ठसा – राज ग्रोव्हर

>> दिलीप ठाकूर

मनोरंजन क्षेत्रातील काहींची वेगळी वैशिष्टय़ं फारशी चर्चेत येत नाहीत; पण कौतुक करावे असे बरेच काम त्यांनी केलेले असते. चित्रपट निर्माता राज ग्रोव्हर हेदेखील अगदी तसेच. वयाच्या 87व्या वर्षी त्यांचे अमेरिकेतील न्यू जर्सी येथील ओल्ड ब्रीज येथे निधन झाले. बरीच वर्षं मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टीत सदैव आपल्या हसतमुख चेहऱ्याने वावरणारे काही वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले, तरीदेखील ते मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या जुन्या मित्रांना भेटायला येऊन जुन्या आठवणींत रमत. ‘ग्रोव्हर नेव्हर ओव्हर’ हे त्यांच्या तोंडी असलेले पालुपद आणि याच सकारात्मक दृष्टिकोनासाठी ते ओळखले जात. सत्तरच्या दशकात ते अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक सुनील दत्त यांच्या अजंठा आर्ट्स या चित्रपट निर्मिती बॅनरमध्ये चित्रपट निर्मिती व्यवस्थापक होते. तेव्हा चित्रपट निर्मितीतील अनेक गोष्टी त्यांनी अधिकाधिक प्रमाणात शिकून घेतल्या. म्हणून तर अजंठा आर्ट्स निर्मित व राज खोसला दिग्दर्शित ‘नेहले पे देहला’ (1978) या मनोरंजक गुन्हेगारी पटासाठी राज ग्रोव्हर सहाय्यक निर्माता अशी बढती मिळाली. राज ग्रोव्हर यांनी मग कधी स्वतंत्र तर कधी सहाय्यक निर्माता अशी वाटचाल सुरू ठेवली. त्यांचे काही चित्रपट सांगायचे तर, ‘ताकद’, महेश भट्ट दिग्दर्शित ‘ठिकाना’ इत्यादी चित्रपटांची निर्मिती केली. चित्रपटसृष्टीचे स्वरूप बदलल्यावर त्यांनी ‘आर्य’ या सायकॉलॉजिकल थ्रीलर चित्रपटाची निर्मिती केली. राज ग्रोव्हर चित्रपट निर्मितीपुरते स्वस्थ बसणारे नव्हतेच. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनुभवांवर ‘द लिजण्ड ऑफ बॉलीवूड’ हे भरपूर माहिती, गोष्टी, किस्से असलेले पुस्तक लिहिले. त्यात धर्मेंद्रच्या दीर्घकालीन प्रवासाची रंजक माहिती, अमिताभ बच्चनची पहिली स्क्रीन टेस्ट, ‘सागर’च्या वेळेस डिंपलने केलेले पुनरागमन, त्यासाठीची तिची धडपड अशी बरीच वेगळी, रोचक व रंजक माहिती दिली आहे. चित्रपटसृष्टीतील गप्पांच्या अड्डय़ांवर राज ग्रोव्हर याच गोष्टी हसत हसत सांगत. अर्थात ते दिवस वेगळेच होते आणि माणसंही एकमेकांत मिळून मिसळून राहत. त्या पिढीतील एक यशस्वी निर्माते काळाच्या पडद्याआड गेले.