मनतरंग – दोस्ती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

‘पिअर प्रेशर’ म्हणजेच ‘मित्रपरिवाराकडून येणारा दबाव’ हा कधी कधी इतका असह्य होऊन जातो की, त्यामध्ये सारासार विवेकबुद्धी नावाची चीज नष्ट होऊन जाते. मग ती आरोही असो की कोणीही. आजच्या तरुणांमध्ये आणि पौगंडावस्थेतील मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण ‘मित्रपरिवाराकडून येणारा दबाव’ हे आहे. बऱ्याच वेळा असंही दिसून आलं आहे की, हा दबाव या मित्रमंडळींकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे येत असतो. याचा परिणाम हा त्या परिवारात वावरणाऱ्या मुलावर मात्र प्रत्यक्ष होत राहतो.

‘मैत्री… हा शब्द नसून ही भावना आहे’ असं म्हणायला गेलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आपण सगळेच जण ‘मैत्री’ हा शब्द जगत असतो. आपल्या ‘पर्सनल स्पेस’ मध्ये घुसण्याची परवानगी फक्त आपल्या खास दोस्तांनाच असते. आपल्याला अंतर्बाह्य बरोबर ओळखणारी आपली मित्रमंडळीच असतात आणि हीच मंडळी आपल्याला सुधारतातही. आपल्यापैकी बरेच जण हे मित्रमंडळींबाबत भाग्यवान असतात; पण काही जण नसतात.

पंधरा वर्षांची आरोही (नाव बदलले आहे) ही अशीच भाग्यवान नसणाऱयांच्या पंक्तीत बसणारी होती आणि खेदाची गोष्ट अशी की, हे तिला मान्यही करायचे नव्हते. ज्यावेळी तिचे आई-वडील तिला समजावून थकले त्यावेळी तिला समुपदेशनासाठी आणावे लागले.

आरोही ही दहावीत शिकत होती. तिचा मित्रपरिवार तसं बघायला गेलं तर मोजकाच होता, पण तिच्यावर त्यांचा बराच पगडा होता. तिचे मित्र आणि मैत्रिणी ही श्रीमंतांची मुलं होती आणि ‘वाया गेलेली’ अशीच होती.

‘‘हिला आता दारूचीही सवय लागली आहे हो’’ आरोहीची आई रडता रडता सांगत होती. ‘‘कार्टी अजून काय प्रताप करून दाखवेल आता यापुढे काय माहीत?’’ असं म्हणत तिने कपाळाला हात मारला आणि बाजूला बसलेल्या आरोहीकडे जळजळीत कटाक्ष टाकला. आरोहीने हे ऐकून न ऐकल्यासारखं केलं तेव्हा आईचा पारा चढला आणि तिने रागारागात तिच्यावर हात उचलला.

तिच्या आईचं हे असं वागणं हे अपेक्षितच होतं. कारण आरोही ही जास्तीत जास्त तिच्या मित्रमैत्रिणींचे अनुकरण करत होती.
‘‘मी कूल वागते हे माझ्या मम्मी-पप्पांना आवडत नाही. यू नो जनरेशन गॅप. ह्यांनी काही आयुष्यात केलं नाही. नो नाईट आऊटस् नथिंग! आता मी करतेय तर मला करू देत नाहीत’’ आरोही तिच्या म्हणण्याचं समर्थनच करत होती. तिच्याशी बोलत असताना तिने हेही कबूल केले की, तिने ड्रिंक्स घ्यायला सुरुवात केली होती.

‘‘मला कळतं मॅम की, हे चांगलं नाही. माझा फोकस आता माझ्या करीअरवर असायला हवा, पण मी माझ्या फ्रेन्ड्ससारखी वागले नाही तर ते मला ‘बहेनजी’ म्हणतात’’ आरोहीने स्वतःची बाजू मांडली.

‘पिअर प्रेशर’ म्हणजेच ‘मित्रपरिवाराकडून येणारा दबाव’ हा कधी कधी इतका असह्य होऊन जातो की, त्यामध्ये सारासार विवेकबुद्धी नावाची चीज नष्ट होऊन जाते. मग ती आरोही असो की कोणीही.

आजच्या तरुणांमध्ये आणि पौगंडावस्थेतील मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण ‘मित्रपरिवाराकडून येणारा दबाव’ हे आहे. बऱयाच वेळा असंही दिसून आलं आहे की, हा दबाव या मित्रमंडळींकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे येत असतो. याचा परिणाम हा त्या परिवारात वावरणाऱया मुलावर मात्र प्रत्यक्ष होत राहतो. त्यातच मग…

– ताणतणाव
– द्विधा मनःस्थिती
– घरच्यांबद्दल असलेली अविश्वासाची भावना
– चिडचिड
– चुकीची निर्णय प्रक्रिया

या अशा गोष्टी होतात. आरोहीवर हा सर्व परिणाम दिसत होता. अजून एक गोष्ट अशी झालेली की, तिने तिच्या मित्रपरिवारावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता. त्याचं कारणही तसंच होतं. तिला त्यांची पंपनी जवळची वाटत होती. त्यामुळे तिच्या पालकांना तिची काळजी वाटत होती.

आता आरोहीला सांभाळणं खूप गरजेचं होतं. तिला लागलेल्या वाईट सवयींबद्दल तिला कल्पना करून देणं, चांगल्या – वाईटाची पारख याबाबत मार्गदर्शन करणंही महत्त्वाचं होतं. तसंच तिला लागलेली ड्रिंक्सची सवय ही तिच्यासाठी किती घातक ठरू शकते यासाठीही तिला कठोर शब्दांची गरज होती.

समुपदेशनाचा उद्देश जरी येणाऱया व्यक्तीला मार्गदर्शन करणे हा असला तरी मुलं किंवा ज्यांच्यामध्ये आक्रमकता अथवा आक्रस्ताळेपणा दिसतो, त्यांना कठोर शब्दांत समज करून देणे हाही असतो. समुपदेशक कधीही सरसकट सगळ्यांनाच मार्गदर्शन करत नाही.

आरोहीचे आईवडील या सर्व प्रक्रियेमुळे जरा निर्धास्त झाले. कारण त्यांना आरोही महत्त्वाची होती. तिचा दहावीचा अभ्यास त्यांना महत्त्वाचा होताच, पण त्याहीपेक्षा जास्त तिचा ‘मला मित्रमैत्रिणी नसतील तर मी एकटी पडेन’ हा गैरसमज दूर करणे जास्त गरजेचे होते. कारण त्याचा परिणाम तिच्या आत्मविश्वासावर झालेला होता.

हे आव्हानात्मक होतं. आरोही या सर्व प्रक्रियेतून जात असताना वैतागत होती, कंटाळतही होती. तिला ‘माझा मित्रपरिवार चांगला नाही. याउलट मी असा मित्रपरिवार जोडेन जो चांगला असेल’ हा विचार ठसवून घ्यायला वेळ लागला, पण काही काळानंतर तिला हे जमायला लागलं. तिने त्यांच्याशी संबंध पूर्णपणे तोडले आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.

यासाठी आरोहीला अभ्यासाच्या पद्धती, वेळेचे व्यवस्थापन हे शिकवण्यात आले. तसंच तिचे मनःस्वास्थ्य चांगले राहावे म्हणून तिच्या पालकांना तिच्या बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्यास सांगण्यात आले.

शेवटी या लहान मुलांना आणि तरुणाईला एकच नमूद करावेसे वाटते की, चांगल्या वाईट गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच. त्यासाठी आपण स्वतःला जागरूक ठेवणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
 [email protected]