
>> डॉ. अनिल कुलकर्णी, [email protected]
अलीकडे प्रश्नपत्रिका वा तिच्यातील प्रश्न सदोष असतात, पाठय़पुस्तकेही सदोष असतात. प्रश्नासाठी निवडलेल्या पाठय़क्रमातील आशय अपुरा असतो, मर्यादित असतो. याचाच अभ्यास करून विद्यार्थी उत्तीर्ण होतो. मूल्यमापन लेखी परीक्षांपुरतेच मर्यादित असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाच्या विविध पैलूंचे मूल्यमापन आजच्या आपल्या परीक्षा पद्धतीत होत नाही. परिणामी परीक्षा विश्वसनीय राहिलेल्या नाहीत. विद्यार्थ्याच्या उणिवांची चिकित्सा करून त्या दूर करण्याचे प्रयत्न वाढीला लावणे ही गोष्ट परीक्षा पद्धतीतून होऊ शकत नाही. शाळेत सुप्त गुण ओळखून त्यांना विकसित करणारी यंत्रणाच नाही. शाळेला फाटा देऊन अनेकांनी आपले सुप्त गुण विकसित केले आहेत.
परीक्षा ऑनलाइन घ्या किंवा ऑफलाइन घ्या, विद्यार्थ्यांनी त्यात अनेक पळवाटा शोधून काढल्या आहेत. कॉपी करण्याची भ्रष्ट परंपरा वृद्धिंगत होत आहे. कॉपीची वाळवी हळूहळू सर्व जीवन पोखरेल याचीच भीती वाटत आहे. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये परीक्षा योग्य पद्धतीने घेतल्या जातात म्हणून ‘मूल्यमापन’ शब्द अजूनही अस्तित्वात आहे. सगळेच काही भ्रष्ट परीक्षेतून श्रेष्ठ झाले नाहीत. अभ्यासाने, परीक्षेने अनेक जण मोठे यश प्राप्त करू शकले व यशस्वी जीवन जगले. कॉपी न केलेले अनेक जण आपल्या ज्ञानाच्या आधारे जीवनातले अनेक प्रश्न सहजपणे सोडवतात. अध्ययन-अध्यापन यापेक्षाही गंभीर प्रश्न परीक्षा व मूल्यमापन यासंदर्भात निर्माण होत आहेत.
परीक्षा व्यवस्थेतील मूल्यमापनाची विश्वासार्हता कमी होत चालली आहे. मूल्यमापनाचा नवीन आराखडा तयार करावा लागणार आहे. फेरमूल्यांकनाची मागणी वाढतेच आहे. शिकविणारे व शिकणारे यामध्ये समायोजन नाही, नुसते आयोजनच आहे. कागदावरच्या अध्यापनाची परीक्षा कागदावरच होत आहे. माणसाचे यश कागद ठरवत आहे, पण कौशल्ये कागदावर तग धरत नाहीत. लिहून दिलेल्या नोट्स नीट परीक्षेत लिहिल्या जात आहेत. फार थोडे शिकतात, बरेच पाहून लिहिण्याचे अनुकरण करतात. एखादी कृती केल्यानंतर त्या कृती आपण तपासतो, कोणत्याही शैक्षणिक किंवा इतर उपक्रमाचे मूल्यमापन केले जाते. मापन म्हणजे एखाद्या गोष्टीचे संख्यात्मक प्रमाण ठरविणे होय. व्यक्तीच्या संदर्भात मूल्यनिर्धारण व प्रकल्प कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम याच्या संदर्भात ‘मूल्यमापन’ या संज्ञा वापरल्या जातात. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्याचा समावेश होणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणात एखादा घटक शिकविला जातो का? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे शिक्षणाचे ध्येय, त्यातून काय साध्य होईल याचे उत्तर म्हणजे उद्दिष्ट, सर्वच साध्य होईल असे नाही.
शिक्षण हे मानवाने संपादन केलेले एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणता येतात. हे बदल अपेक्षित दिशेने आणि किती झाले आहेत ते मूल्यनिर्धारणेमुळे कळते. मूल्यमापन किंवा मूल्यनिर्धारण हे साधन आहे साध्य नव्हे. मूल्यनिर्धारण हे केवळ संपादनाशी संबंधित नाही, तर सुधारणेशीही निगडित आहे. मूल्यनिर्धारणात निर्णयाची गुणात्मक चिकित्साही असते.
सतत होणाऱया परीक्षा व त्यांची संख्या, त्यांचा निकाल लावणे ही व्यवस्थापनाच्या दृष्टीने समस्या बनली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात शिक्षण, अध्यापन, संवाद, कौशल्य प्रक्रिया याला एक प्रकारचा सेटबॅक मिळाला आहे. शारीरिक हालचालीही सीमित झाल्या. अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या, त्याला मूळ पदावर आणून पुन्हा विसरलेली कौशल्ये विद्यार्थ्यांना आत्मसात करून एका नवीन मूल्यमापनाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.
शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने विद्यार्थ्याच्या वेळोवेळी परीक्षा घेऊन त्यांचे निर्णय लावणे गरजेचे आहे. पूर्वीपेक्षा अधिक परीक्षा घेण्याची प्रथा वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे परीक्षा समस्या बनली आहे. सत्र परीक्षा काही विद्यापीठांत यशस्वी झाली नाही किंवा वारंवार परीक्षेमुळे काही ठिकाणी ती योग्य हाताळता आली नाही. आपली पारंपरिक परीक्षा पद्धतीही विषयाच्या माहितीवरच अधिक भर देते. विद्यार्थ्यांमध्ये योग्य प्रकारची अधिक रुची आणि आपल्या कल्पना इतरांपर्यंत पोचवण्याचे संप्रेषण कौशल्य निर्माण होणे आवश्यक आहे.
अलीकडे प्रश्नपत्रिका वा तिच्यातील प्रश्न सदोष असतात, पाठय़पुस्तकेही सदोष असतात. प्रश्नासाठी निवडलेल्या पाठय़क्रमातील आशय अपुरा असतो, मर्यादित असतो. याचाच अभ्यास करून विद्यार्थी उत्तीर्ण होतो. मूल्यमापन लेखी परीक्षांपुरतेच मर्यादित असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाच्या विविध पैलूंचे मूल्यमापन आजच्या आपल्या परीक्षा पद्धतीत होत नाही. परिणामी परीक्षा विश्वसनीय राहिलेल्या नाहीत. विद्यार्थ्याच्या उणिवांची चिकित्सा करून त्या दूर करण्याचे प्रयत्न वाढीला लावणे ही गोष्ट परीक्षा पद्धतीतून होऊ शकत नाही. शाळेत सुप्त गुण ओळखून त्यांना विकसित करणारी यंत्रणाच नाही. शाळेला फाटा देऊन अशा अनेकांनी आपले सुप्त गुण विकसित केले आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाने 1973 मध्ये पदवी परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी कृती योजना प्रसिद्ध केली होती, त्यात विद्यार्थ्याला अभ्यासाच्या योग्य सवयी घडविण्यास उत्तेजन मिळण्यासाठी अंतर्गत मूल्यनिर्धारण होते. या पद्धतीमुळे अन्य कौशल्य व उद्दिष्टे यांची तपासणी करता येते. सांख्यिकी विश्लेषणातून असे आढळून आले की, जेव्हा परीक्षक उत्तरपत्रिका तपासतो तेव्हा गुणदान करताना पाच टक्क्यांपेक्षा अधिक गुण देण्याची शक्यता 50 टक्के एवढी असते. विद्यार्थ्याला त्याची परीक्षा कशी घेतली जाणार आहे हे कळले पाहिजे, त्यासाठी प्रश्नपेढी आवश्यक आहे. प्रश्न रचनेची समस्या व्यवस्थित विकसित केलेल्या प्रश्नपेढीमुळे सुटू शकेल. चांगली शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या ज्ञानात्मक, भावनात्मक व क्रियात्मक बाजूवर सारखेच भर देत असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक मूल्यमापनाची संकल्पना स्वीकारणे गरजेचे आहे. अभ्यासाबरोबरच जीवनाच्या अनेक क्षेत्रांत सहभागी होण्यासाठीची काळजी सहशालेय कार्यक्रमातून घ्यायला हवी. विशिष्ट ज्ञानक्षेत्रे व त्यातील ज्ञानाचा काही अंश केवळ पाठय़पुस्तक, या पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षणात विचारात घेतला जातो.
जे जे परीक्षेला येणार त्याचाच अभ्यास करण्याची वृत्ती सध्या दिसते आहे. प्रश्नपत्रिका, प्रश्न चुकीचे असतील तर ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील कशा? 50 टक्के प्रश्न उपयोजनावर हवेत, तसे प्रयत्न काही विद्यापीठाने सुरूही केले आहेत. केवळ अभ्यासक्रम सर्वसमावेशक असून चालणार नाही, परीक्षेतील प्रश्नही सर्वसमावेशक असावेत. मागच्या प्रश्नांची पुनरावृत्ती किती दिवस करणार? परीक्षेतील त्रुटी या शिक्षण पद्धतीच्या त्रुटी आहेत. परीक्षा म्हणजे केवळ ‘घोका व ओका’ यापुढे जाऊन ‘पहा व लिहा’ या अवस्थेत आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा यंत्रणेला गुंडाळून ठेवले आहे. कॉपी नियंत्रणासाठी काही ठोस निर्णय दरवर्षी जाहीर होतात, पण ते पुरेसे नाहीत.
विश्वास नसलेली व्यवस्था चालू ठेवणे एवढेच आपल्या हातात आहे. ही अवस्था बदलणार कशी? परीक्षेचे आयोजन, नियोजन याबद्दल शंका नाही, त्या सुरळीत पार पाडल्या जातात, शंका आहे ती उपयोजनाबद्दल. मिळालेल्या ज्ञानाच्या उपयोजनावर प्रश्न कमी असतात. प्राध्यापकांचे प्रश्न तयार करण्यासंबंधीचे प्रशिक्षण, प्रश्नात संदिग्धता नसणे, वैचारिकपणा नसणे, विचारप्रवृत्त करणारे प्रश्न नसणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. या साऱयांचाच विचार करणे आवश्यक ठरणार आहे.


























































