
सध्याच्या काळात शास्त्रीय आणि सुगम संगीत, वादन आणि नृत्य या सर्व कलांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, त्यात शतकपूर्तीकडे वाटचाल करणारी एक संस्था म्हणून दक्षिण मुंबईतील ‘देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ या संस्थेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्युझिक या संस्थेची स्थापना 1 जुलै 1925 या दिवशी झाली. त्यामागे पण एक किस्सा आहे. 1924च्या अखेरीस पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हे मुंबईला आले होते. माधवबाग मंदिरात आपल्या शिष्यांसमवेत त्यांनी कीर्तन सप्ताह केला होता. दरम्यान, गांधर्व महाविद्यालयाच्या इमारतीचा लिलाव झाला होता आणि त्यामुळे संगीत प्रसाराचे कार्य थांबल्याची खंत पंडित पलुस्करांच्या मनात होती. त्यांचे शिष्य असणारे प्राध्यापक बी. आर. देवधर पंडितजींना भेटायला गेले तेव्हा पंडितजींनी त्यांना सांगितले की, तुम्ही सर्व शिष्य मिळून संगीत प्रसाराचे कार्य सुरू करा, अडचणींचा विचार करू नका. चांगल्या कार्याला मदत मिळेलच. यातूनच प्राध्यापक देवधरांना सांगीतिक कार्याची प्रेरणा मिळाली.
सेंट कोलंबा हायस्कूलमध्ये प्राध्यापक देवधर 1925 साली संगीत शिकवू लागले. त्याच शाळेतील प्राध्यापक कोरे यांनी देवधरांना प्रार्थना समाजातील मुलामुलींना अभंग आणि गीते शिकवण्याची जबाबदारी दिली. ही गीते इतकी लोकप्रिय झाली की, दर रविवारी शंभर जण प्रार्थनेच्या वेळी एकत्र जमू लागले. राममोहन हायस्कूलमधील तीन खोल्यांचे रूपांतर व्यापक क्लासमध्ये झाले तेव्हा ‘स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ असे त्याचे नामकरण होऊन 1 जुलै 1925 रोजी ते सुरू झाले. हे नाव प्रसिद्ध कवयित्री आणि स्वातंत्र्यसंग्रामात ज्यांचे महत्त्वाचे योगदान आहे, त्या सरोजिनी नायडू यांनी सुचवले होते. 13 नोव्हेंबर 1925 रोजी पंडितजींच्या हस्ते विद्यालयाचा औपचारिक उद्घाटन सोहळा झाला. 1939 मध्ये ऑपेरा हाऊस आणि फ्रेंच ब्रिजच्या कोपऱयावर असणाऱया मोदी चेंबर्समध्ये विद्यालयाचे स्थलांतर झाले.
संगीत कलेचा प्रसार करणारे आदर्श गुरू म्हणून प्राध्यापक देवधरांची ख्याती सर्वश्रुत झाली. सामाजिक बांधीलकी जपण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने भोजन, निवास, कपडे यांची सोय करून संगीत शिक्षण देणे हे कार्य त्यांनी सुरू ठेवले. 1958 मध्ये ‘देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्युझिक’ या विद्यालयाचे पब्लिक ट्रस्ट कायद्याखाली रजिस्ट्रेशन होऊन नवीन संस्थेची घटना तयार करण्यात आली. आज या संस्थेद्वारे गायन, वादन आणि नृत्य या कलांचे प्रशिक्षण दिले जाते.
शास्त्रीय संगीत, सुगम संगीत याचबरोबर तबला, हार्मोनियम, मेंडोलिन, व्हायोलिन, सतार, गिटार, कीबोर्ड वादन प्रशिक्षण तसेच कथ्थक आणि भरतनाटय़म या नृत्यकलादेखील येथे शिकवल्या जातात. विद्यार्थी गांधर्व महाविद्यालयाच्या प्रवेशिका प्रथम ते विशारद अशा परीक्षांना बसू शकतात. विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर कार्यशाळा होतात. संस्थेचे www.deodharmusicschool.com हे संकेतस्थळ उपलब्ध आहे.
मदनमोहन रुईया, सिनेतारका देविकाराणी, बाबुकाका ऊर्फ सी. पी. रेळे, निर्मला गोगटे, कांचनमाला शिरोडकर, भानकर भगिनी, श्याम गोगटे, पंढरीनाथ कोल्हापुरे, निळपंठबुवा अभ्यंकर, रतिलाल भावसार आदी मान्यवरांनी या विद्यालयात प्रशिक्षण घेतले आहे. पंडित कुमार गंधर्व यांच्या सांगीतिक शिक्षणाचा पाया आणि सांगीतिक विकास याच विद्यालयात झाला.
गणेश आचवल



























































