लंच डेट : रुचकर गप्पा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शेफ विष्णू मनोहर

ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ खाण्याच्या सात्त्विक पण अस्सल चवी, अनेक रुचकर शाकाहारी पदार्थ या गप्पांमधून समोर आले.

चतुरस्र ओघवती वाणी आणि भाषेवर प्रभुत्व अशी ही व्यक्ती म्हणजे सुधीर गाडगीळ. आपल्या लंच डेटविषयी जेव्हा त्यांना सांगितलं तर ते बोलले, ‘अरे! खाण्याबद्दल मी काय बोलणार? तो तुझा विषय आहे.’ पण जेव्हा रसोईमध्ये त्यांच्याबरोबर गप्पा सुरू केल्या त्यावेळी त्यांच्याकडे इतके किस्से होते की काय लिहू आणि काय नको असं वाटायला लागलं.

आमच्या गप्पा रंगात यायच्या आधी टेबलवर धिरडं, आप्पे, सूप आणि छोटा बेबी-साबुदाणा वडा इत्यादी पदार्थ वेगवेगळय़ा चटण्यांबरोबर पुढय़ात आले. त्यांचा फडशा पाडता-पाडता सुधीरजींनी गप्पांना सुरुवात केली. सर्वात पहिला प्रश्न त्यांना विचारला की, ‘तुम्हाला कुठल्या पद्धतीचं जेवण आवडतं?’ तर त्यांनी सांगितलं, ‘मला ब्राम्हणी पद्धतीचं किंवा पुणेरी जेवण फार आवडतं. भाज्यांबरोबरच मला कडधान्यसुद्धा तितकेच प्रिय. प्रत्येक कडधान्याला स्वतःची वेगळी चव आहे. त्यामुळे उसळी करताना खूप जास्त मसाल्यांचा वगैरे वापर न करता हिंग-मोहरी-हळद-तिखट या मूळ मसाल्यांचा वापर करून त्या उसळी केल्या तर मजा अधिक असते.

बायकोच्या हातची अळूची पातळ भाजी, आईच्या हातची कडेपर्यंत भरलेल्या गुळाची पोळी तसेच आजीच्या हातचा गोळा सांबर फार आवडतो.’ गोळा सांबार म्हटल्यावर माझ्यासुद्धा भुवया वर गेल्या की नेमका हा काय प्रकार आहे आणि कुठला? तर त्यांनी सांगितलं की, ‘हा पुण्यातील पारंपरिक प्रकार आहे. यामध्ये वेगवेगळय़ा भाजण्या एकत्रित करून त्याचे गोळे बनवितात व सांबारामध्ये ते शिजवतात. शिजता-शिजता ते सांबार घट्ट होते म्हणून त्याला गोळा सांबार असे म्हणतात. ते म्हणाले पण की एकदा भरपूर गरमा-गरम गोळा सांबार खाल्लं की दिवसभर पोटाची चिंता मिटली.’

कधी-कधी असं होतं की खूप खायची इच्छा नसते, पण भूक मात्र लागली असते. अशा वेळी मी आंबेमोहर तांदळाचा भात व त्याबरोबर आमटी व तूप हा प्रकार मला पंचपक्वानापेक्षा जास्त प्रिय आहे. ‘तुम्ही कधी स्वतः स्वयंपाक केला आहे का’, हा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, तशी कधी वेळ आली नाही, पण आजीला मदत मात्र करायचो.’ यावरचा एक छान किस्सा त्यांनी सांगितला तो असा की, एसएनडीटी कॉलेजमध्ये होम सायन्स विभागाची उत्कृष्ट विद्यार्थीनी मला निवडायची होती त्याकरिता मी जेव्हा त्या मुलींच्या मुलाखती घ्यायला लागलो त्यावेळी एक मुलगी मला म्हणाली की, स्टेजवर ज्याप्रकारे राजकीय प्रश्न विचारतात तसे प्रश्न विचारू नका, स्वयंपाकातील काही तरी विचारा. त्यावर ते उत्तरले की, मीसुद्धा तिला असं म्हटलं की दोन प्रश्न विचारीन त्यांची तू उत्तरं दे. मी तिला प्रश्न विचारला, लग्नात ज्या पाच खिरी बनवितात त्यांची नावे सांग? तर ती मुलगी सांगू शकली नाही आणि उलट बोलली तुम्ही सांगा. मी तिला पटकन पाच खिरींची नावं सांगितली. कारण मी आजीच्या हाताखाली या खिरी बनवायचो. दुसरा प्रश्न होता चिक म्हणजे काय? तो प्रश्नसुद्धा तिला आला नाही. शेवटी तिने हार मानली.

गव्हाची चिक हा गाडगीळांचा वीक पॉइंट आहे. गव्हाचा चिक त्यावर शेंगदाण्याचं तेल टाकून खायला त्यांना लहानपासून खूप आवडतं. याशिवाय त्यांचे अतिशय आवडते पदार्थ म्हणजे न सोललेल्या बटाटय़ांचा काळा मसाला घालून तयार केलेला रस्सा, मेथीची गोळा भाजी.

जाता-जाता त्यांना एक प्रश्न विचारला की, विदेशात दौऱयावर असताना तुम्ही जेवणाचं कसं करता?’ तर ते म्हणाले, ‘मला लहानपणापासून डायरी लिहायची सवय आहे. त्यामुळे विदेशातसुद्धा कुठेही जेवायला गेल्यानंतर तिथे काय चांगलं होतं, कशाची भाजी होती याची मी नोंद करून ठेवतो. एकदा असंच सहा वर्षांनंतर अमेरिकेतल्या एका शहरात पुन्हा जायचा योग आला. मी शाकाहारी असल्यामुळे शक्यतो माझ्या जेवणाची सोय कुणाच्या तरी घरीच होते. यावेळीसुद्धा सहा वर्षांपूर्वी ज्या घरी गेलो त्याच घरी माझी जेवणाची व्यवस्था होती. तिथे गेल्यावर यजमान बाई म्हणाल्या, ‘अहो! गाडगीळ तुम्हाला आठवतं का यापूर्वीही तुम्ही आमच्याकडे जेवायला आले होते.’ त्यावर मी त्यांना म्हटलं, ‘अहो तुम्ही काय-काय केलं होतं हेसुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो आणि सहा वर्षांपूर्वीचा सगळा मेनू केळ फुलाच्या भाजीसकट जेव्हा त्यांना सांगितला तर कौतुकाने त्यांच्या डोळय़ांत पाणी आले. जाताना त्यांनी त्यांचं पुस्तक ‘मानाचं पान’ मला दिलं ज्यामध्ये हिंदी-मराठी सगळय़ा सेलिब्रिटीच्या खाण्याच्या आवडीनिवडी लिहिल्या आहेत.

आम्रखंड
साहित्य – 2 वाटय़ा दह्याचा चक्का, 2 वाटय़ा साखर, 2 वाटय़ा मँगो पल्प, अर्धा चमचा जायफळ पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर, पाव चमचा केशर.
कृती – 2 वाटय़ा घट्ट दह्याचा चक्का 2 वाटी साखरेत मिसळून ठेवा. थोडय़ा वेळाने याला मशीनमध्ये किंवा कापडावर फेटून वस्त्रगाळ करा. नंतर यात तेवढाच मँगो पल्प घालून मिश्रण एकत्र करा. वरून चवीनुसार जायफळ, विलायची पावडर व केशर घालून थंड करा.

मेथीची गोळा भाजी
साहित्य – 1 जुडी मेथीची, 1 टोमॅटो, 2-3 हिरव्या मिरच्या , 2 चमचे बेसन, 2 चमचे तेल, तिखट, मीठ चवीनुसार, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, गूळ चवीनुसार, 5-6 लसूण पाकळय़ा

फोडणीकरिता – हिंग-जिरे-मोहरी व हळद.

कृती – मेथीची पाने कोवळय़ा दांडय़ासकट खुडून, धुऊन चिरून घ्यावी. 2 वाटी पाण्यात बेसन मिसळून घ्यावे. हिरवी मिरची बारीक चिरावी. टोमॅटोसुद्धा चिरून घ्यावा. कढईत 1 चमचा तेलाची फोडणी करून त्यात हिंग, मोहेरी, जिरे व हळद घालून टोमॅटोच्या फोडी व लगेचच मेथीची भाजी घालून परतावे. त्यावर पाण्यात मिसळलेले बेसन घालून पुन्हा ढवळावे. नंतर मीठ, धणेपुड, गरम मसाला, गूळ घालून एकदा ढवळून मंद गॅसवर कढईवर झाकण ठेवून एक वाफ आणावी. दोन मिनिटांनी पुन्हा एकदा ढवळावे. इथे पाण्याचे प्रमाण पाहावे. भाजी घट्ट होत असेल तर अर्धी वाटी पाणी अजून घालावे. बाऊलमध्ये ही भाजी काढून घ्यावी. एक चमचा तेलाची पुन्हा फोडणी करावी. तेल गरम झाले की त्यात जिरे, लसूण घालून गॅस बंद करावा व लगेचच त्यात लाल तिखट घालून ही फोडणी बाऊलमधल्या भाजीवर ओतावी.

– [email protected]