नवरात्र विशेष – आरोग्यदेवीची उपासना

>> दा. कृ.सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

आजपासून देवीचा जागर सुरू होतो. स्वत: ही आदिमाया विज्ञानाधिष्ठित आहे. त्यामुळे आज परिस्थितीनुरूप तिने आरोग्यदेवीचे रूप धारण केले आहे.

देशभरात नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. दुर्गादेवीची नवरात्रात पूजाअर्चा, उपवास, नामस्मरण केले जाते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा नवरात्रोत्सव करण्यावर मर्यादा आल्या असून तो साधेपणानेच साजरा करावा. गर्दी न करता कोरोनाबाबत शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता याबाबत काळजी घ्यायला हवी. त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव घरच्या घरी आरोग्यदायी कसा साजरा करायचा ते पाहूया.

शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. शनिवार दि. 17 ऑक्टोबर हा घटस्थापनेचा संपूर्ण दिवस चांगला आहे. तरी सूर्योदयापासून दुपारी 2 वाजेपर्यंत कधीही घटस्थापना करावी. यावर्षी कोरोना लढाई काळात नवरात्र हा आदिशक्तीचा उत्सव आला आहे. दुर्गा म्हणजे शक्ती. माणसात प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आरोग्य चांगले राहते. म्हणून या वर्षी नवरात्रात आरोग्यदेवीची उपासना करणे योग्य होईल. आरोग्यविषयक सर्व नियमांचे शिस्तीचे पालन करणे हीच खरी दुर्गापूजा होईल. यंदाच्या नवरात्राचा आरोग्याशी निगडित दृष्टिकोन असायला हवा. हिंदुस्थान हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे सणांचे व शेतीचे वेळापत्रक यांचे नाते आहे. ठराविक सण ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी पंचांगात सौर व चांद्र पद्धतीचा मेळ घातलेला आहे. ऋतूप्रमाणे आहार घेतला की, शरीराचे आरोग्य चांगले राहते. म्हणून श्रावण महिना पावसाळ्यात येतो. उपवास केल्याने शरीराचे आरोग्य चांगले राहते. दिवाळी थंडीत येते. तेलातुपाचे पदार्थ खातो. नवरात्रात शेतातील धान्य घरात येते. म्हणून नवरात्रात आपण निर्मिती शक्तीची पूजा करतो. उत्सवांमध्ये माणसे एकत्र आल्याने मनाचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच आपले सण आरोग्यदायी आहेत.

कोरोनाचे संकट हे विश्वव्यापी आहे. ‘माझे पुटुंब, माझी जबाबदारी’ हा मंत्र लक्षात ठेवायला हवा. स्वच्छता पाळा, गर्दी करू नका, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्या. आजकाल ऑनलाइनवर सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळत असल्याने पूजेला लागणारे साहित्य ऑनलाइन मागवू शकता. शक्य नसल्यास केवळ अक्षता अर्पण केल्या तरी हरकत नाही. देवीची मनोभावे उपासना करा. देवीची भीतीने पूजा करू नये. एखादी चूक झाली तरी देवी क्षमा करते. देवी कधीही रागवत नाही. ती पृपाळूच असते. दुसरी गोष्ट म्हणजे यंदा या संकटामुळे कोणाला आपण घरी बोलावू शकत नाही. अशावेळी ऑनलाइन अॅपद्वारे देवीचे दर्शन आप्तेष्ट-मित्रांना घरी न बोलावता द्या. झूम, गुगल अॅप असे बरेच पर्याय आहेत, ज्याच्या माध्यमातून सगळ्यांना देवीचे दर्शन घेणे शक्य आहे. तसेच घरच्या घरी धातूच्या मूर्तीचे पूजन करा. घरातील आई, मुलगी, बहीण, पत्नी, सून या देवताच आहेत. घरातील मंदिरातल्या दुर्गेपेक्षा त्या जिवंत देवता आहेत, त्यांचे महत्त्व जास्त आहे. त्यामुळे देवीच्या पूजेसोबतच घरातल्या महिलांचा आदर करा, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हे महत्त्वाचे. तीच खरी दुर्गापूजा होईल.

खरं तर नऊ दिवसांत सर्वांनी उपवास करायलाच हवेत असे शास्त्रात लिहिलेले नाही. शरीरातील मांद्य दूर करण्यासाठी हलका आहार घेणे म्हणजेच उपवास होय. मनाला संयम असावा आणि शरीर शुद्ध होण्यासाठी उपवासाचा हेतू असतो. त्याने शरीर आणि मन हे दोन्ही शुद्ध होते. जेव्हा शरीर उपवास करून शुद्ध होते तेव्हा मनसुद्धा शुद्ध होते. त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे नवरात्रात उपवासादरम्यान फळे, पाणी असा आहार घेतात, जो पचायला हलका असतो. त्यामुळे उपवास हा सात्त्विकता वाढवण्यासाठी केला जातो. निर्मिती शक्ती आणि 9 अंक यांचे अतूट नाते आहे. बी जमिनीत पेरले की, 9 दिवसांनी अंपुरते. गर्भधारणा झाल्यापासून 9 महिने 9 दिवसांनी मूल जन्माला येते. त्यामुळे नवरात्रात या नऊ दिवसांना महत्त्व असते. देवीने त्या राक्षसांना मारले, पण आपण आपल्या मनातील राक्षसांचा नाश करायला हवा. त्यासाठी आपल्याला स्वतःमधील आळस, अज्ञान, अनारोग्य, अंधश्रद्धा, अनीती या राक्षसांचा आपणच आपल्याला वध करायचा आहे. नाश करायचा आहे.

काळजी काय घ्याल?
z नवरात्रोत्सवात स्वच्छता, सोशल डिस्टन्स, मास्क लावणे, शिस्त यांचे पालन करावे.
z बाहेरून आणलेल्या वस्तू स्वच्छ करून त्या वापराव्यात.
z पूजा साहित्यात एखादी वस्तू नसेल तर अक्षता अर्पण कराव्यात.
z आप्तेष्ट मित्रांना घरी न बोलावता ऑनलाइन अॅपवरून दर्शन द्यावे.
z गर्दी न करता नवरात्रोत्सव साधेपणाने, शिस्त व नियम पाळून उत्साहात साजरा करावा.

आपली प्रतिक्रिया द्या