दखल – शिक्षणाच्या पाऊलखुणा

>> एकनाथ आव्हाड

नगर जिह्यातील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल, शेवगाव येथील सहशिक्षक उमेश घेवरीकर हे एक उपक्रमशील शिक्षक, लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. त्यांचा नुकताच ‘शिक्षणाच्या कविता’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. यातील सर्वच कविता या शिक्षण प्रवाहाशी निगडित आहेत. शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाज, पुस्तके, आजची शिक्षण प्रकिया या सर्वांकडेच एक संवेदनशील शिक्षक कवी कशा पद्धतीने पाहतो यावरचे कवीचे मनन, चिंतन या सर्वच कवितांतून प्रकटते. विद्यार्थी केंद्रिभूत मानून त्याच्या भावजीवनावर परिणाम करणाऱया घटकांचा कवितेच्या अंगाने मांडलेला विचार इथे महत्त्वाचा वाटतो. कवितेतून कवीच्या मनातील शिक्षणविषयक विचार वाचताना ते विचार नकळतपणे आपल्या हृदयापर्यंत झिरपत जातात.

शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर जाणीवपूर्वक लेखन करता करता उमेश घेवरीकर यांनी शिक्षण प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहायला लावले आहे. या पुस्तकातील कविता वाचताना या कवितांतील आशय कधी आपल्याला आतून हादरवून टाकतो. अनेकानेक शिक्षकांच्या शिक्षणाविषयीच्या भावभावनांचे हे पुस्तक प्रतिनिधित्व करते. शिक्षण हे साधन आहे, साध्य नाही हे सांगून उत्तम माणूस त्यातून घडावा हेच शिक्षणाचे खरे ध्येय असावे हीच गोष्ट प्रभावीपणे आणि प्रकर्षाने पुढे आणते. हेच या पुस्तकाचे खरे यश होय!

शिक्षणाच्या कविता                                                                                                            कवी : उमेश घेवरीकर
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठे : 44 , किंमत : 80/- रुपये