
>> गौरी सरनाईक
विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील मंगल क्षण. विवाह झाला की माणसाच्या आयुष्याला एक टर्निंग पॉइंट मिळत असतो. पण आजकाल या विवाहाच्या नात्यांचं वय कमी होताना दिसत असतं. लग्नानंतर काही दिवस आनंदात जातात. पण नंतर कुरबुरी सुरू होतात आणि एक दिवस संसारही मोडून पडतो. असं का होतं? मुलांवर आपले संस्कार कमी पडतात की काय याचा विचार त्यांच्या आई-वडिलांनी करायला हवा. ज्या कांद्यापोह्यांनी विवाहपर्वाला सुरुवात होते ते कांदेपोहे कढईतच राहतात का , याचाही विचार होण्याची गरज आहे.
दिवाळीची चाहूल लागण्याआधीपासूनच लग्नसराईची धामधूम सुरू होते. मुलगी बघणे, पसंती, बोलणी आणि मग सुरू होते लग्नाची तयारी. आजकाल पूर्वीचा काळ नाही राहिला. चहा, पोहे, बैठकीत खाली मान घालून बसलेल्या मुलीला विचारली जाणारी ठरावीक प्रश्नावली. फार काळ लोटला त्या पद्धतीला. पण ज्यांनी त्या प्रकारातला गोडवा चाखला आहे आणि आता सुखात आपल्या संसारात रमले आहेत त्यांच्यासाठी तो आठवणींचा अमूल्य ठेवा आहे.
आमचा एक काका त्या काळातल्या कोणत्याही फिल्मी हीरोपेक्षा कमी देखणा नव्हता. हुशार आणि शिकलेलासुद्धा. त्याला इच्छा होती ती अशी, मी मला आवडणाऱया मुलीशी विवाह करेन. आता हे कसं जमावं बरं! शेवटी एक युक्ती केली आमच्या आत्यानं. होणाऱया काकूला सर्वांनी म्हणजे घरातल्या वडीलधाऱयांनी आधीच पाहून पसंत केलं होतं. शेजारघरच्या लग्नात पंगतीत वाढताना ती मुलगी सतत काकाच्या नजरेसमोर राहील अशी व्यवस्था आत्यानं केली. झालं! काकाला ती आवडली. मग पुढचा सारा फार्स ठरल्याप्रमाणे पार पडला. लग्नानंतर ही गोष्ट काकाला बऱयाच उशिरानं कळली. अर्थात अशा गमती अपवादानं व्हायच्या.
सारी लग्नं ठरावीक साच्यातूनच व्हायची, संसार व्हायचे, मुलंबाळं व्हायची. आमची आजी म्हणायची, ‘पाचवा मुलगा झाल्यावर मी तुमच्या आजोबांना नीट बघितलं होतं. आजची थेरं त्याकाळात नव्हती हो !’ खरं तर लग्न ही गोष्टच अशी की ती सुखदच असते. काही काळ अत्यंत आनंद देते. भान हरपून टाकते. त्या काळात आपल्या जगाची लोकसंख्या फक्त दोन असते. एक तो आणि एक ती. हळूहळू भान येतं. आजूबाजूच्या जगाची जाणीव होते. कानातील नाजूक कुजबुजीचं रूपांतर मोठय़ानं बोलण्यात होऊ लागतं आणि मग खऱया अर्थानं संसार सुरू होतो. एकमेकांच्या उणिवा प्रकर्षानं जाणवू लागतात. मी माझं, तू तुझं सुरू होतं. मखमली गालिचाच्या खालची जाड शिवण जशी टोचते तशा स्वभावातल्या टोकेरी सवयी एकमेकांना टोचू लागतात. घरात वडीलधारी असतील तर जरा तरी धाक असतो, तो पण फार काळ नाही. बेडरूममधील अबोला डायनिंग टेबलवर जाणवू लागल्यावर स्वरूप गंभीरतेकडे झुकू लागलेलं असतं. दिवसरात्र एकमेकांच्या सहवासात घालवल्यावर आता तो सहवास नकोसा वाटू लागतो. हे असं एवढय़ा थोडय़ा काळात का होत़ं? याचा विचार निकडीनं करणं गरजेचं होऊ लागलंय. आयुष्य बरोबर काढायचं, सात जन्मांचं नातं जोपासायचं, त्यातला गोडवा वाढवायचा हे सारं खरोखरच काळाआडं होतंय का असा प्रश्न ऐरणीचा ठरू पाहत आहे. याला मुला-मुलींचे आईवडील कितपत कारणीभूत आहेत? हाही विचार महत्त्वाचा आहे. विचांराची आधुनिकता असावी, त्याचा अतिरेक नसावा. आम्हाला जे करायला मिळालं नाही ते सारं आमच्या मुलांना मिळावं हा दृष्टिकोन एका ठरावीक मर्यादेपर्यंत योग्य आहे. पण मुलं तो कसा घेतात हे पाहणंदेखील तेवढंच महत्त्वाचं नाही का?
दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या ओळखीतल्या एकाचे लग्न ठरले होते. लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. साखरपुडाच इतका जोरदार झाला की बस्स! मिनी लग्न जणू! मुलगा चांगला देखणा. शिकलेला, उच्च पदस्थ. उत्तम नोकरी, पगार चांगला. पण आईवडील अत्यंत साधे. अजिबात भपका, दिखावा नाही. अख्खं कुटुंबच वेगळेपणानं उठून दिसत होत. सगळा सोहळा छान झाला. लागलीच लग्न झालं. तेही असंच छान. नवेपणाचं लेणं उतरून संसार सुरू झाला आणि पाहता पाहता सहा महिन्यांत संपला. कारण शोधणं, त्यावर तोडगा काढणं, मध्यस्थी करणं सारं काही जे जे शक्य होतं ते ते सारं झालं. निष्पन्न? काहीच नाही. मुलीच्या आईचं एकच म्हणणं, ‘किती म्हणून मुलीनं सोसायचं? मी सोसलं की जन्मभर! अजूनही सुरूचं असतं. तिला सोसण्याची काहीच गरज नाही. मी समर्थ आहे तिला पुन्हा उभं करायला. कोणतीच कारणमीमांसा जाणून न घेता तिचं एकेरीवर येणं याग्य नव्हतं. मी सोसलं, आमचे संस्कारच तसे होते. आई म्हणायची, सासरघरी उभ्या गेल्यात त्या आडवं बाहेर पडायचं. म्हणून का माझ्या लेकीनं तेच करायचं?’ तिच्या आजच्या वागण्यात आणि मुलीसाठी विचार करण्यात केवढा विरोधाभास होता. तिने आपल्या मुलीला कोणते असे वेगळे संस्कार दिले की, त्याचं रूपांतर असं झालं आहे? आज तिच्या सोसण्यानं तिचं घर उभं आहे. समाजात तिला मान आहे. मुलीचं काय? खरंतर सहा महिन्यांत सुख भोगणंच संपत नाही. किती तऱहा, किती काwतुपं! त्याची लज्जत किती काळ सुख देते आणि नंतर त्या आठवणी आयुष्यभर सुखावतात.
संस्काराचा संबंध आयुष्यभर आपल्याशी असतो. लग्न ठरताना बाकी सर्व तयारी खूप मोठय़ा प्रमाणावर होते. कपडा, दागदागिने, ब्युटीपालर्स आदी. सगळा भर दिसण्यावर. फक्त चांगलं दिसणंच का महत्त्वाचं? मुलीचे आईवडीलसुद्धा मुलीला महत्त्वाचं सांगायला विसरतात की काय? आजही आपल्याकडे कुटुंबाला प्राधान्य आहे. चारचौघात कसं वागावं, कसं आपलंसं करावं, कुठे स्वभावाला थोडी मुरड घालावी, काय आवडतं ते जाणून घ्यावं. या गोष्टी तुमच्या मोकळेपणाच्या आड येत नाहीत. तुम्ही जरा समझोता दाखवा समोरचा आपोआप नमतो. त्यात गोडी आहे. थोडं थांबा. वाट बघा. समोरच्याला वेळ द्या. मी केवळ पुरोगामी विचारानं बोलत नाही. खरंच अगदी सहनशक्तीच्या पल्याड असेल तर जरूर विचार करावा. कारण अन्याय सहन करणं कायद्यानं गुन्हा आहे. जाता जाता एवढचं सांगेन थांबा! पहा! पुढे चला!

























































