काव्यरसग्रहण – अहम् ब्रह्मास्मि

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गुरुनाथ तेंडुलकर

आमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण? असा प्रश्न कुणी विचारला तर प्रत्येक जण वेगवेगळं उत्तर देईल. प्रेमात पडलेली अल्लड तरुणी कदाचित तिच्या प्रियकराचं नाव घेईल तर एखादी आई आपल्या एकुलत्या एक लेकराचं नाव घेईल. एखादा पितृभक्त मुलाच्या दृष्टीने त्याचे वडीलही त्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची व्यक्ती असेल तर कुणी एखादा त्याच्या जिवलग मित्राचं नाव घेईल. प्रत्येकाच्या आयुष्यात असणारी सर्वात महत्त्वाची व्यक्ती ही वेगवेगळी असते. आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे एखाद्या मुलीला लहानपणी तिची आई सर्वात महत्त्वाची वाटत असेल तर लग्नानंतर तिला पती सर्वात महत्त्वाची व्यक्ती वाटू लागेल असेल. पुढे तीच मुलगी आई झाल्यानंतर तिला तिचं मूल हे सर्वात प्रिय होईल तर उतारवयात तिची काळजी घेणारी एखादी आयाबाई तिला महत्त्वाची वाटू शकेल.

प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाची व्यक्ती या स्थल आणि कालसापेक्ष असतात म्हणजेच त्या त्या माणसाच्या वयावर आणि परिस्थितीवर अवलंबून असतात.
परंतु आपल्या आयुष्यात आलेल्या सगळ्या व्यक्तींपैकी एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीचा आपण विचारच करत नाही आणि ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतः होय.

आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात आणि जातात. काही दीर्घकाळ सहवासात राहतात तर काही माणसं काही क्षणांपुरती येतात आणि निघून जातात. बालपणी सुरू झालेल्या विद्यार्थीदशेत योग्य ज्ञान देऊन जीवनाला यशस्वीरीत्या सामोरं जाण्यासाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि प्राध्यापक महत्त्वाचे असतात. तसंच अनोळखी ठिकाणी न सापडणारा पत्ता सांगणारा माणूसदेखील त्यावेळी महत्त्वाचा असतो. आजारी पडल्यानंतर योग्य उपचार करणारा डॉक्टर महत्त्वाचा असतो तसंच अडीअडचणीच्या वेळी धावून येणारे शेजारीही महत्त्वाचे असतात. नातेवाईक आणि मित्र तर महत्त्वाचे असतातच.

पण तरीही या सगळय़ांपेक्षा अधिक महत्त्वाचे असतो ते आपण आधी स्वतःवर प्रेम करायला हवं. हा जन्म लाभल्यापासून मृत्यू येईपर्यंतचे सगळे क्षण भरभरून जगायला हवेत हेच सांगणारी आजची कविता ‘जीवन प्रवास’ या कवितेच्या कवयित्री आहेत पुष्पा कोल्हे.

मुंबईत राहणाऱया पुष्पा कोल्हे या उत्तम कविता, गझला लिहितात. अंगाई गीतापासून ते शालेय प्रार्थनेपर्यंत अनेक काव्य प्रकार त्यांनी तरलतेने हाताळले आहेत. छंदोबद्ध आणि लयतालातल्या कविता हे त्यांच्या कवितेचं वैशिष्टय़ सांगता येईल. त्यांच्या ‘जीवन प्रवास’ या कवितेत त्या म्हणतात…

एकेक स्थानकावर जो तो गळावयाचा
सगळा प्रवास येथे एकल करावयाचा

माणूस जन्मला येताना एकटा येतो आणि मेल्यानंतर एकटाच जातो हे वैश्विक सत्य. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्या सतत सोबत असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आपण स्वतःच. म्हणूनच प्रत्येकाने आधी आपली स्वतःची काळजी घ्यायला हवी. इतरांसाठी करताना स्वतःच्या प्रकृतीची आणि आयुष्याची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्यावी. असं जगताना कुणी आपल्याला स्वार्थी म्हटलं तरी चालेल, पण केवळ ‘हा महत्त्वाचा’, ‘तो महत्त्वाचा’ असं म्हणत आयुष्यभर इतरांसाठी खस्ता काढताना आपलं स्वतःचं आयुष्य नीट न जगताच मरून जाणं कदापिही योग्य नाही हे सांगताना कवयित्री पुष्पाताई शेवटच्या दोन ओळीत म्हणतात…

जीवन प्रवास खडतर, तरी कर जपून मर्दा
गर्दीत व्यर्थ ना तू, ऐसा मरावयाचा

हा जन्म एकदाच लाभलाय. त्या मिळालेल्या जन्मात मरेपर्यंत केवळ जिवंत न राहता खऱया अर्थानं जगता आलं पाहिजे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हे जीवनसूत्र सतत ध्यानात ठेवून प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगता आला पाहिजे. त्यासाठी आधी स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःची काळजी घेणं सर्वाधिक महत्त्वाचं.

आपल्या हिंदुस्थानी यजुर्वेदातील बृहदारण्यक उपनिषदातील ‘अहम ब्रह्मास्मि’ या संकल्पनेतदेखील हाच अर्थ समावला आहे असं मला वाटतं.

जीवन प्रवास

एकेक स्थानकावर, जो तो गळावयाचा
सगळा प्रवास येथे, एकल करावयाचा

येतोच एकटाची, जन्मास तूच येता
अंती कुणी तुझ्या ना, संगे असावयाचा

नाहीच भरवसा तर येथे कुणाकुणाचा
तू फक्त पुण्यसंचित, हंडा भरावयाचा

संसारसागरी तर सुखदुःख पैक लाटा
होऊन स्वार त्यावर तारू धरावयाचा

जीवन प्रवास खडतर तरी कर जपून मर्दा
गर्दीत व्यर्थ ना तू ऐसा मरावयाचा
– कवयित्री पुष्पा कोल्हे
पूर्वप्रसिद्धी : झपूर्झा