
>> दिलीप ठाकूर
स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम करतानादेखील एखाद्या अनुभवी दिग्दर्शकाकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले तर आपल्या कामात अधिक प्रमाणात सुसूत्रता येते असे मानणारे दिग्दर्शक पूर्वी मराठी चित्रपटसृष्टीत होते. त्यात रमेश साळगावकर यांचे नाव घ्यावे लागेल. रमेश साळगावकर यांनी कमलाकर तोरणे यांच्या दिग्दर्शनाखाली ‘जावयाची जात’, ‘चांदणं शिंपीत जा’ वगैरे चित्रपटांसाठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील शम्मी कपूर दिग्दर्शित ‘बंडलबाज’ या चित्रपटाच्या वेळी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून भरपूर अनुभव घेतला आणि मग ‘माळावरचे फूल’ (1982) या चित्रपटापासून स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम सुरू केले. या चित्रपटात सुलोचना, रवींद्र महाजनी, उषा नाईक, प्रिया तेंडुलकर, विलास रकटे, शांता तांबे, भालचंद्र कुलकर्णी यांच्या, तर त्यानंतरच्या ‘मामला पोरीचा’ (1988) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी, सविता प्रभुणे, शुभांगी रावते, रुही बेर्डे, शांता तांबे, रवींद्र बेर्डे, मधू आपटे असा खूपच मोठा कलाकार संच होता, पण रमेश साळगावकर यांनी तत्पूर्वी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना यातील अनेकांसोबत काम केल्याने त्यांना या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे नियोजन जमलं. दुर्दैवाने याच काळात अशोक सराफच्या गाडीला अपघात झाल्याने त्यांना काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर रहावे लागले. त्यातून बरे झाल्यानंतर याच चित्रपटाच्या चित्रीकरणापासून अशोक सराफने पुन्हा कामाला सुरुवात केली. त्यासाठी रमेश साळगावकर यांनी श्रीगणेशोत्सवातील अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी अकरा वाजताचा मुहूर्त निवडला होता. अशोक सराफसाठी हा चित्रपट कायमच महत्त्वाचा.
रमेश साळगावकर यांची मराठी चित्रपट दिग्दर्शनातील घोडदौड सुरू असतानाच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक टी. रामाराव इत्यादींच्या दिग्दर्शनात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून वाटचाल कायम ठेवली आणि त्यातून त्यांनी सतत नवीन गोष्टी शिकण्याची संधी कायम ठेवली. स्वतंत्रपणे दिग्दर्शन करताना त्यांनी ‘सह्याद्रीचा सिंह’ या चित्रपटाच्या मुहूर्ताला भरपूर प्रमाणात महत्व दिले. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या चित्रपटाचा मुहूर्त बाळासाहेबांच्या शुभहस्ते करण्यात आला. या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात डिंपल कपाडिया, दिग्दर्शक जे. पी. दत्ता इत्यादी मान्यवर होते. या चित्रपटात कुलदीप पवार, सरला येवलेकर, निशिगंधा वाड इत्यादींच्या प्रमुख भूमिका होत्या. रमेश साळगावकर यांनी आपल्या यशस्वी कारकीर्दीत ‘मधुचंद्राची रात्र’ (प्रमुख भूमिकेत अशोक सराफ, अलका आठल्ये, रमेश भाटकर, रेखा राव, प्रशांत दामले, विजय कदम), ‘चार दिवस सासूचे’ (प्रमुख भूमिकेत अलका आठल्ये, प्राजक्ता दिघे, प्रशांत दामले, संदीप चोणकर, दया डोंगरे, मोहन जोशी), ‘सत्त्वपरीक्षा’ ( प्रमुख भूमिकेत लक्ष्मीकांत बेर्डे, रेशम, राजशेखर, उषा नाईक, उदय टिकेकर, शरद पोंक्षे इत्यादी) तसेच ‘परीस’ इत्यादी मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अनेक कलाकारांनी त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांत भूमिका साकारल्या ही त्यांची मोठीच जमेची बाजू. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांनी ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ वगैरे चित्रपटांतून छोटय़ा भूमिकाही केल्या.




























































