
>> दिलीप जोशी
1938 मध्ये गुजरातमधल्या हरिपुरा येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात सुभाषबाबूंची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. या सभेचे सुभाषबाबूंच्या आवाजातील हिंदी आणि बंगाली भाषेतील ध्वनिमुद्रण माझ्या संग्रही आहे. देशातील सर्व दुरवस्था संपवण्याचा एकमेव उपाय म्हणजे आझादी ! असाच या भाषणाचा आशय होता.
देशाच्या स्वातंत्र्याला नुकतीच 75 वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्व देशवासीयांनी अत्यंत उत्साहाने साजरा केला. आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं देशव्यापी पर्व होतं ते ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधातलं. ‘ईस्ट इंडिया कंपनी’ची सत्ता जाऊन थेट ब्रिटिश सरकारच हिंदुस्थानवर राज्य करू लागले. मात्र स्वतःच्या देशात लोकशाही जपणारे ब्रिटिश हिंदुस्थानला साम्राज्याचा भाग मानत होते आणि इथे त्यांची एकाधिकारशाहीच होती.
ही साम्राज्यशाहीची जुलमी परकीय सत्ता उलथून टाकण्यासाठी देशात वातावरण तयार होऊ लागले. त्यातून 1885 मध्ये मुंबईत राष्ट्रीय काँग्रेसचा जन्म झाला. सरकारशी सामोपचाराने वागून आपल्या मागण्या मांडणे असे काँग्रेसचे सुरुवातीचे स्वरूप होते. लोकमान्य टिळकांच्या काँग्रेस प्रवेशानंतर स्वातंत्र्य लढय़ात जहाल प्रवाह आला. त्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि इतर अनेकांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला. न्यायमूर्ती रानडे आणि त्यांचे शिष्य गोपाळ कृष्ण गोखले मवाळ पंथाचे होते. टिळक युगाची समाप्ती 1920 मध्ये झाली. सावरकर त्यावेळी शिक्षा भोगत होते. गोखले यांचे 1915 मध्येच निधन झाले होते आणि त्याच वेळी त्यांचे आफ्रिकेतील लढा यशस्वी करून आलेले शिष्य महात्मा गांधी देशाच्या राजकारणात सक्रिय झाले होते. त्यांनी असहकारिता, स्वदेशी अशा मार्गाने देशव्यापी अहिंसक लढा उभारला.
पुढच्या काळात काँग्रेसमधून बाहेर पडून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र्ा सेनेची स्थापना करणारे ‘आझाद हिंद’ फौजेचे जनक नेताजी सुभाषचंद्र बोस एकेकाळी काँग्रेसमध्येच होते. तिथेही ते तेजस्वी तरुण नेते म्हणून ओळखले जात असत. ‘आयसीएस’ (त्यावेळची इंडियन सिव्हिल सर्व्हिस) परीक्षा सहज पास होण्याची शक्यता असताना ब्रिटिशांच्या चाकरीत जायचं नाही या निश्चयाने त्यांनी शिक्षण सोडून दिले. काँग्रेसमध्ये येऊन ते प्रभावी तरुण नेते बनले. 1938 मध्ये गुजरातमधल्या हरिपुरा येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात सुभाषबाबूंची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. माझ्या संग्रही असलेले आणि आता कदाचित नेटवरही उपलब्ध असलेल्या सुभाषबाबूंच्या आवाजातील हिंदी आणि बंगाली भाषेतील ध्वनिमुद्रण आहे ते काँग्रेस अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांचं. त्यांच्या भाषणाचा आशय असा. ‘देशवासीयांनो, आपल्याला स्वातंत्र्य लढा प्रखरतेने लढायचा आहे.त्यासाठी काँग्रेस ही एकमेव संस्था देशभर कार्य करीत आहे.
देशातील परकीय आणि जुलमी सत्ता दुष्काळ, महामी अशा जनतेला भेडसावणाऱया प्रश्नांकडे लक्ष देणार नाही. देशातील सर्व दुरवस्था संपवण्याचा एकमेव उपाय म्हणजे आझादी! त्यागासाठी तरुणांनी तयार राहावे. लढय़ांचे बिगूल केव्हाही पुकारा करेल.’ त्यांच्या ओजस्वी भाषणाने देशातील तरुणाई रोमांचित झाली. सुभाषबाबूंना देशभर मानसन्मान मिळू लागला. 1939 मध्ये राजस्थानातील त्रिपुरी येथेही त्यांनी पुन्हा काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली, परंतु गांधीजींनी पाठिंबा दिलेल्या सीतारामय्या यांचा पराभव झाला. त्यामुळे गांधीजींनी ‘हा माझाच पराभव’ असल्याचे म्हटले. हळूहळू वैचारिक दरी वाढली. नेताजींनी काँग्रेस सोडली. आधी जर्मनीला जाऊन ते नंतर जपानमध्ये गेले. जपानच्या सहाय्याने सिंगापूर येथे ‘आझाद हिंद’ फौजेची स्थापना त्यांनी केली आणि ‘चलो दिल्ली’चा नारा दिला. ‘कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाये जा, ये जिंदगी है कौम की तू कौम पे लुटाये जा’ हे त्या फौजेचं स्फूर्तिगीत होते. ‘आझाद हिंद फौजे’ने हिंदुस्थानचे स्वतंत्र सरकारही स्थापन केले होते. मात्र 1945 मध्ये जपान दुसऱया महायुद्धात पराभूत झाल्यावर सारे संपले. नेताजी एका विमान अपघातात सापडले. त्यातच त्यांचा अंत झाला असे म्हटले गेले तरी अजूनही त्याविषयी शंका उपस्थित केली जाते. नेमके काय घडले आणि या तेजस्वी जीवनाचा अंत ओढवला हे स्पष्टपणे कधीच कळले नाही. मात्र हिंदुस्थानी जनतेच्या मनात सुभाषचंद्र बोस यांना ‘नेताजी’ म्हणून अढळ स्थान लाभले.
त्यांच्या सैन्यात महिलांची ‘रानी झांसी रेजिमेंट’ होती. त्यातील प्रसिद्ध कॅप्टन लक्ष्मी यांना 1992 मध्ये भेटण्याची संधी लाभली. ऑगस्ट क्रांती मैदानावर 1942 च्या आंदोलनाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्य लढय़ातील स्वातंत्र्य सैनिक जमले होते. त्यांच्या समोर त्यांनी सुभाषबाबू आणि आझाद हिंद फौजेच्या प्रेरणादायी आठवणी सांगितल्या. त्यालाही आता बराच काळ लोटला. एकेकाळी जमवलेल्या या दुर्मिळ आवाजांच्या ‘संचिता’मधले सुभाषबाबूंचे हिंदी आणि बंगाली भाषण या लेखाच्या निमित्ताने पुन्हा ऐकले आणि पुन्हा एकदा तो रोमांचक इतिहास नजरेपुढे साकारला.



























































