अंतराळ युद्ध, हिंदुस्थान सज्ज आहे का?

57
gsat

>> कर्नल अभय बा. पटवर्धन

हिंदुस्थानने मार्च 2019 मध्ये ‘मिशनशक्ती’ यशस्वी करून अंतरिक्ष प्रहारक्षमता साध्य केली आहे. युद्धमान्य निकषांनुसार या क्षमतेचा विकास करून अंतरिक्ष संरक्षणाचा ओनामा करणे हे यापुढील अपेक्षित पाऊल आहे. आपली संरक्षण दले व सरकार यांनी यावर आधीच विचार केला असेल किंवा क्षेपणास्त्राच्या परीक्षणानंतर तो सुरूही झाला असेल. अर्थात ही गोपनीय बाब असल्यामुळे ती कधीही समोर येणार नाही. पुढील महिन्यात येणारे नवे सरकार हिंदुस्थानच्या अंतरिक्ष रक्षणाचा विचार करून त्याबाबत काळजीपूर्वक सत्वर निर्णय घेईल अशी आशा करायला हरकत नाही.

सध्या युद्धं जमीन, अवकाश आणि समुद्रात होतात. तथापि भविष्यातील युद्धं पृथ्वीभोवती फिरणाऱया उपग्रहांच्या मध्यात, प्राणवायू नसणाऱया वातावणापलीकडील अवकाशात (बियाँड ब्रीदेबल ऍटमॉसफिअर) खेळली जातील. अमेरिका, रशिया व चीन हे देश अशा संभाव्य युद्धासाठी तयार होत आहेत. अशा वेळी मार्च महिन्यात ‘मिशनशक्ती’द्वारा अंतराळातील फिरत्या उपग्रहाचा अचूक वेध घेत तो उद्ध्वस्त करणारा हिंदुस्थान या शर्यतीत कुठे आहे असा प्रश्न उपस्थित होतो. हे तिन्ही देश प्रतिस्पर्ध्यांच्या अंतरिक्षातील साधनसंपत्तीवर (स्पेस असेटस्) हल्ले करून त्यांना ध्वस्त करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्र्ाास्त्र्ाांचा वापर कसा करता येईल याच्या कार्यवाहीत गुंतले आहेत. या तीनही देशांमधील सरकारी, निमसरकारी आणि खासगी उद्योग अशा प्रकारच्या शस्त्र्ाास्त्र्ाांंची निर्मिती वेगाने कशी करता येईल यात मग्न आहेत. रशिया आणि चीनच्या अंतराळ शस्त्र्ाास्त्र्ाांनी, हत्यारांनी अमेरिकेची झोप उडवली आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकन स्पेस ऍसेटची सुरक्षाच धोक्यात आणली आहे. सद्यस्थितीत चीनकडे अमेरिकन उपग्रहांचे सामरिक दळणवळण, माहितीची संयंत्रणा (इंटेलिजन्स गॅदरिंग एपरेटस्) टेहळणी आणि उलटवार करणारी संयंत्रणा (सर्व्हेलन्स ऍण्ड रिकॉनिसन्स एपरेटस्) तसेच भौगोलिक जागा शोधण्याची क्षमता या सर्व बाबी निप्रभ करणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे. रशिया हा या क्षेत्रात चीनचा प्रतिस्पर्धी असला तरी चीनकडे असलेली ‘डायरेक्ट एनर्जी वेपन्स’ आणि ऍडव्हान्स्ड हायपरसॉनिक वेपन्स रशियाकडेदेखील नाहीत.

अमेरिका व रशिया हिंदुस्थानचे मित्र आहेत, मात्र चीन हिंदुस्थानचा मित्र नाही. चीनचा विस्तारवाद, अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन आणि काराकोरम अशा विषयांसह डोकलामसारख्या इतर भूभागांबद्दलची धुसपूस आणि हिंदुस्थानला वरचढ होऊ न देण्याची तीव्र इच्छा यामुळे चीन हिंदुस्थानचा अंतराळ कार्यक्रम सफल होऊ देणार नाही हे स्पष्ट आहे. हिंदुस्थान आता अंतरिक्षातील सामरिक वर्चस्वाच्या शर्यतीत सामील झाला आहे आणि चीनशी होणारे भावी युद्ध अथवा चकमक अंतराळात होणार यात शंकाच नाही. चीनच्या या अंतराळ सामर्थ्यामुळे हिंदुस्थानचे अंतरिक्ष हे एक युद्धक्षेत्र (वॉर फायटिंग डोमेन) बनेल किंवा असेल. या भविष्यात घडणाऱया काल्पनिक गोष्टी नसून नव्या धोक्याचा इशारा आहे. मुख्य म्हणजे हा धोका आता आपल्या तोंडावर आला आहे. त्यामुळे त्यावर आरामात विचार करणे परवडणारे नाही. तेवढा वेळदेखील आपल्याकडे राहिलेला नाही. त्यामुळे अंतराळातील संभाव्य युद्धासाठी आपण कशा पद्धतीने सज्ज राहू शकतो यावर तातडीने हालचाली कराव्या लागतील. पुन्हा हे करत असताना चीननेही आगळीक करणे सुरूच ठेवले तर हिंदुस्थानला युद्धाला सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

सध्या अंतराळात हिंदुस्थानचे वेगवेगळे 48 उपग्रह भ्रमण करीत आहेत. त्यांच्यावर आपली अर्थव्यवस्था निर्भर आहे. जीपीएस, भविष्यातील स्वयंचलित कार, ड्रोन्स, दूरध्वनी, मोबाईल, बँकिंग, संगणक, इंटरनेट सेवा अशा अनेक सुविधांची कळ अंतरिक्षात फिरणाऱया या उपग्रहांकडे आहे. त्यामुळे या उपग्रहांनाच चीनकडून धोका निर्माण झाला तर त्यावर अवलंबून असणारी हिंदुस्थानी अर्थव्यवस्था कोसळू शकते. फक्त अर्थव्यवस्थेच्याच नव्हे तर हिंदुस्थानच्या एकूण संरक्षणालाच धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे हिंदुस्थानचे भविष्य त्याच्या अंतरिक्ष सुरक्षेवर अवलंबून आहे आणि त्यासाठी आपल्याला अंतरिक्ष संरक्षण करणारी सुसज्ज यंत्रणा उभी करावी लागेल. तरच आपले ‘अंतराळहित’ अबाधित राहू शकेल.

अंतरिक्ष सुरक्षा सुसज्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सध्याच्या तिन्ही सैन्यदलांप्रमाणे (लष्कर, वायुदल आणि नौदल) अंतरिक्ष दल (स्पेस फोर्स) उभारावे लागेल. या दलामध्ये 20 ते 25 हजार सैनिक आणि अधिकारी यांचा समावेश असेल. आपल्या सध्याच्या संरक्षण दलामधूनच त्यांची निवड केली जाईल. त्यामुळे अंतरिक्ष दलासाठी वेगळा मोठा खर्च होईल असे होणार नाही. या दलासाठी ‘जॉइंट कॉम्बॅट कमांड फॉर स्पेस’ म्हणजेच जेसीसीएसची उभारणी करून अंतराळावर नजर ठेवणारा प्रमुख (स्पेशल वॉर फायटिंग कमांडर) नियुक्त करावा लागेल. हे अंतरिक्ष दल नॅशनल स्पेस डेव्हलपमेंट एजन्सीच्या नियंत्रणाखाली काम करेल. याच यंत्रणेच्या निगराणीत हिंदुस्थानची सैनिकी अंतरिक्ष यंत्रणा कार्यरत होईल अशी अपेक्षा आहे.

संभाव्य युद्धांसाठी एकत्रित कार्यक्षेत्रावर प्रभुत्व असणारी नियमनक्षम संयंत्रणा (युनिफाइड, मल्टीडोमेन कमांड ऍण्ड कंट्रोल सिस्टीम) उभी करण्याची सुवर्णसंधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातूनच अंतरिक्ष संरक्षणासाठी लागणाऱया गोष्टी आणि साधनसामग्रीचे उत्पादन आपण देशातच करू शकणार आहोत. त्यातून देशांतर्गत उद्योगाला चालना मिळेल. अंतरिक्ष रक्षणासाठी हायपरसॉनिक धोक्यांना शोधू शकणारी रडार यंत्रणा, त्यासाठी लागणारा प्रचंड डेटा गोळा करून त्याचे पृथःकरण करू शकणारी यंत्रे, सेन्सर्स आणि शूटर्स यांचा योग्य समन्वय साधणारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम तसेच संगणकीय अंतरिक्ष सुरक्षेसाठी लागणारी संयंत्रणा निर्माण करण्याची जबाबदारी खासगी उद्योजकांना दिली जाईल. साहजिकच एक सशक्त, लवचीक आणि संवेदनाक्षम व तेवढीच संभाव्य धोक्यांवर मात करण्यास सक्षम असणारी नियमन प्रणाली विकसित होऊ शकेल. या एकत्रित प्रयत्नांनीच हिंदुस्थानी अंतरिक्ष सुरक्षित राहू शकेल. तसेच पृथ्वीवर असलेले मोबाईल फोन नेटवर्क, कृत्रिम माहितीवर (आर्टिफिशियल इंटलिजन्स) कार्यरत असणारे ‘नॅशनल सिक्युरिटी स्पेस आर्किटेक्चर’ स्थापन होईल. हिंदुस्थानचे ‘मिशनशक्ती’ सफल झाल्यामुळे आता अंतराळातील संभाव्य युद्धाला तोंड देण्यासाठी आपण अंतरिक्ष दल स्थापन करणे अत्यावश्यक आहे. यात आपण मागे राहून चालणार नाही. सरकार आणि खासगी उद्योजकांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे आपण या बाबतीत चीनला मागे टाकून ‘आपले आकाश’ संरक्षित आणि सुरक्षित करू शकतो.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या