सरत्या वर्षाचा जमाखर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॅा. विजय पांढरीपांडे

नव्या वर्षाचं स्वागत करताना सरणाऱ्या वर्षाबद्दलची हुरहूर दाटून येते आणि सरलेल्या काळाचा लेखाजोखा नकळत मांडला जातो. आपण ‘एकला चलो रे’ची भूमिका कितीही निभावत असलो तरी त्यात आजूबाजूचा समाज, प्रांत, देश यांचा कार्यकारण भाव कायमच अंतर्भूत असतो.

जुन्या वर्षाला निरोप देताना, नव्या वर्षाचे स्वागत करताना जमाखर्चाचा हिशेब मांडावा असे म्हणतात. म्हणजे आपण कमावले काय, गमावले काय याचे चिंतन करायचे. आपणच असे प्रश्न विचारायचे. त्या प्रश्नांचे उत्तर शोधायचे. त्यानुसार आपले आपणच सुधारायचे. समजायला लागले की, आपणच आपली उत्तरं शोधायची असतात. कारण आपल्या प्रश्नांची उत्तरं दुसऱ्या जवळ नसतात. त्यांच्या जवळ अनुभव असतो. थोडेफार ज्ञानही असतेच, पण ते सगळे जसेच्या तसे आपल्याला उपयोगी पडेलच असे नाही. कारण परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळे आयुष्य, वेगवेगळे भविष्य दिले आहे. एक दुसऱ्यासारखा नसतो. आपले वर्तमान, आपले भविष्य हे कुणाशीही मिळते जुळते नसते. त्यामुळे आपणच आपला मार्ग शोधावा हे बरे. या प्रक्रियेमुळे सगळी जबाबदारी आपली आपल्यावरच येते. आपण दुसऱयाला विचारले, दुसऱयाचे ऐकले की, पुढे जे काही बरेवाईट घडेल त्याची जबाबदारी आपण दुसऱ्यावर ढकलून मोकळे होतो. हे काही खरे नाही. आपल्या कृतीसाठी, आपल्या निर्णयासाठी, त्यांच्या संभाव्य परिणांमासाठी आपणच जबाबदार असले पाहिजे.

हा जमाखर्च लिहिताना एक भान ठेवणे गरजेचे. केवळ आपण आपलाच, एकटय़ाचाच विचार करून चालणार नाही. ज्या समाजात आपण राहतो, ज्या प्रांतात- देशात आपण राहतो, त्याचाच आपण एक अंश असतो. अविभाज्य भाग असतो. त्यामुळे आपले आयुष्य, आपले भविष्य, आपले वर्तमान हे अवतीभवतीच्या परिस्थितीवर, सामाजिक, आर्थिक व्यवस्थेवर अवलंबून असते. ही अवतीभवतीची परिस्थितीच आपल्याला घडवीत असते. म्हणजे आपण जे म्हणतो की, योग्यता असूनही यश मिळत नाही, आपल्या कर्तृत्वाची कदर केली जात नाही, गुणवत्तेला वाव मिळत नाही, झालेच तर नशीब साथ देत नाही. या सगळय़ा तक्रारीमागे आपल्या अवतीभवतीच्या आसमंताचा कार्यकारण भाव कारणीभूत असतो.
याचा अर्थ असा की, अवतीभवतीचे वातावरण स्वच्छ राहिले तर आपणही निरोगी असू. अवतीभवतीची मंडळी सचोटीची, प्रामाणिक असती तर आपणही तसे प्रयत्न करू. अवतीभवती गुणवत्तेसाठी स्पर्धा, धडपड सुरू असेल तर आपणही त्या धडपडीच्या जत्रेत सामील होऊ…

पण अवतीभवतीचे वातावरण असे प्रोत्साही,  पोषक, गुणवर्धक आहे का?हा खरा प्रश्न आहे.
आज फक्त वातावरणातच प्रदूषण नाही. ते समाजमनातदेखील आहे. आपल्याला नियंत्रित (गव्हर्न) करणाऱ्या सरकारातदेखील आहे. या सरकारला नियंत्रित करणाऱया राजकारणातदेखील आहे. या वेगवेगळय़ा प्रदूषणांचा आपल्यावर, स्वास्थ्यावर (शारीरिकच नव्हे, मानसिकदेखील) परिणाम होणं स्वाभाविक आहे.

एकदोन उदाहरणानी हे स्पष्ट करता येईल. आजकाल महापुरुषांच्या पुतळय़ाच्या उंचीची नको तितकी चर्चा चालली आहे. गुजरातमध्ये सरदार पटेलांच्या पुतळय़ाने जागतिक उंचीचा विक्रम केल्याबरोबर मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीवरून वाद सुरू होतो. आंध्र प्रदेशचे विधान भवन हे सरदार पटेलांच्या पुतळय़ाच्या उंचीपेक्षा वरचढ असणार अशाही  बातम्या येतात. जे पुतळय़ांचे तेच स्मारकांचे. कुणाचेही स्मारक छोटे असून चालत नाही. ते भव्य नव्हे, अति भव्यच हवे. या पुतळय़ांपासून, या स्मारकांमुळे भावी पिढीला प्रेरणा मिळेल असा दावा केला जातो. आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व  अन् स्वातंत्र्योत्तर काळातील ऐतिहासिक, राजकीय पुढाऱयांचे लाखो पुतळे निश्चितच असतील, पण या पुतळय़ांच्या ‘दर्शना’ने किती युवकांनी प्रेरणा घेतली, त्या त्या पुढाऱयाचा आदर्श समोर ठेवून किती जणांनी भवितव्याची वाटचाल केली, त्यांच्या सारखे योगदान दिले हा सारा संशोधनाचा विषय!

प्रेरणा ही पुतळय़ांच्या दर्शनाने किंवा स्मारकांना भेटी दिल्याने मिळत नाही. त्या त्या क्षणांपुरते आपण मोहित, प्रभावित होतो हे खरे, पण हा प्रभाव तेवढय़ापुरताच (दर्शनाच्या कालावधीपुरताच) मर्यादित असतो. प्रेरणा मिळाली असे केव्हा समजायचे? त्या त्या महान व्यक्तीचे विचार आपण आचरणात आणले तरच. ते विचार, ते तत्त्वज्ञान आजच्या वर्तमानाच्या सामाजिक संदर्भात कसे आत्मसात करता येतील, कसे पुढे नेता येतील याचा विचार केला, त्यावर चिंतन, मनन, अध्ययन केले तरच! त्यासाठी शिवचरित्र वाचावे लागेल. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र लिखाणाचे खंड वाचावे लागतील. त्यासाठी महात्मा गांधीचे ‘सत्याचे प्रयोग’ समजून घ्यावे लागतील, सावरकरांचे ‘काळे पाणी’, ‘माझी जन्मठेप’, नेहरूंचे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’… असे बरेच काही खोलात जाऊन वाचावे, अभ्यासावे लागेल (दिलेली यादी प्रातिनिधिक, अपुरी आहे हे ध्यानात घ्यावे). आपण आपल्या भविष्याच्या प्रवासाचे नियोजन करताना या सर्व ऐतिहासिक, राजकीय पुढाऱयांचे जीवन, त्यांचा खडतर प्रवास, त्यांना आलेल्या अडचणी, त्यांना पडलेले प्रश्न, त्यांनी शोधलेली उत्तरं, त्यांची वैचारिक जडणघडण, विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम हे सगळे सगळे अभ्यासावे लागेल. प्रेरणा या अभ्यासातून, चिंतन, मननातून, खडतर परिश्रमातून मिळेल.

देशाची उंची जास्त महत्त्वाची. ती उंची तुमच्या आमच्या चारित्र्याच्या, बुद्धिमत्तेच्या उंचीवर अवलंबून असणार. पुतळे किती उंच आहेत किंवा स्मारके किती भव्य आहेत यावर नव्हे. आपल्याला जागतिक स्पर्धेला तोंड द्यायचे आहे. समाजाला भेडसावणारे कितीतरी प्रश्न आहेत. आपल्याच अवतीभवती विखुरलेले. शेतकऱयांचे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न, पाण्याच्या नियोजनाचे प्रश्न, स्वच्छ इंधनाचे प्रश्न, शिक्षण-आरोग्याचे प्रश्न… अवतीभवती समस्यांची रांगच रांग  आहे. आपण म्हणा, सरकार म्हणा, वैयक्तिक, सामाजिक विकासाच्या कितीही गप्पा मारल्या तरी सत्य वेगळेच आहे. कारण एकीकडे आपण खूप विकास झाला, प्रगतीची घोडदौड चालली असे म्हणतो अन् दुसरीकडे समाजात मागासलेल्या वर्गांची संख्या वाढतेच आहे असे सर्वेक्षण करतो. आपल्याकडे आरक्षण हे सामाजिक, आर्थिक मागासलेपणाशी संबंधित आहे. पूर्वी ही संख्या 50 टक्क्यांपर्यंत मर्यादित होती. आता प्रत्येक ‘वर्ग’ मागासलेपणाचा दावा करतोय. त्यामुळे ही टक्केवारी साठ-सत्तरपर्यंत पोहोचतेय. ज्या देशात साठ-सत्तर टक्के जनता आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा मागासलेली आहे त्या देशाला ‘प्रगत’ कसे म्हणायचे? विकास झाला असे कसे म्हणायचे? हे गणित आपण नीट समजून घेतले पाहिजे.

नववर्षाच्या निमित्ताने जमाखर्चाचे हिशेब करताना व्यक्तिगत विचार न करता ज्या समाजाचे आपण एक अंग आहोत त्या समाजाचा, देशाचाही विचार करणे अगत्याचे आहे. थेंब थेंब पावसानेच नद्या, तलाव, समुद्र प्रवाहित होतात. प्रत्येक थेंबाला सारखेच महत्त्व असते. केवळ शहरे स्मार्ट झाल्याने देश ‘स्मार्ट’ होत नाही. खेडय़ांचे, छोटय़ा-मोठय़ा गावांचेही तितकेच महत्त्व आहे. किंबहुना, जास्त महत्त्व आहे. ज्यांच्या जवळ आधीच भरपूर आहे त्यांना आणखी मिळत गेले तर तो विकास नव्हे. ज्यांच्याजवळ काहीही नाही त्यांना थोडेफार मिळाले, त्यांचे प्रश्न सुटले ते वाहत्या प्रवाहात सामील झाले तर तो खरा विकास.
त्या विकासाच्या जमाखर्चासाठी फक्त सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. आपल्याला, प्रत्येकाला अंकमोड करावी लागेल. त्यासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवसासारखा दुसरा चांगला मुहूर्त नाही. चला… कामाला लागूया… आजच… आत्ताच…

[email protected]