
>> गौरी मांजरेकर
ख्रिसमस हा सण जगभरात मोठय़ा उत्साहाने आणि आनंदात साजरा केला जातो. हा सण जगभर साजरा होत असला तरी प्रत्येक देशाने स्वतःची आगळीवेगळी संस्कृती आणि समृद्ध परंपरा यांच्यासोबत आपल्या खास ढंगात व जोशात उत्सवाचा जिवंतपणा जपला आहे. भारत हा विविध संस्कृतींचा आणि सणांचा देश आहे. विशेषतः गोवा, केरळ, मुंबई आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ख्रिसमस मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो.
ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला चर्चमध्ये मध्यरात्रीची प्रार्थना आयोजित केली जाते, ज्यात ख्रिस्ती बांधव मोठय़ा संख्येने सहभागी होतात. ख्रिसमस ट्री सजवण्यासोबतच अनेक ठिकाणी केळीच्या किंवा आंब्याच्या झाडांना सजवण्याची प्रथा आहे, जी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानाशी जुळणारी आहे. ख्रिसमससाठी प्लम केक, फ्रूट केक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज बनवल्या जातात. दक्षिण भारतात काही ठिकाणी ‘पायसम’ हा गोड पदार्थ बनवला जातो.
अमेरिका
अमेरिकेतील ख्रिसमस म्हणजे भव्यता, रोषणाई आणि सांताक्लॉजचा अमाप उत्साह. अमेरिकेतील घरे ख्रिसमसच्या काळात दिव्यांच्या रोषणाईने आणि मोठय़ा फुग्यांनी सजवलेली असतात. लहान मुले 24 डिसेंबरच्या रात्री चिमणीजवळ किंवा पलंगाजवळ भेटवस्तू मिळण्यासाठी खास मोजे टांगून ठेवतात. सांताक्लॉज रात्री येऊन त्यात कँडी आणि भेटवस्तू भरून जातो, अशी त्यांची श्रद्धा असते. ख्रिसमसच्या काळात युल लॉग जाळण्याची परंपरा आहे, जी जुन्या युरोपीय परंपरांशी जोडलेली आहे आणि जी घरात चांगले नशीब आणते असे मानले जाते. न्यूयॉर्क शहरातील ‘रॉकफेलर सेंटर’ येथील भव्य ख्रिसमस ट्री जगभरात प्रसिद्ध आहे आणि तो ख्रिसमसचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
जर्मनी
ख्रिसमस ट्रीची परंपरा 16व्या शतकात जर्मनीमध्ये सुरू झाली असे मानले जाते, ज्यामुळे या देशाला विशेष महत्त्व आहे. इथे ‘फर’ किंवा ‘पाइन’ वृक्षांना दिवे आणि सजावटीच्या वस्तूंनी सजवले जाते. 6 डिसेंबरला ‘सेंट निकोलस डे’ साजरा केला जातो. या दिवशी जी मुले वर्षभर चांगली वागलेली असतात, त्यांच्या बुटांमध्ये सांता (संत निकोलस) येऊन कँडी आणि छोटी भेटवस्तू ठेवतो,अशी श्रद्धा आहे. जर्मनीमधील ख्रिसमस मार्केट्स जगभर प्रसिद्ध आहेत. या मार्केट्समध्ये पारंपरिक हस्तकला, खाद्य पदार्थ आणि ‘ग्लू वाइन’ (मसालेदार गरम वाईन) मिळते, ज्यामुळे एक खास उत्सवी वातावरण निर्माण होते.
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात असल्याने ख्रिसमस इथे उन्हाळ्याच्या दिवसांत येतो. त्यामुळे येथील उत्सव आणि परंपरा पूर्णपणे वेगळ्या आहेत. थंड हवामानाऐवजी ऑस्ट्रेलियन लोक ख्रिसमसचा दिवस समुद्रकिनाऱयावर घालवणे किंवा बाहेर बार्बेक्यू पार्टी करणे पसंत करतात. पारंपरिक गरम जेवणाऐवजी इथे सीफूड, थंड सॅलड्स आणि ‘पावलोवा’सारखे ( एक पारंपरिक ऑस्ट्रेलियन केक) हलके पदार्थ खाल्ले जातात. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मोकळ्या मैदानात हजारो लोक एकत्र येऊन मेणबत्त्यांच्या प्रकाशात ख्रिसमस कॅरॉल्स गातात. येथील सांताक्लॉज लाल कपडय़ांऐवजी बर्म्युडा आणि सन ग्लासेसमध्ये दिसू शकतो, जो येथील उष्ण हवामानाशी जुळणारा आहे.
जपान
जपानमध्ये ख्रिस्ती लोकांची संख्या कमी असली तरी ख्रिसमस हा प्रेम व्यक्त करण्याचा सण म्हणून लोकप्रिय आहे. येथील सर्वात रंजक आणि अनोखी परंपरा म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी केएफसीचे तळलेले चिकन खाणे होय. 1970च्या दशकात एका यशस्वी जाहिरात मोहिमेमुळे ही प्रथा सुरू झाली. ख्रिसमसच्या काळात भव्य रोषणाई केली जाते, जी पाहण्यासाठी लोक खास गर्दी करतात. जपानमध्ये ख्रिसमस हा ‘व्हॅलेंटाईन डे’सारखा साजरा केला जातो.
इंग्लंड
इंग्लंडमधील ख्रिसमस हा कौटुंबिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. ख्रिसमसच्या दिवशी दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळी कुटुंबासोबत मोठे जेवण केले जाते. यात रोस्ट टर्की, स्टफिंग, पोटॅटो, ब्रसेल्स स्प्राऊट्स आणि क्रॅनबेरी सॉस हे पदार्थ मुख्य असतात. जेवणानंतर ख्रिसमस पुडिंग आणि मिन्स पाईज खाल्ले जातात. ख्रिसमसच्या दुसऱया दिवशी म्हणजेच 26 डिसेंबरला ‘बॉक्सिंग डे’ हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असतो. इंग्लंडमध्ये ख्रिसमस ट्रीची परंपरा क्वीन व्हिक्टोरियाचा पती प्रिन्स अल्बर्ट यांनी 19 व्या शतकात लोकप्रिय केली.
फ्रान्स
फ्रान्समध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला आणि पारंपरिक जेवणाला खूप महत्त्व दिले जाते. फ्रान्समध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 24 डिसेंबरच्या रात्री एक मोठे आणि खास जेवण आयोजित केले जाते, ज्याला ‘रेव्हियॉन’ म्हणतात. त्यात ऑयस्टर, फोई ग्रास, स्मोक्ड सॅल्मन आणि चेस्टनट स्टफ्ड रोस्ट टर्कीसारखे पदार्थ समाविष्ट असतात. फ्रान्समधील सर्वात प्रसिद्ध ख्रिसमसची मिठाई म्हणजे ‘बुश दे नोएर्ल’ हा केक लाकडाच्या ओंडक्याच्या आकाराचा असतो आणि चॉकलेटने सजवलेला असतो. पूर्व फ्रान्समधील काही भागांमध्ये ख्रिसमसच्या आधी 6 डिसेंबरला सेंट निकोलस डे साजरा केला जातो.






























































