेवटी कट्टा आटोपता घ्यावा लागला. कारण सात वाजता उद्यान बंद केले जाते. कट्टा संपल्यावर मंडळी माझ्याकडे पारीच्या स्वरात म्हणू लागली, “अहो टिळेकर, तुम्ही काहीतरी विषय द्या ना. मग आम्ही बोलू.” मी त्यांना समजावले की, “अशा मुक्त व्यासपीठावर विषय द्यायचाच नसतो. तुमच्या मनात जो काही विषय असेल त्यावर बोलायचे असते. विषय नसेल तर तुम्हाला आवडलेल्या कथेचे, कवितेचे किंवा स्वतच्या साहित्याचे वाचन केले तरी चालेल. कुठे तुमची कसली फसवणूक झाली असेल तर ती तुम्ही नाव घेऊन कट्टय़ावर मांडावी अशी अपेक्षा आहे. थोडक्यात सांगायचे तर   Aहब्tप्ग्हु ल्ही् tप एल्ह ! मराठीत सांगायचे तर ‘जो जे वांछील तो ते बोलो!” अशा रीतीने पहिला कट्टा संपला.

या कट्टय़ापासून प्रेरणा घेऊन अनेक कट्टे मुंबईत निघाले. काही ‘अत्रे कट्टा’ याच नावाने, तर काही वेगळ्या नावाने. म्हणजे या कट्टय़ाने मुंबईत तरी कट्टा संस्कृती रुजवली यात काही शंका नाही. या कट्टय़ाने काय इतिहास घडवला याची माहिती पुन्हा केव्हातरी…

 [email protected]

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)