
>> धनंजय साठे
आपल्या अभिनय आणि गायकीच्या जोरावर मराठी सिने-नाटय़ क्षेत्र दणाणून सोडणारा, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा कोल्हापूरचा रांगडा गडी, अस्सल मराठमोळा कलाकार अरुण सरनाईक यांच्याशी असलेलं कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं, घट्ट मैत्रीच्या त्या आठवणी आजही कायम आहेत.
तसं पाहिलं तर 21 जून 1984 हा एक सामान्य दिवस होता. तेव्हा आम्ही बंगळुरूला राहायला होतो. वडिलांची नोकरी आणि त्यानंतर त्यांनी सुरू केलेला व्यवसाय बंगळुरूत असल्याकारणाने आमचं कुटुंब बंगळुरूतच स्थायिक झालं होतं. तर 21 जूनच्या रात्री आमच्याकडे मुंबईवरून आईचा मामेभाऊ सहकुटुंब घरी जेवायला आले होते. डायनिंग टेबलवर गप्पा रंगल्या होत्या. बाहेर पडत असलेल्या मस्त पावसामुळे हवेत सुखद गारवा होता आणि माहौल छान झाला होता. तेवढय़ात गप्पांमध्ये क्षणिक व्यत्यय आणणाऱया टेलिफोनची बेल वाजली. माझे बाबा कोणता तरी किस्सा रंगवून सांगत होते. सांगता सांगता त्यांनी फोन उचलला आणि “हॅलो” म्हणाले. दुसऱया क्षणी बाबांच्या हातून फोनचा रिसिव्हर गळून पडला आणि ते रडायला लागले. माझ्या उभ्या आयुष्यात मी बाबांना कधीच रडताना पाहिले नव्हते. पहिल्यांदाच त्यांना हुंदके देउढन रडताना मी पाहत होतो. अचानक भयाण शांतता पसरली. कोणालाच कळेना, असं अचानक काय घडलंय ते. आई बाबांजवळ गेली. बाबा तिच्याकडे पाहत हुंदके देत म्हणाले, “अरुण गेला.”
आपल्या अभिनय आणि गायकीच्या जोरावर मराठी सिने-नाटय़ क्षेत्र दणाणून सोडणारा, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा कोल्हापूरचा रांगडा गडी, अस्सल मराठमोळा कलाकार अरुण सरनाईक… गेला… असं सांगणारा तो फोन होता. पत्नी व मुलासमवेत कोल्हापूरवरून पुण्याला ‘पंढरीची वारी’ या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी प्रवास करत असताना त्यांच्या गाडीला रात्री अपघात झाला. जागीच तिघांचं निधन झालं होतं. सुदैवाने त्यांची मुलगी सोबत नव्हती (ती आज डॉक्टर असून नाईकनवरे बिल्डर्सच्या घरातली सून आहे.)
4 ऑक्टोबर 1935… पंडित शंकरराव सरनाईक (‘महाराष्ट्र कोकीळ’) यांच्या घरी अरुण सरनाईकांचा जन्म झाला. मोठे बंधू निवृत्तीबुवा सरनाईक हे जयपूर घराण्याचे प्रसिद्ध गायक. संगीतमय वातावरणात जडणघडण झाल्याने त्यांच्यावर गाण्याचे संस्कार लहानपणापासूनच घडले गेले. याचमुळे अरुण सरनाईक उत्तम गायक होते. तसेच ते अफलातून पेटी आणि तबला वाजवायचे. मुंबईच्या रुईया कालेजमधून पदवीचं शिक्षण घेत असताना त्यांची माझे वडील अरुण साठे यांच्याशी मैत्री झाली. माझ्या वडिलांचा
कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात कायम सहभाग असायचा. नाटक बसवणं, अभिनय करणं यात ते नेहमीच अग्रेसर असायचे आणि हेच बाबांच्या आणि सरनाईकांच्या मैत्रीचं निमित्त बनलं. कालांतराने या दोन्ही अरुणची मैत्री इतकी घट्ट होत गेली की, माझ्या आजी-आजोबांना अरुण सरनाईक आपलाच मुलगा आहे, असं वाटू लागलं होतं.
एकदा माझ्या वडिलांना ‘मुंबईचा जावई’ या सिनेमात काम करण्याबद्दल विचारण्यात आलं होतं. ती आाफर घेऊन खुद्द राजदत्त आजोबांना समजावण्यासाठी घरी आले होते. एकूण सिनेसृष्टीच्या अनिश्चित वातावरणाची अनुभूती घेतलेल्या अरुण सरनाईकांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी माझ्या आजोबांना शब्द दिला की, जोपर्यंत मी या सिनेक्षेत्रात आहे, तोपर्यंत अरुणला या क्षेत्रात येऊ देणार नाही. त्याची उत्तम नोकरी आहे. इथे अनिश्चितता आहे. तेव्हा त्याला नोकरी करू दे. माझे वडील एका मध्यमवर्गीय कुटुंबातले होते आणि म्हणून सरनाईकांना वाटायचं की, माझ्या वडिलांकडे चांगली नोकरी आहे. ती त्याने सांभाळावी. यामागे मित्राबद्दल वाटणारी आपुलकी आणि जिव्हाळा होता. आजोबांचा अरुण सरनाईकांवर अलोट विश्वास होता आणि सरनाईकांचं आमच्या कुटुंबावर अमाप प्रेम होतं. त्यातूनच हा निर्णय झाला, पण त्यांची मैत्री अजून घट्ट होत गेली.
अजून एक गंमत म्हणजे त्या काळी निर्माते किंवा चाहते हे अभिनेत्यांशी पत्रव्यवहार करत असत. तो सगळा पत्रव्यवहार आमच्या घरच्या पत्त्यावर होत असे. त्या वेळी मी खूप लहान होतो. अरुण सरनाईक मला कडेवर घेऊन ‘घरकुल’मध्ये त्यांनीच गायलेलं ‘पप्पा सांगा कुणाचे…’ हे गाणं गात घरभर फिरायचे. आवाजाची देणगी आणि संगीताचे संस्कार असल्याने पार्श्वगायक म्हणूनही त्यांनी नाव कमावलं.
माझ्या आठवणीतले अरुण काका शूटिंग नसले की, चक्क मांडी घालून फरशीवर निवांत बसलेले दिसायचे. जेवतानाही तसेच बसून जेवायचे. त्यांचा अभिनय एकदम खराखुरा वाटावा असा होता. सुरेख शब्दफेक, पाणीदार डोळे, पीळदार बांधा… सुरुवातीच्या काळात त्यांनी इचलकरंजीत एका इंजिनीअरिंग कंपनीमध्ये अल्पकाळ नोकरी केली, परंतु कलेचं वेड स्वस्थ बसू देत नसल्याने 1956 साली मो.ग.रांगणेकरांच्या ‘भटाला दिली ओसरी’ या नाटकाद्वारे अरुण सरनाईकांनी रंगमंचावर एन्ट्री घेतली. नंतर 1961 मध्ये ‘शाहीर परशुराम’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि मराठी सिनेसृष्टीला एक हान्डसम नायक मिळाला. ग्रामीण रांगडा गडी, शहरी उच्चशिक्षित तरूण, मंत्री… सगळय़ाच व्यक्तिरेखांत ते शोभून दिसले आणि लोकप्रिय बनले.
वरदक्षिणा, शाहीर परशुराम, सवाल माझा ऐका, मुंबईचा जावई, रंगल्या रात्री अशा, सावली प्रेमाची, केला इशारा जाता जाता, सिंहासन… हे त्यांचे सिनेमे अजरामर झाले. अपराध मीच केला, गुड बाय
डॉक्टर, गोष्ट जन्मांतरीची, तरुण तुर्क म्हातारे अर्क… या नाटकांतून त्यांनी अभिनय नाही केला, तर ते ती भूमिका जगले. पप्पा सांगा कुणाचे, प्रथम तुज पाहता, एक लाजरा न साजरा मुखडा… ही त्यांनी गायलेली गाणी अविस्मरणीय होती. त्यांच्या तबला वादनाचे सर्वात मोठे चाहते खुद्द हिंदुहृदयसम्राट माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे होते. त्यांचा हा झंझावाती प्रवास 21 जून 1984च्या काळरात्री नियतीने झडप घालून संपवला. असंख्य चाहत्यांपासून एक अभिनेता, माझ्या बाबांपासून त्यांचा सख्खा मित्र आणि आमच्या कुटुंबातला सदस्य नियतीने हिरावून गेला. त्या ऑलराऊंडर अवलिया कलाकाराला साठे कुटुंब व असंख्य चाहत्यांच्या वतीने मानाचा मुजरा.
[email protected]
(लेखक क्रिएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)





























































