संचित – शतायुषी गायक-नायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

मास्टर अविनाश ऊर्फ गणपतराव मोहिते यांची आज 114 वी जयंती. मी त्यांना भेटलो ते शंभर वर्षांचे असताना. त्या वेळी या नटश्रेष्ठाची मुलाखत विश्वास भट या माझ्या मित्राने व्हिडीओ चित्रित केली. ती तासाभराची मुलाखत म्हणजे आनंदाचा ठेवा तर आहेच, तो एक प्रेरणास्रोतही आहे. कारण त्या वयात मास्टर अविनाश यांनी जवळजवळ 95 वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. आचार्य अत्रे यांच्या ज्या ‘पायाची दासी’ या चित्रपटाचे नायक झाल्यावर (1932) त्यांना ‘मास्टर अविनाश’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. नव्वदी उलटलेल्या त्यांच्या पत्नी उषाताई आणि इतर कुटुंबीय आमच्यासह, या नटवर्याचा उत्कट, उत्स्फूर्त कलाविष्कार अनुभवत होते.

1 जानेवारी 1909 या दिवशी गणपतरावांचा जन्म मिरज येथे झाला. मी त्यांना भेटलो ती तारीख 13 डिसेंबर 2008. म्हणजे शंभर वर्षे पूर्ण व्हायला केवळ 18 दिवस बाकी होते. गणेश लक्ष्मण मोहिते तथा गणपतराव आणि नंतर मास्टर अविनाश झालेले शतायुषी गायक-नायक यांचा जीवनपट उलगडून दाखवत होते. ‘आमच्या घरातच गाण्याचे-अभियनाचे संस्कार होते. वडील लक्ष्मणराव, पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे गुरुबंधू आणि बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य. माझे मोठे बंधू शंकरराव ‘ललितकलादर्श’ या केशवराव भोसले यांच्या नाटक पंपनीत होते. वडिलांनीच मला वयाच्या सहाव्या वर्षी गाण्याचे चांगले संस्कार व्हावे म्हणून पंपनीत पाठवलं. मात्र मला पहिली भूमिका मिळाली तरी मास्टर दीनानाथ यांच्या ‘बलवंत संगीत मंडळी’च्या किर्लोस्कर लिखित ‘शापुंतल’ नाटकात. दहाव्या वर्षी मी ‘ऋषीकुमार’ झाली. हे सारे परिश्रम फळाला येऊ लागले. वयात आल्यावर देखणेपणामुळे त्यांना ‘स्त्र्ााr-पार्ट’ करण्याची संधी मिळाली. ते दीनानाथांबरोबर ‘उग्र मंगळ’मध्ये नेत्रावतीची तर ‘देशपंटक’ नाटकात लवंगीची भूमिका साकारू लागले. ‘ब्रह्मकुमारी’ नाटकातली दीनानाथरावांची देखणी नायिका अहिल्या ही त्यांची भूमिका खूप नावाजली.

गणपतराव ‘एकपाठी’ होते. त्यांची स्मरणशक्तीही जबरदस्त. वयाच्या शंभरीतही त्यांना सर्व घटना स्पष्टपणे आठवत होत्या. ‘बलवंत संगीत मंडळी’चा क्रिकेटचा संघही होता. त्यातून गणपतराव उत्तम क्रिकेट खेळत. या खेळामुळे त्यांची सी. के. नायडू यांच्याशी मैत्री झाली. नायडू त्यांना ‘उग्र मंगळ’ नाटकातलं ‘बंधात असा तारा’ हे गाणं म्हणायला आवर्जून सांगायचे. नाटकाइतकीच त्यांची सिनेकारकीर्द गाजली. आचार्य अत्रे यांच्या ‘पायाची दासी’ चित्रपटात त्यांनी देखण्या नायकाचे काम केले. मो. ग. रांगणेकर यांच्या ‘नाटय़निकेतन’ संस्थेचं ‘संगीत कुलवधू’ मास्टर अविनाश आणि ज्योत्स्ना भोळे यांनी गाजवलं. त्याची आठवण होताच या शंभरीच्या अभिनेत्याने एकदम अचूक स्वर लावला. ‘तुझं नि माझं जमेना, परि तुझ्यावाचून करमेना’ आम्ही स्तिमित होऊन ऐकत होतो. ‘बलवंत नाटक पंपनी’च्या आरंभीच्या काळात अभिनेते चंद्रकांत गोखले यांनी मास्टर अविनाश यांचं गाणं ऐकलं आणि त्यांना गुरुस्थानी मानलं असं त्यांनीच पंच्याऐंशीव्या वर्षी एका मुलाखतीत सांगितलं आणि म्हणाले, ‘माझे गुरुजी आहेत सांगलीला…नव्याण्णव वर्षांचे..!’ तेच मास्टर अविनाश.

बोलता बोलता नटवर्यांना ते सारे दिवस, नाटय़प्रयोग नजरेसमोर दिसू लागले. रंगदेवता याही वयात त्यांच्यावर प्रसन्न होती. त्यांनी एकदम सूर धरला, ‘सुहास्य तुझे मनास मोही, जशी न मोही सुरां सुधाही.’ हे गाणं होताच ते एकदम उद्गारले, आता मी एक भावगीत म्हणतो आणि ‘होताच उजळ आभाळ, दाराशी वाजीव शीळ’ हे गाणं झाल्यावर त्यांनी कानडी, पंजाबी गाण्यांचे मुखडेही ऐकवले. एक अद्भुत अनुभूती आम्हाला लाभत होती. लोकमान्य टिळकांनी माझं कौतुक करून मला सोन्याची अंगठी भेट दिली. (1918) टिळक-गांधी-सावरकर या सर्वांना त्यांनी जवळून पाहिलं होतं. या सर्वांचाच प्रभाव त्यांच्यावर होता. गांधीजींच्या एका उपोषण काळात मीसुद्धा आठ दिवस उपवास केला. असं सांगता त्यांचा स्वर जडावला.

मराठी संगीत नाटकातलं पहिलं द्वंद्वगीत मास्टर अविनाश आणि ज्योत्स्ना भोळे यांचेच. त्यांना ‘युनेस्को’च्या पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले. नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृत्यर्थ दिले जाणारे सुवर्णपदकही प्राप्त झाले. मास्टर अविनाश यांचं व्यक्तिमत्त्व प्रसन्न आणि चतुरस्र होते. त्यांचे वडील त्यांना ‘हसऱया’ म्हणत. ते स्मितहास्य शंभरीतही त्यांच्या चेहऱयावर विलसत होते. या अभिनेत्याने 1975 मध्ये निवृत्ती स्वीकारली. परंतु लोकाग्रहामुळे वयाच्या 83 व्या वर्षी (1992) ‘कुलवधू’मध्ये नायकाची भूमिका केली. अभिनयाबरोबरच क्रिकेट, शिकार, गाणं, दिग्दर्शन या विषयात गती असलेल्या मा. अविनाश यांच्यातला शेतकरी सतत सजग होता. त्यांनी तळेगाव (दाभाडे) येथे सहकारी ऊस शेतीचा देशातला पहिला प्रयोग केला. त्यांच्या प्रयोगाचा माहितीपट बनल्याचे ते म्हणाले. अशा या विलक्षण व्यक्तिमत्त्वाला भेटण्याचे भाग्य आम्हाला लाभले आणि ती भेट चित्रितही करता आली याचा आनंद वाटतो.

[email protected]