
झोपेत असताना स्ट्रोक येण्याची शक्यता अधिक असते. झोपेतील हा स्ट्रोक तुमच्या मेंदूवर हल्ला करू शकतो. झोपेत लोकांना मोठय़ा संख्येने स्ट्रोक आल्याचे निदान झाले आहे. अशा वेळी झोपेतून जागे झाल्यावर त्यांना बोलता न येणे, हात किंवा पाय हलवता न येणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. रुग्णाला जाग येईपर्यंत स्ट्रोक येऊन गेल्याचे कळतही नाही. स्ट्रोकचे वेळीच निदान करणे आणि वेळ न दवडता त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. या लेखाच्या माध्यमातून स्ट्रोकबद्दल अधिक माहिती घेऊ या. मेंदूतील रक्तवाहिनीतून रक्तस्राव होतो किंवा एखाद्याच्या मेंदूला होणाऱया रक्तपुरवठय़ात अडथळा आल्याने स्ट्रोक येतो. स्ट्रोक कोणत्याही वेळी येऊ शकतो. म्हणजेच एखादी व्यक्ती झोपलेली असतानाही स्ट्रोक येऊ शकतो. झोपताना व्यक्ती सामान्य स्थितीत असते, परंतु उठल्यावर स्ट्रोकची लक्षणे दिसू शकतात. स्ट्रोकची सुरुवात स्पष्ट दिसत नाहीत, पण विलंब न करता रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल केले पाहिजे. उपचार घेण्यासाठी तुम्हाला स्ट्रोकची लक्षणे माहीत असणे आवश्यक आहेत.
लक्षणे कोणती?
समतोल गमावणे, दृष्टी खराब होणे, चेहऱयाचा काही भाग वाकडा होणे, हात कमजोर होणे आणि बोलताना अडखळणे ही स्ट्रोकची लक्षणे आहेत, जी वेळीच ओळखणे आवश्यक आहे. तुमच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीला यापैकी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करा.
कारणे कोणती?
ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया (OSA) आणि इतर स्लीप डिसऑर्डर झोपेच्या दरम्यान स्ट्रोकचा धोका वाढवू शकतात. उच्च कॉलेस्टेरॉल ही आणखी एक चिंतेची बाब आहे. नॉन वेकअप स्ट्रोक असलेल्या रुग्णांपेक्षा वेकअप स्ट्रोक असलेल्यांचे लिपिड प्रोफाईल खराब झालेले असू शकते. शिवाय धूम्रपान हेदेखील स्ट्रोकशी संबंधित आहे. धूम्रपानामुळे इंट्रासेरेब्रल रक्तस्राव होऊ शकतो, जो झोपेच्या दरम्यान एक प्रकारचा स्ट्रोक आहे.
निदान आणि उपचार : एमआरआय करून अंदाजे इस्केमिक स्ट्रोक केव्हा झाला हे शोधता येते. जर फ्लेअर डिफ्युजन जुळत नसेल आणि स्ट्रोक गोल्डन अवरच्या पलीकडे नसेल तर थ्रोम्बोलिसिस (क्लॉट बर्स्टिंग थेरपी) केली जाऊ शकते. स्ट्रोकनंतर लगेच रुग्णाला शारीरिक व स्पीच थेरपीचा सल्ला दिला जातो.
झोपेच्या दरम्यान उद्भवणारे स्ट्रोक उपचार करणे अधिक कठीण आहे. कारण त्याची सुरुवात माहीत नाही. डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे, जे तुम्हाला काय करावे याबद्दल मार्गदर्शन करतील. तातडीचे उपचार करण्यासाठी ‘B.E.F.A.S.T’ (बीफास्ट) या संक्षिप्त शब्दाप्रमाणे अॅक्शन घेतली तर फायदेशीर ठरेल. ‘B.E.F.A.S.T’ याचा अर्थ बॅलेन्स-संतुलन कमी होणे, आइज-दृष्टी धूसर होणे किंवा कमी होणे, फेस-चेहऱयाचा काही भाग क्षीण होणे, आर्म-हात कमकुवत होणे, स्पीच-बोलण्यात अडचणी आणि टाइम-वेळ.
डॉ. शिरीष एम. हस्तक
(लेखक ग्लोबल हॉस्पिटल, परळ येथे न्यूरोलॉजी, स्ट्रोक आणि न्यूरोक्रिटिकल केअरचे प्रादेशिक संचालक आहेत)



























































