पश्चिमरंग – बर्लिओझची सिम्फनी

>> दुष्यंत पाटील

हृदयातल्या प्रेमाच्या भावनांना कुठेतरी व्यक्त करताना बर्लिओझने आपल्या कथेशी काहीशी समांतर कथा सांगणाऱया एका सिम्फनीची रचना केली. या सिम्फनीचे नाव होते ‘सिम्फनी फँटॅस्टिक’. बर्लिओझची ही सिम्फनी पाश्चात्त्य संगीताच्या इतिहासात अजरामर झाली.

एका इंग्रज नाटक कंपनीच्या एक नाटकाचे प्रयोग 1827 मध्ये पॅरिसमध्ये चालू होते. शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ या जगप्रसिद्ध नाटकाचे प्रयोग हे कंपनी इथे सादर करत होती. हे प्रयोग इंग्रजीमधून चालू होते. हे नाटक पाहायला एक फ्रेंच तरुण आला होता. त्याचे वय अवघे तेवीस होते. त्याला इंग्रजी भाषेतले काहीही कळत नव्हते, पण तरीही शेक्सपिअरचे नाटक पाहायची त्याची इच्छा होती. हे नाटक त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे ठरणार होते.

या नाटकातले ऑफेलिया हे महत्त्वाचे पात्र हॅरिएट स्मिथसन या आयरिश अभिनेत्रीने रंगवले होते. तिची भूमिका पाहून तो तरुण तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला! तिचे रूप, तिचा अभिनय, तिची प्रतिभा पाहून तो जवळपास वेडाच झाला! त्या तरुणाने तिच्यापर्यंत पोहोचण्याचे बरेच प्रयत्न केले. त्याने तिला फुले पाठवून पाहिली, तिला अनेक पत्रे लिहून पाहिली (या काळात त्याने इंग्रजी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला). तिला पाहता यावे म्हणून त्याने ती राहत होती, त्या ठिकाणापासून जवळच एक खोली भाडय़ाने घेतली. या साऱयाचा परिणाम व्हायचा तोच झाला. हॅरिएटला तो तरुण वेडपट वाटला. तिने त्याला कुठल्याही पत्राचे उत्तर दिले नाही. तिने त्याच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आणि एकतर्फी प्रेमात तो तरुण तडफडत राहिला. या तरुणाचे नाव होते हेक्टर बर्लिओझ आणि तो एक संगीतकार होता.

हॅरिएट स्मिथसन

बर्लिओझ तिच्या प्रेमात वेडा झाला होता. हृदयातल्या प्रेमाच्या भावनांना कुठेतरी व्यक्त होणे गरजेचे होते. बर्लिओझने आपल्या कथेशी काहीशी समांतर कथा सांगणाऱया एका सिम्फनीची रचना केली. या सिम्फनीचे नाव होते ‘सिम्फनी फँटॅस्टिक’.  1930 मध्ये हॅरिएट पॅरिसमध्ये येणार होती, त्याच वेळी बर्लिओझने ही सिम्फनी लोकांसमोर पहिल्यांदाच सादर करायचे ठरवले. त्याने ती सिम्फनी सादरही केली. आपली सिम्फनी ऐकायला हॅरिएट येईल असे त्याला वाटले होते, पण प्रत्यक्षात ती आलीच नाही.

पुढे 1932 मध्ये हॅरिएटच्या लक्षात हा सगळा प्रकार आला. ही सिम्फनी आपल्याशी संबंधित आहे, हे समजल्यानंतर ती त्याला भेटायला तयार झाली! त्यानंतर ती त्याच्या संगीताने चांगलीच प्रभावित झाली. ते दोघे एकमेकांना वरचेवर भेटू लागले. शेवटी त्यांनी लग्नही केले (आणि पुढे काही वर्षांनी ते विभक्तही झाले, ही गोष्ट वेगळी).

बर्लिओझच्या या सिम्फनीत त्याने एक कहाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय. बर्लिओझने या सिम्फनीमध्ये एका कलाकाराच्या आयुष्यातले प्रकरण (an episode in artist’s life) दाखवण्याचा प्रयत्न केलाय.

या सिम्फनीची खासीयत म्हणजे यात एक थीम पुनःपुन्हा येते. ही थीम कलाकाराच्या जीवनातली आपल्या प्रेमिकेची अनावर ओढ आणि (तिच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने झालेली) निराशा दाखवते. या सिम्फनीत एकूण पाच मूव्हमेंट्स आहेत. पहिल्या मूव्हमेंटमध्ये कलाकाराचे प्रेम आणि निराशा दाखवली आहे. व्हायोलिन आणि बासरीवर प्रेमाची सुंदर मेलडी ऐकू येते तर वाद्यवृंदातली इतर वाद्ये एक प्रकारे निराशा दर्शवतात. दुसऱया मूव्हमेंटमध्ये बॉलरूममधले नृत्याचे दृश्य दाखवलेय. यात दोन हार्प्स (एक प्रकारचे वाद्य) नृत्याचे संगीत देतात तर नृत्य चालू असताना प्रेमिकेला शोधणारा, तिला चोरून पाहणारा कलाकार संगीतामध्ये येतो. तिसऱया मूव्हमेंटमध्ये निसर्गरम्य ठिकाणचे दृश्य दाखवले गेले.

आपली प्रेमिका आपल्याला मिळणार नाही याची चौथ्या मूव्हमेंटमध्ये कलाकाराला खात्री पटते. निराशेमुळे, वैफल्यामुळे तो अफूचे सेवन करतो. त्याला झोप लागून भयानक स्वप्ने पडतात. एका स्वप्नात त्याच्याकडून प्रेमिकेचा खून होऊन त्याला मृत्युदंडाची शिक्षा होते. पाचव्या मूव्हमेंटमध्ये कलाकाराची अंत्ययात्रा आणि त्या अंत्ययात्रेत जमलेले राक्षस दाखवले आहेत. गंमत म्हणजे आता प्रेमिका पुन्हा एकदा येते, पण चेटकीण बनून. तिच्या थीम संगीतात या ठिकाणी खूप कल्पकतेने बदल केलेले आहेत.

बर्लिओझची ही सिम्फनी पाश्चात्त्य संगीताच्या इतिहासात अजरामर झाली. संगीताच्या माध्यमातून बर्लिओझने एका कलाकाराची कथा कशी सांगितली आहे, हे पाहण्यासाठी आपल्याला ही सिम्फनी एकदा यूटय़ूबवर एकदा ऐकायलाच हवी!

[email protected]