
>> दिवाकर ठोंबरे
क्षणभंगूर जीवन माझे
समरसून जगणार
स्वतः घेउनी मोद
इतरांना देणार
सुंदर मी होणार, सुंदर मी होणार
अशी मनीषा बाळगलेलं एक विलोभनीय कीटक म्हणजे फुलपाखरू. पर्यावरणाच्या अन्न व जैव साखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेलं फुलपाखरू हे आबालवृद्धांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. फुलपाखरांच्या या अद्भूत जगात डोकावण्याची संधी मिळाली ती छायाचित्रणाच्या हौसेपायी! पुढे ही ‘हौस’ भागवण्यासाठी म्हणजेच चांगली छायाचित्रे मिळवण्यासाठी, फुलपाखरांचा अनेक ‘अंगांनी’ अभ्यास सुरू केला.
फुलपाखरांच्या पंखांची ठेवण, त्यांची उडण्याची लकब, त्यांचं चिखलपान, त्यांचं प्रियाराधन, त्यांचं स्थलांतर यासारख्या अनेक सवयींबद्दल वाटणारं कुतूहल मनात घेऊन फुलपाखरांच्या रंगबिरंगी जगात घुसलो, तो एक निसर्गप्रेमी म्हणूनच. फुलपाखराच्या जीवनावस्था, त्यांचे शत्रू, त्यांची जीवनशैली यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टीदेखील अभ्यासत होतो. अनेक प्रश्न मनात होते, त्यापैकीच एक म्हणजे ‘फुलपाखरांची नावं’ हा होय.
फुलपाखरांची नावे सर्वत्र इंग्रजी भाषेतच रूढ आहेत. सिल्व्हर लाईन, पॅन्सी, टायगर, क्रो, स्विफ्ट आणि याबरोबरच चक्क कमांडर, कमोडोर, अॅडमिरल, सोल्जर अशी संरक्षण दलातील पदनामेदेखील फुलपाखरांना दिली गेली आहेत.
फुलपाखरांना नावं कोणी व कशी दिली? तसेच यातील बरीचशी नावं वर्णनात्मकच का आहेत? असे उपप्रश्नदेखील मनात रुंजी घालत होते.
अनेक फुलपाखरं महाराष्ट्रातदेखील आढळतात. सहाजिकच या फुलपाखरांच्या नावांविषयी कुतूहल मनात दाटून राहिलं. मग यावर अनेक तज्ञांशी चर्चा झाल्या, परिसंवाद ऐकले, यथेच्छ वाचनही झालं. त्यातूनच मग समोर आलेली गोष्ट पुढीलप्रमाणे –
हिंदुस्थानच्या पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांच्या हुकमतीत अनेक प्रकारचे संशोधन हिंदुस्थानात झाले. त्यापैकी एक म्हणजे फुलपाखरांच्या प्रजाती शोधण्याचे. साहजिकच एखादी प्रजाती शोधली की, तिला नाव देणे हे ओघाने आलेच. मग हे इंग्रजी लष्करी अधिकारी, हिंदुस्थानी उपखंडात विविध ठिकाणी आपली सेवा बजावीत असत. त्या काळी सगळीकडे जंगलंच होती. अशा वेळी इंग्रज अधिकाऱयांनी फुलपाखरांच्या प्रजाती शोधून त्यांना आपापले ‘पदनाम’ दिले. यातूनच कमोडोर, सोल्जर, कमांडर, अॅडमिरल, सेलर, कॉन्स्टेबल असली नावं फुलपाखरांना मिळाली, हा यामागील इतिहास आहे.
इंग्रज लोक हे दस्तऐवज करण्यातदेखील वाकबगार होते. त्यांनी ही सारी नावे सुचिबद्ध करून ठेवली आणि इंग्रजी भाषेबरोबरच फुलपाखरांच्या नावांचादेखील प्रसार आणि फुलपाखरांची सेलर, क्युपीड, सिल्वर लाईन, कमांडर, इमिग्रंट, थ्रिरिंग यासारखी इंग्रजी नावेच सर्व ठिकाणी रूढ होती आणि आहेत. महाराष्ट्र जैवविविधता मंडळामार्फत फुलपाखरांना मराठीत नावे 2019 सालच्या डिसेंबर महिन्यात देण्यात आली. शासकीय पातळीवरील तळमळीचा एखादा जरी ‘अधिकारी’ असला तर तो किती विलक्षण प्रभावीपणे कार्य करू शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. जैवविविधता मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आणि फुलपाखरू प्रेमी डॉ. विलास बर्डेकर यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली सन 2018मध्ये फुलपाखरू अभ्यासकांची एक समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीने फुलपाखरांच्या सवयी, खाद्य वनस्पती, रंग, आकार, नक्षी आणि इंग्रजी नावाचे भाषांतर इत्यादी 5 निकषांवर आधारित अशी मराठी भाषेत फुलपाखरांना नावे दिली गेली. फुलपाखरांचे मराठीत नामकरण करताना सदर नावे आपल्या संस्कृतीशी निगडित, आपल्या मातीतील वाटावीत आणि उच्चारण्यास, लक्षात ठेवण्यास सोपी असावीत, यावरही कटाक्ष ठेवण्यात आला.
आपल्या हिंदुस्थानात एकूण 1300पेक्षा जास्त फुलपाखरांच्या प्रजाती आढळून येतात, त्यापैकी महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 274 प्रजाती आढळून आलेल्या आहेत. या सगळ्या म्हणजे 274 प्रजातींना मराठीत नावे देण्यात आली आहेत.
महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या फुलपाखरू नामकरण समितीमध्ये डॉ. राजू कसंबे, डॉ. जयंत वडतकर, श्री. हेमंत ओगले, श्री अभय उजागरे आणि माझा (दिवाकर ठोंबरे) समावेश करण्यात आला होता. अनेक सभा, चर्चा, शोधनिबंध, जुने साहित्य याचा परामर्श घेऊन, महाराष्ट्रात आढळणाऱया फुलपाखरांच्या 275 प्रजातींच्या मराठी नावांची यादी प्राथमिक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली. आपल्या राज्यातील इतर फुलपाखरू तज्ञ, अभ्यासक, संशोधक मंडळी तसेच सर्वसामान्य जनांना ई-मेल, वॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या अद्ययावत संपर्क साधनांचा वापर करून ही मराठी नावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. लोकांकडून सूचना/बदल मागवण्यात आले. या शासनाच्या अनोख्या पुढाकाराला लोकांनी उदंड प्रतिसाद देत अनेकांनी विधायक सूचना केल्या. डॉ. दत्तप्रसाद सावंत, डॉ. अमोल पटवर्धन, कु. गार्गी गीध, श्री परेश चुरी, नंदीश सोनगिरे यासारख्या फुलपाखरू प्रेमी मंडळींनी बदल सुचवले. याचा परिपाक म्हणजे हे नामकरण होय. फुलपाखरांच्या 274 प्रजातींबरोबरच त्यांच्या 6 कुळांनादेखील मराठमोळी नावे देण्यात आली. मुग्धपंखी, नील, पीतश्वेत, पुंचलपाद, पुच्छ आणि चपळ कूळ अशी ही नावे असून संबंध भारतवर्षात स्थानिक भाषेत फुलपाखरांना आणि त्यांच्या कुळांना नावे देणारे महाराष्ट्र हे केवळ दुसरे राज्य आहे. याआधी केरळ राज्याने मल्याळी भाषेत नावे दिलेली आहेत.
फुलपाखरू प्रेमींच्या श्रमाचे फळ म्हणजे मराठी भाषेत फुलपाखरांचे नामकरण नोव्हेंबर 2019 रोजी संपन्न झाले. नुसत्या फुलपाखरांच्या नावांची कूळनिहाय यादी तयार करण्याऐवजी एक सचित्र माहिती पुस्तिका तयार करण्याचं ठरलं. सुमारे 275 फुलपाखरांची छायाचित्रांसह माहितीपुस्तिका संकलित करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. यातून एक सुंदरशी सुमारे सव्वाशे पानांची, रंगीत माहिती पुस्तिका तयार झाली. प्रत्येक फुलपाखराची रंगीत छायाचित्रं, त्यांचा पंखविस्तार, खाद्य आणि पुष्प वनस्पती (नेक्टर), मराठी-इंग्रजी-लॅटीन भाषेतील नावे यांच्यासह कुळानुसार यादी समाविष्ट करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील फुलपाखरांच्या मराठमोळय़ा नावांची ही माहिती पुस्तिका लोकांना प्रचंड आवडली असून त्यात फुलपाखरांशी निगडित काही जुन्या-नव्या कवीच्या कवितांचादेखील समावेश करण्यात आलेला आहे.
रिसर्चगेट नावाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील फुलपाखरांची मराठमोळय़ा नावांची ही माहिती पुस्तिका ‘विनामूल्य’ उपलब्ध आहे. सर्व पर्यावरण प्रेमी ही माहिती पुस्तिका जरूर डाउनलोड करून घेतील अशी आशा बाळगतो.
स्वराज्य मिळाले कधीचे, सुराज्याची आता पाळी
मातीचा जपण्या ठेवा, बनूया सारे माळी
इंग्रजी भाषेची अतीच झालीये गोळी
यापुढे घेऊ पुलपाखरांची नावे मराठमोळी ।।1।।
साइक, मॅप, ज्युडी, यल्लो ‘रूढ’ की हो सगळी
मनमौजी, पिंगा, नीलांबरी नाही का ही आगळी
मुग्ध कुळातील ही पाखरं जणू आली आजोळी
तोंडी रुजवू फुलपाखरांची नावे मराठमोळी ।।2।।
रंग, रूप, उडण्याची लकब प्रत्येकाची वेगळी
पुष्प अन् खाद्य वनस्पती प्रत्येकाची निराळी
करता बारसे यांचे, विचार रुजला भाळी
अशी ठेवली फुलपाखरांची नावे मराठमोळी ।।3।।
मर्द मराठे आम्ही, वृक्षवल्लीचे हो गोंधळी
नीलवंत, विदुला, राजस, अनिता, लिंबाळी
नावे ही गोजिरी वाहिली आपल्या ओंजळी
वापरूया आता फुलपाखरांची नावे मराठमोळी ।।4।।
मंडळी फुलपाखरांना केवळ मराठीतून नामकरण होणे एवढेच चालणार नसून आजच्या महाराष्ट्र दिनी ही फुलपाखरांची मराठी नावे जनमानसात रुजवण्याचा संकल्प आपणा साऱयांनी करायला हवा. कारण फुलपाखरांची ही अत्यंत मौल्यवान ‘इस्टेट’ आपल्याला आपल्या भावी पिढी करता राखून ठेवायची आहे – बरोबर ना?
(लेखक फुलपाखरांचे अभ्यासक व आयटी तज्ञ आहेत.)
प्रचार झाला. हीच नावे जनमानसात रूढ झाली.
आपल्याकडे सर्वसामान्य जनतेला फुलपाखरांविषयी फारशी माहिती नाही, हे वास्तव लक्षात यायला लागलं होतं. फुलपाखरांचं संवर्धन आणि संरक्षण करायचे असेल तर लोकांना या ‘कीटका’विषयी आपलेपणा वाटायला हवा. फुलपाखरांविषयीच्या माहितीचा प्रसार आणि प्रचार करता विविध अंगांनी प्रयत्न होणे गरजेचे होते. त्यापैकी एक प्रयत्न म्हणजे फुलपाखरांना आपल्या भाषेतील मराठमोळी नावे देणे हा होय.
आतापर्यंत म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते अगदी 2019 सालापर्यंत महाराष्ट्रात
हिंदुस्थानच्या पारतंत्र्याच्या काळात महाराष्ट्रात फुलपाखरांच्या प्रजातींबाबत संशोधन झाले आणि त्यानुसार या फुलपाखरांच्या प्रजातींना कमोडोर, सोल्जर, सेलर अशी नावं मिळाली. या फुलपाखरांचं संवर्धन आणि संरक्षण करताना ही नावं आपलीशी वाटत नव्हती. हा आपलेपणा वाटावा याकरिता महाराष्ट्र जैवविविधता मंडळाद्वारे फुलपाखरांना मराठमोळी नावं देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. अशा प्रकारे राज्याच्या भाषेला महत्त्व देत त्यानुसार फुलपाखरांना मराठमोळी नावं देणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य ठरलं आहे.
फुलपाखरांच्या मराठी नामकरणातील काही रंजक उदाहरणे खालीलप्रमाणे –
हवेत मुक्तपणे विहरणाऱया ‘साइक’ या फुलपाखराला ‘मनमौजी’ तर ‘प्लमज्युडी’ या नावाच्या फुलपाखराला ‘पिंगा’ ही नावे त्या त्या फुलपाखरांच्या विहरण्याच्या सवयींना अनुसरून ठेवली आहेत. ग्रासज्वेल या फुलपाखराला ‘रत्नमाला’, जेझबेलला ‘हळदीपुंकू’ ही नावे त्यांच्या दिसण्यावरून दिलेली आहेत. ‘यामफ्लाय’ या पावसाळ्यात दिसणाऱया फुलपाखराला ‘यामिनी’ तर ‘टायगर’ फुलपाखराला ‘रुईकर’ ही नावे त्यांच्या खाद्य वनस्पतीवरून दिलेली आहेत. ग्रास डेमॉनला ‘तृणासूर’ तर रेडस्पॉटला ‘आरक्त बिंदू’ ही नावे भाषांतर म्हणून दिलेली आहेत. लिफब्लूला ‘अनिता’, तर क्युपीडला ‘पांडव’ ही नावे त्यांच्या लॅटीन भाषेतील शास्त्र्ााrय नावांवरून देण्यात आलेली आहेत.





























































