अवघड जगणं अन् पराकोटीची वेदना

322

>> डॉ. ज्योती धर्माधिकारी

आपण ग्लोबल झालोत, आपल्या हातात स्मार्टफोन आले. युरोप, आफ्रिका, स्वीडनमध्ये काय सुरू आहे, तिथल्या लोकांचे जीवन कसे आहे, हे आपल्याला समजते. पण आपल्या समाजातील काही घटक नेमकं कसं जीवन जगत आहेत याची जाणीव किती लोकांना आहे. समाजातील विषम दरीत होरपळणाऱया ऊस तोडणी करणाऱया अगतिक शेतमजुरांचे जीवन जवळून अनुभवताना प्रचंड अस्वस्थता येते. जीवघेण्या अंधाऱया रात्रीतून प्रवास करत दिवस उजाडायची प्रतीक्षा असणारा हा घटक. ऊसतोडणी कामगारांच्या उद्ध्वस्ततेचा आलेख मांडणारा हा प्रवास.

बीड जिल्ह्यातले एक गाव. गावामध्ये सगळे म्हातारे मागे राहतात. कोणी आजारी आहे, दवाखान्यात न्यायला एकही तरुण नाही. एक म्हातारी मरते तिचा मुलगा सून कुठेतरी दूर गेलेले. म्हाताऱयांच्या अंगात तिचे क्रियाकर्म करण्याइतकंही बळ नाही. कुठे जातात हे सगळे तरुण आपल्या जिवलग आईबापांना सोडून, आपल्या शाळकरी मुलांना मागे ठेवून कुठे जातात सगळे तरुण?

या गावाची गोष्ट सांगत आहेत दिग्दर्शक राजकुमार तांगडे त्यांच्या ‘चिवटी’ चित्रपटामध्ये. माजी आमदार डॉ. नारायणराव मुंढे यांच्या ‘मागे फिरा पतंगानो’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाचे लेखक-पटकथाकार-दिग्दर्शक स्वतः राजकुमार तांगडे आहेत. आतडय़ांना पीळ पाडणाऱया घटनाक्रमाचे शिकार ठरलेले सगळे शेतमजूर जात आहेत ऊसतोडीला. बीड जिल्हा आणि परिसरातील अनेक गावांमध्ये ऊसतोड कामगार राहतात. वर्षभराची मिळकत जमा करण्याचा तो एकच एक हंगाम. मराठवाडय़ाच्या हृदयाच्या ठिकाणी असलेल्या बीड जिह्यातल्या हजारो शेतमजुरांची कहाणी अत्यंत हृदयद्रावक आहे. या शेतमजुरांचे जीवन म्हणजे जीवघेण्याप्रसंगांची उतरंड आहे. विषय खूप मोठा आणि खूप गहन आहे. पण महाराष्ट्रातल्या किती लोकांना ऊसतोड कामगारांच्या समस्या माहिती आहेत?

आपण ग्लोबल झालोत, आपल्या हातात स्मार्टफोन आले. युरोप, आफ्रिका, स्विडनमध्ये काय सुरू आहे, तिथल्या लोकांचे जीवन कसे आहे, हे आपल्याला समजते. पण आपल्या बुडाखाली काय जळतंय याची जाणीव किती लोकांना आहे आणि ते जीवन प्रत्यक्ष जगत आहेत, त्या अगतिक शेतमजुरांचे जीवन जवळून पाहत आहेत ते प्रचंड अस्वस्थ आहेत. ते एका जीवघेण्या अंधाऱया रात्रीतून प्रवास करत आहेत दिवस उजाडायची त्यांना प्रतीक्षा आहे. तो दिवस उजाडेल का नाही याचे उत्तर दिग्दर्शक देत नाहीत. ते उत्तर समाजाला शोधायचेत, राजकारणाला शोधायचे आहेत.

ऊसतोडीचा हंगाम आला की, मुकादमाला भाव येतो, राजाच होतो तो काही दिवसांपुरता. एखाद्या गावातला एखादा कम्युनिस्ट विचारांचा भारतसारखा (अभिनेता संभाजी तांगडे) कार्यकर्ता शेतमजुरांना एकत्र ठेवायचा प्रयत्न करत राहतो. मजुरी वाढण्याचे आश्वासन देत राहतो, दिलासा देत राहतो. एकीकडे अभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा ऊसतोड कामगारांना चाळीस टक्के भाववाढ मिळालीच पाहिजे म्हणून आंदोलन करत राहतो. आणि त्या आंदोलनाच्या परिणामांची वाटही न बघता ऊसतोड कामगार आपापले कोयते आणि हातावर पोट घेऊन निघतात. निर्णय होत नाही, कारण अभिमानी शेतकरी संघटना माघार घ्यायला तयार नाही आणि तोपर्यंत ऊसतोड सुरू होणार नाही. त्रिशंकू अवस्थेमध्ये विसी-तिशी-पन्नाशींचे शेतमजूर गावकुसाबाहेर उघडय़ावर छोटय़ा छोटय़ा झोपडय़ांमधून डेरा देऊन बसतात. ती निरर्थक बसून राहण्याची तगमग चित्रपटातला प्रत्येक पात्र अत्यंत परिणामकारक व्यक्त करतो. वडगाव नावाच्या छोटय़ाशा गावातल्या घराघरातून काही विशीचे कोवळे तरुण, काही नवदाम्पत्य, काही मरणासन्न आईला मागे ठेवून जाणारे दाम्पत्य असे सगळे उरावर धोंडा ठेवून मुकादमाच्या ट्रकमध्ये बसून ऊसतोडीला जातात. गावात वाघ असणारे त्यातले अनेक नोंदणी करताना मात्र अत्यंत लाचार होताना दिसतात. या चित्रपटाची भक्कम बाजू म्हणजे ऊसतोड महिला शेतमजूर. या स्त्रियांचे जीवन अनेक गंभीर प्रसंगांना तोंड देत राहते. मग ते उघडय़ावर आंघोळ करण्याचा विषय असेल, एखाद्या डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱया कोवळ्या मुलीला उचलून न्यायचा प्रयत्न असेल, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मुसक्या बांधून बलात्कार करण्याचा प्रसंग असेल, हे सगळे प्रसंग दिग्दर्शकांनी अतिशय संवेदनशीलतेने आणि परिणामकारक साधली आहे. या चित्रीकरणाचा कळस बिंदू म्हणजे तीन महिन्यांच्या गरोदर बाईचं लेकरू अतिकष्टाने पडतं. डॉक्टर सांगतात, उचलू नको तर नवरा म्हणतो पडलं तर पडू दे आपल्याला कुठे विकत आणायचेय ही कमालीची असंवेदनशीलता म्हणावी एका हलाखीला आलेल्या शेतमजुराची अगतिकता? या प्रसंगाचे चित्रीकरण अगदी थेट आहे कुठलेही आड पडदे न ठेवता दिग्दर्शक सरळसोट प्रेक्षकांच्या मेंदूमध्ये एक बाण खुपसतो. इथे लक्ष वेधून घेते ती सुंदराची भूमिका करणारी अश्विनी भालेकर. गावातल्या सगळ्या बायकांना एकत्र करून पिण्याच्या पाण्यासाठी भांडणारी ही नवदुर्गा ऊसतोडीला जाते, मात्र परिस्थितीला शिव्याशाप देत का होईना शरण जाते. तेव्हा कासावीस झाल्याशिवाय राहत नाही.

काही अत्यंत परिणामकारक वाक्य चित्रपटामध्ये आहेत. एक स्त्राr आपले कोवळे अंग झाकू पाहणाऱया एका नवथर मुलीला म्हणते, ‘‘उघडे अंग पाहिलं की, अंगाला फोड येत नाहीत, दिसू दे दिसत असेल तर…पाठ झाकायला जाशील तर पोट उघडं पडेल.’’ किंवा आजारी वडिलांच्या ऐवजी कामावर जायची विनवणी करणाऱया एका विशीच्या तरुणाला भारत म्हणतो, ‘‘पोटाला कुठे काय असतं? ना उंची… न जात, ना धर्म’’, असे कितीतरी प्रेक्षकांना थेट भिडणारे अंतर्मूख करणारे संवाद चित्रपटामध्ये परिणामकारकपणे पेरले आहे.

ही कथा कोणा एका व्यक्तीची नाही, एका जातीची नाही, एका समाजाची नाही. ही समस्या आहे मराठवाडय़ातल्या हजारो हजार ऊसतोड कामगारांची. या प्रश्नांचे चोख उत्तर कारखानदार शोधताहेत. त्यांनी आधुनिक यंत्रणा आणली, त्यावेळी या हजारो ऊसतोड कामगारांच्या जीवनात पुढे काय? हे प्रश्नांकित वाक्य आहे.

चित्रपटातल्या हळव्या प्रसंगांचं परिणामकारक चित्रीकरण करण्यासाठी संगीताची बेजोड साथ दिग्दर्शकाने घेतली आहे. संगीत या प्रभावी माध्यमाचा दिग्दर्शक राजकुमार तांगडे अत्यंत चपखल उपयोग करतात. चित्रपटाची भक्कम कथावस्तू ही जमेची बाजू. अश्विनी भालेकरच्या रूपात एका दमदार कलाकाराचा जन्म झाला.

मराठवाडय़ातील एका मोठय़ा शेतमजूर समूहाचं चित्रीकरण करताना चित्रपट अनेक प्रश्नांचे मोहोळ प्रेक्षकांच्या मनात उठवून देतो हेच या चित्रपटाचं मोठे यश म्हणावे लागेल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या