
>> दिलीप जोशी
परवा 8 नोव्हेंबरला पु. ल. देशपांडे यांची 103 वी जयंती. त्यांना जाऊनही आता बावीस वर्षे झाली. 12 जून 2000 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि जगभराचे त्यांचे लाखो चाहते हळहळले, शिक्षक, लेखक, नाटककार, अभिनेता, चित्रपटकार, आकाशवाणी, दूरदर्शन कार्यक्रमांचा निर्माता, संगीतकार, गायक, मराठी एकपात्री प्रयोगांचे जनक आणि प्रभावी वक्ता आणि त्याचबरोबर सामाजिक समतेची जाणीव असलेला कृतीशील दानशूर. पुलंची ही किती किती रूपं! आचार्य अत्रे यांच्यानंतर इतपं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पुलंचंच. ‘महाराष्ट्राचं लाडपं व्यक्तिमत्त्व’ असं बिरूद त्यांना लाभलं. त्यांच्या वाचकांनी, प्रेक्षकांनी त्यांच्यावर उदंड प्रेम केलं. त्यांच्या आवाजातील व्यक्तिचित्र आजही नवी पिढी ऐकते.
पुलंना भेटण्याची संधी दोन-तीन वेळा लाभली. त्यातल्या काही गप्पा समूहातल्या होत्या. मुंबईत ग्रंथालीतर्फे कविवर्य बा.भ. बोरकर यांच्या सत्तरीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात निवेदक होते मंगेश पाडगावकर आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करीत होते पु.लं. सुरुवातीलाच ते म्हणाले, ‘‘आज बोरकरांना सत्तर वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या-माझ्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे.’’ मग एक ‘पॉज’ घेत बोलले, ‘‘म्हणजे बोरकर माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे आहेत. नाहीतर आमच्या दोघांकडे बघितल्यावर गैरसमज व्हायचा. माझ्याकडे लोक जरा (हात रुंदावून) ‘स्थूलमानाने’च बघतात.’’ पहिल्याच वाक्यात सभा जिंकण्याचं हे अत्रेय, पण पु.लं.स्टाईल तंत्र.
त्या कार्यक्रमाला मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी होती. बाबा आमटेही होते. जेवण्याच्या वेळी प्रेक्षक-रसिकांसह सारी मंडळी एकत्रच होती. त्यावेळी आमच्या एका घोळक्याला पुलंनी बोरकरांच्या कवितेविषयी थोडक्यात सांगितलं. बोरकर दुरून काwतुकाने पाहत होते. त्यापूर्वी अगदी लहानपणी त्यांचं ‘वाऱयावरची वरात’ पाहिलं होतं. जनता पक्षाच्या सभेत त्यांची आणीबाणीविरोधी भाषणंही ऐकली होती, पण थेट त्यांच्या घरी जाऊन भेटणं, गप्पागोष्टी होणं असं घडलं काही नव्हतं. कदाचित आम्ही तरुण होईपर्यंत पु.लं. मुंबई सोडून पुण्याला गेल्यामुळे असेल, पण जमलं नाही हे खरं. …आणि नंतर तो योग अवचित आला. कश्मीर प्रश्न धगधगत असताना, अतिरेक्यांच्या हल्ल्यात अनाथ झालेली काही मुस्लिम मुले पुण्याच्या ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार यांच्याकडे आली होती. मुंबईत त्या मुलांना फिल्म स्टुडिओ आणि अभिनेत्यांचं आकर्षण होतं. ती जबाबदारी ‘चित्रलेखा’चे संपादक ज्ञानेश महाराव यांनी स्वीकारली. ती मुलं पुण्याला परत गेल्यावर मनात विचार आला की, कश्मीरला परत जाण्यापूर्वी त्यांची आणि पुलंची भेट झाली तर? पण पु.लं. आजारी आहेत. पार्किन्सन्ससारखा विकार आहे, शिवाय ते व्हीलचेअरवर असतात असं सगळं समजल्यामुळे काही निश्चित नव्हतं, पण नहार यांनी प्रयत्नपूर्वक वेळ ठरवली.
12 डिसेंबर 1999. त्या सकाळी मुंबईहून एका मित्रासह पुण्यात दाखल झालो. तिथल्या दोन मित्रांनाही पुलंकडे येण्याची इच्छा होती. कश्मिरी मुलं बसमध्ये बसली होती. आम्ही काही जण ‘मालती-माधव’मधल्या पुलंच्या घरी गेलो. सुनीताबाईंनी मनमोकळेपणाने स्वागत केलं, ‘‘या, सगळे या.. आत या ना’’ आणि पंधरा-वीस जण पुलंच्या दिवाणखान्यात थांबलो. थोडय़ाच वेळात व्हीलचेअरवरून पु.लं. आले. संजयने त्यांना ही मुलं कोण-कुठली वगैरे सारं सांगितलं. सुनीताबाईसुद्धा बारकाईने ऐकत होत्या. त्यातल्या एका लहान मुलाने कश्मिरी गाणं म्हटलं. मी पुलंच्या जवळच होतो. त्यांचा आवाज खोल गेला होता. एक प्रभावी वक्ता म्हणून मी त्यांना अनेकदा ऐकलं होतं. त्यामुळे वाईट तर वाटलंच, पण भाईंचा उत्साह तसूभरही कमी नव्हता. फक्त थोडं विस्मरण होत असावं. त्यांनी विचारलं, ‘‘या मुलांना कुठलं गाणं येतं.’’ संजयने सांगितलं, ‘‘सारे जहां से अच्छा.’’ मी ते भाईंना सांगितलं.
काही क्षण शांततेत गेले. भाईंच्या नजरेत एक चमक उमटली आणि ते एकदम गाऊ लागले, ‘‘सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा.’’ आवाज खर्जात गेला असला तरी इतक्या वर्षांचे सूर-ताल पक्के होते. अगदी मधल्या आलापीसह त्यांनी मुखडा पूर्ण केला. आम्ही ‘कोरस’सारखं म्हणत होतो. मग एकदम त्यांनी वर पाहिलं, पुढचं बहुतेक आठवत नसावं. मी जमेल तसं कडवं म्हणायला सुरुवात केली आणि पुलंनी पुन्हा सूर-ताल धरला. तोपर्यंत व्हिडीओग्राफर पोचला होता. आठ-नऊ मिनिटांचा तो हृद्य प्रसंग चित्रीत झाला. संजय नहार यांनी ती पॅसेट आमच्याकडे पाठवली. मात्र पॅसेटवरून कालांतराने डिजिटाइज’ करताना बराच ‘क्वालिटी लॉस’ झाल्याने अगदीच फिकट दिसू लागली.
काही का असेना, पुलंचा आशीर्वाद वाटावा असा तो सोहळा. ती मुलं आणि आम्ही सारेच खूश झालो. निघताना पु.लं. त्या मुलांना म्हणाले, ‘‘पूर्वी तुमचं घर लहान होतं. आता (इकडे आल्यामुळे) ते मोठं झालंय.’’ मोजक्या शब्दांतला हा संदेश पुलंच्या निर्वाणापूर्वी बरोबर सात महिने आधी रेकॉर्ड झालेला. आता ते चित्रीकरण खूप चांगलं दिसत नसलं तरी तिथे उपस्थित असलेल्या आमच्या प्रत्येकाच्या मनात ‘पुलकित’ करणारी ती भेट कोरलेली आहे.


























































